वेळुक
?वेळूक महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मुरबाड, शहापूर |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | श्री. सुरेश मधुकर मुकणे |
बोलीभाषा | मराठी |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/05 |
वेळूक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातले उत्तरेकडील टोकाचे गाव म्हणजे वेळूक. माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या टोकावडे गावावरून उत्तर दिशेला जाणारा रस्ता थेट वेळूक गावातच जातो! शिरोशी, शाई, बुरसुंगे ही गावे सोडल्यावर वेळूक येते. लहूटेपावरून पुढे गेल्यावर वेळूक ओहळावरील पूल पार केला की गावाला सुरुवात होते आणि मुख्य गावातील कौलारू घरे थोड्याश्या उंचीवर दिसू लागतात. गावात प्रवेश करताना लहानश्या खिंडीतून जावे लागते. वेळूक गाव उंचवट्यावरील पठारावर वसले आहे. गावाच्या सर्व बाजूंनी उतार आहे आणि त्या उताराला मोठमोठ्या दगडी आणि जुन्या झाडांची आड आहे. सह्याद्री पर्वत फक्त ८ कि.मी.वर आहे. गावाच्या पश्चिमेस बारमाही वाहणारी शाई नदी आणि दक्षिणेस वाहणारा वेळूक ओहळ गावाची तहान भागविण्याचे काम पिढ्यानपिढ्या करत आले आहेत. उत्तरेस लांबवर पसरलेले साखरी क्रिकेट मैदान आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३११ हेक्टर असून त्यावर गाववासियांच्या मालकी हक्काच्या शेत जमिनी आहेत. तसेच येथील शेतकऱ्यांच्या जमिनी शेजारील बुरसुंगे, मांदोशी, खेड, आळवे, गुंडे, कांबे, मालद, मांजरे, टेंभुर्ली या हद्दीला लागून असलेल्या गावांमध्ये सुद्धा आहेत. शेजारून वाहणारी शाई नदी मुरबाड व शहापूर तालुक्यांना विभागते. त्यानदीच्या पलीकडे म्हणजेच शहापूर तालुक्याच्या हद्दीतही वेळूक येथील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत.
हवामान
येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.