Jump to content

वेदाच्या सहा अंगांचे प्रयोजन

वेद हे फार गंभीर शास्त्र आहे. धर्म आणि ब्रह्म यांचे प्रतिपादन करणाऱ्या अपौरुषेय प्रमाण वाक्यांना वेद म्हणतात. ४ वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मंत्र आणि ब्राम्हण मिळून वेदपद तयार होतात. गायत्री आदी छंदांनी युक्त मंत्र ऋग्वेदात आहेत. यात देवांची स्तुती आहे. जे गायन कलेने गायले जातात ते समवेदातील मंत्र होत. याहून जे भिन्न मंत्र आहेत, जे कर्मकांडात वापरले जातात, ते यजुर्वेदातील मंत्र आहेत. वेदाची ६ अंगे आहेत. वेदांचा अर्थज्ञान प्राप्त व्हावं म्हणून या ६ अंगांची प्रवृत्ती होते. मांडूकोपनिषदात साधनभूत धर्माचं ज्ञान व्हावं या हेतूने ६ अंगांसहित कर्मकांडाला अपराविद्या मानलं आहे तर परमपुरुषार्थाभूत ब्रह्मज्ञानाचा हेतू म्हणजे उपायांना आणि उपनिषदांनी पराविद्या मानलं आहे. वेदांची ही ६ अंगे पुढील प्रमाणे आहेत.

१. शिक्षा - ज्यामध्ये वर्ण, स्वर आदींच्या उच्चरणाची पद्धत शिकविली जाते त्यास शिक्षा असे म्हणतात. "वर्णः स्वरः मात्रा बलं साम सन्तान इत्युक्तः शीक्षाध्यायः" अकारादि वर्ण असतात. उदात्त अनुदात्त आणि स्वरित हे स्वरांचे ३ प्रकार. ह्र्स्व, दीर्घ आणि प्लुत या मात्रा. स्थान आणि प्रयत्न हे बल. सामचा अभिप्राय अतिद्रुत, अतिविलंबीत, गीती या दोषांनी रहित. माधुर्याने परिपूर्ण. संतान म्हणजे संहिता. एका पदाचा दुसऱ्या पदाशी संनिकर्ष.

२. कल्प - आश्वलायन, आपस्तंभ, बौधायन आदींमधील सूत्रांना कल्प म्हणतात. "कल्प्यते समर्थ्यते यागप्रयोगे अत्र" अर्थात यज्ञ-यागाच्या प्रयोगात समर्थन करणारा जो वेदांग तो कल्प.

३. व्याकरण - प्रकृती प्रत्यय आदींच्या उपदेशाद्वारा पदाचं स्वरूप आणि अर्थाचा निश्चय करण्याकरता व्याकरणाचा उपयोग होतो. वेदांचा रक्षण ऊह, आगम, लघु आणि असन्देह आदि व्याकरण शास्त्राचा प्रयोजन आहे. वेदांच्या ६ अंगांमध्ये व्याकरण प्रधान मानल्या जातं. व्याकरण जाणणारा अपशब्द वापरत नाही. म्हणून त्याला प्रायश्चित्त करावं लागत नाही.

४. निरुक्त - एखाद्या शब्दाच्या अर्थज्ञानात दुसऱ्या व्याकरणाच्या अपेक्षे बिना स्वतःच अर्थ प्रगत करण्याची क्षमता असते, अशाला निरुक्त असे म्हणतात. निरुक्त ग्रंथाचे ३ कांड आहेत. नैघुन्टुक कांड, नैगम कांड आणि दैवत कांड. वेदज्ञानाकरता, वेदांच्या अर्थज्ञानाकरता निरुक्ताचा उपयोग होतो.

५. छंद - गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, बृहति, पङ्क्ति, त्रिष्टुप् आणि जगति. हे ७ प्रकारचे छंद आहेत. गायत्रीत २४ अक्षरे असतात. त्याहून ४ जास्त उष्णिक मध्ये. त्याहून ४ जास्त अनुष्टुप मध्ये. अशी वाढत जातात. ज्या व्यक्तीला छंदांचा ज्ञान नाही, केवळ मंत्र म्हणून यज्ञ करतात किंवा अध्यापन करतात, त्याला स्थाणु म्हणजे खांब अशी संज्ञा दिली आहे.

६. ज्योतिष - "यज्ञकालार्थ सिद्धये" हे ज्योतिषशास्त्राचे प्रयोजन आहे. यज्ञाच्या सामानाच्या सिद्धीकरता ज्योतिषशास्त्राचे अध्ययन आवश्यक आहे. तिथी, मास, नक्षत्र आदिंची म्हणजे या सगळ्या कालविक्षेपांची माहिती ज्योतिषशास्त्रात आहे.

अशा या ६ अंगांनी वेदांचे अध्ययन जो करतो, तो परमसुखास प्राप्त होतो. तो ब्रह्मलोकात पूजीत होतो.