Jump to content

वैजयंता

वैजयंता ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली कादंबरी आहे.

ही कादंबरी स्वाभिमानी, संघर्षशील आणि स्वतःच्या कामाशी एकनिष्ठ असणाऱ्या तमाशातील एका स्त्री कलावंतिणीबद्दल आहे. आजही पितृसत्ताक समाजव्यवस्थेत पुरुषवर्गाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून, हाच वर्ग तमाशा या कलेचा मोठया प्रमाणात आस्वाद घेताना दिसतो. स्टेजवर हा वर्ग या कलेची स्तुती करून त्या कलावंतांच्या कौशल्याचे आणि कलेचे गुणगान करतो; परंतु मंचावरून खाली येताच हाच वर्ग त्या कलावंत स्त्रियांचे चारित्र्यहनन करताना दिसतो. तिच्यावर मालकी हक्क दाखवून तिचा जबरदस्तीने उपभोग घेताना दिसतो. परंतु वैजयंता ही नायिका या अन्याय, अत्याचार, शोषण इत्यादी विरोधात आवाज उठवते. तसेच या समाजव्यवस्थेतील पुरुषांकडून मिळणाऱ्या धमक्यांना न घाबरता या वर्गाविरुद्ध प्रतिकार करते. पितृसत्तेच्या अधीन न राहता, गुलामगिरीला विरोध करते.

अण्णा भाऊंनी प्रस्थापित समाजाचा आणि येथील पितृसत्तेचा तमाशा कलावंतांकडे बघण्याचा दृष्टिकोन किती हीनकस होता याची प्रत्यक्षात मांडणी यातून केलेली आहे. समाजाचा दृष्टिकोन बदलावा म्हणून अण्णा भाऊ त्यांच्या साहित्यातून प्रयत्न करतात.

उदाहरणार्थ- वैजयंता कादंबरीतील आबा पाटील हे पात्र वैजयंता या नायिकेला पैशाचे आमिष दाखवून तिला जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडते. पैसे देण्याच्या माध्यमातून तो तिच्याशी बळजबरीने लगट करण्याचा प्रयत्न करतो. तिच्या शरीराला स्पर्श करू पाहतो. तेव्हा मात्र वैजयंता त्याला म्हणते, तू मला तिन्ही लोकीचं राज्य देऊ केलं तरी मी तिकडे येणार नाही. अण्णांनी साकारलेली वैजयंता ही कोणत्याही जात-पितृसत्तेतील पुरुषांच्या कोणत्याही मोहाला बळी न पडता स्वतःचं अस्तित्व आणि शील जपते.

       भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये चंदूलालसारखा तमाशा थिएटरचा मालक वैजयंताच्या कलेच्या माध्यमातून अमाप नफा मिळवतो. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी तो तिच्या कलेबरोबर देहाचे प्रदर्शन करून पुरुषवर्गाच्या मनधरणीसाठी आदेश देतो. परंतु ती या गोष्टींना नकार देते, तेव्हा ती चंदूलालच्या उरात चाकूसारखी रुतलेली वाटते. भारतीय समाजव्यवस्थेत पुरुषांना अतिशय महत्त्व असल्यामुळे सर्वच क्षेत्रांवर त्यांची सत्ता प्रस्थापित झालेली आहे. मनुस्मृतीनेदेखील पुरुषांना उच्च तर स्त्रियांना दुय्यम माणून तिला पुरुषांच्याच सहमतीने जीवन जगण्यास विवश केलेले दिसते. याच दुय्यमतेच्या भूमिकेतून चंदूलाल वैजयंतावर एक स्त्री म्हणून तसेच ती गुलाम आहे, तिने सांगितलेली कामे कुठलीही तक्रार न करता करावी असे बंधने जेव्हा तिच्यावर लादली जातात, तेव्हा त्या सर्व गुलामीच्या कामांना नकार देण्याची शक्ती अथवा बळ अण्णा भाऊंच्या साहित्यातून मिळते. परंतु हा नकार म्हणजे एका स्त्रीने पुरुषी वर्चस्वाला दिलेले आव्हान… असे अव्हान संपुष्टात आणण्यासाठी आणि पुरुषी सत्ता प्रबळ करण्यासाठी वैजयंतालाच काय पण तिच्यासारख्या इतर कलावंतांनादेखील धडा शिकविण्यासाठी नाना प्रकारच्या युक्त्या हा वर्ग करतो. म्हणून चंदूलालसारख्या थिएटरमालकाच्या तोंडून सहज उद्गार येताना दिसतात, “हिला मी कोणत्याही परिस्थितीत वश करेनच,” असे जेव्हा तो म्हणतो तेव्हा वैजयंता अशा धमक्यांना भीक न घालता त्याला म्हणते, “मी सरळ तमाशा करीन, मी सरळ जाईन, दुसरं मला मान्य नाही. तमाशा म्हणजे माझ्या देहाचे नग्न प्रदर्शन नव्हे. जनतेची मालकी माझ्या कलेवर, शरीरावर नाही.” असे ती खडसावून सांगते. अण्णा भाऊंची ही नायिका स्वतःच्या आत्मविश्वासावर ठाम राहणारी आहे. स्वतःचे निर्णय घेणारी आहे. जे योग्य आहे त्याचाच स्वीकार करून तिच्यावर जबरदस्तीने लादणाऱ्या गोष्टींना स्पष्टपणे नकार देते. पुरुषप्रधान रचनेपुढे नकार देऊन पुरुषी वर्चस्वाला आळा घालण्यासाठी संर्घष करते. हेच तिच्यातील खंबीर नेतृत्व स्त्रियांना एक नवी ऊर्जा देण्याचे काम नक्कीच देताना जाणवते.

       अण्णा भाऊ वैजयंता  साकारत असताना तमाशातील स्त्रियांचे दु:ख, व्यथा, वेदना, अन्याय, अत्याचार, त्यांच्या मनातील द्विधा अवस्था, भावनिक-मानसिक-शारीरिक शोषण, त्यांचा जगण्यासाठी चाललेला संघर्ष, भावी जीवनाबद्दलच्या चिंता यांचे वास्तवदर्शी विश्लेषण समाजापुढे मांडतात. तमाशातील स्त्रीचं दु:ख मांडताना ते जातीआधारित शोषणाचेदेखील विश्लेषण करतात. तमाशात काम करणाऱ्या बहुतांश स्त्रिया खालच्या जातीतील असल्यामुळे त्यांच्या साहित्यातून वर्गीय शोषणाबरोबरच जातीशोषणाचेही विश्लेषण आलेले दिसते.