Jump to content

वृक्षायुर्वेद

वराहमिहिराच्याबृहत्संहिता’ या बृहद्ग्रंथाचा वृक्षायुर्वेद हा ५५ वा अध्याय आहे. यात एकूण ३१ श्लोक आहेत.
याचे लेखन वराहमिहिर यांनी उज्जैन येथे केले. ग्रंथाच्या या भागात पिके आणि त्याच्या लागवडीच्या सर्व अंगांचा विचार केला आहे.
यात झाडांची वाढ, जमिनीची लागवडीचे दृष्टीने तयारी, बीजप्रक्रिया, रोपप्रक्रिया, झाडांसाठी जीवनसत्त्वे, झाडांवरील रोग, लागवडीचे तंत्र व सिंचन या गोष्टींचा विचार केला आहे.

झाडांची वाढ

यासंबंधी माहिती देताना फांदी लावून येणारे वृक्ष असा उल्लेख आहे. त्यांना कांडरोप्य असे म्हणले आहे. यालाच आपण छाट कलमे म्हणतो. दुसऱ्या पद्धतीची माहिती वाचत असताना हे भेट कलमाचे वर्णन आहे. हे लक्षात येते. छाट कलमाच्या काडीस शेण लावून मग ती जमिनीत लावावी असेही सुचविले आहे. (श्लोक क्र. ४-५)

जमिनीची तयारी

जमिनीतील बीज पेरून फुलल्यावर तिथेच मर्दन करावे. (कापून तिथेच टाकावे व तुडवावे) मऊ जमीन सर्व वृक्षांना हितकारक.
बीजप्रक्रिया - अंकोल वृक्षाच्या (शास्त्रीय नाव अलँजियम सॅल्व्हिफोलियम) फलकल्काने (रसाने) शंभर वेळा सिंचित किंवा त्याच्या तेलाने किंवा भोकरीचा रस वा तेलाने शंभर वेळा सिक्त करून कोणतेही बी गारांचे पाणी मिसळलेल्या जमिनीत लावावे. त्याच क्षणी बीजास अंकुर येतात. कांचन, आवळा, धावडा, अडुळसा, धोत्रा, तिवर यांची मुळे + वेतरुइमंदार यांच्या पर्णयुक्त वल्ली (पानांसह काड्या) अशा एकूण आठ वस्तू दुधात घालून तापवाव्या. निवल्यावर त्यात कवठाचे बी टाकून १०० टाळ्या वाजवाव्या व नंतर ते बी उन्हात वाळवावे. असे ३० दिवस करून नंतर संस्कारित खड्डय़ात लावावे.( श्लोक २४ ते २६)

त्वरित फलन

भोकराचे बी कृत्रिम तुष (कोंडा, भूस) काढून अंकोलयुक्त पाण्याने भिजवून वाळवावे. असे ७ दिवस करून म्हशीच्या शेणात चोळावे व त्याच शेणात गारांचे पाणी दिलेल्या मातीत लावावे. एक दिवसात फळ येते. हातास तूप लावून कोणतेही बी दुधाने १० दिवस सिंचित करावे. नंतर गाईचे शेणात चोळावे. नंतर ते भांड्यात ठेवून त्याला डुकराच्या व हरणाच्या मांसाची धुरी द्यावी. नंतर मासा डुकराचे चरबीत घोळवून तिळाचे रोप कापून तयार केलेल्या (पहा श्लोक क्र. २ जमिनीची तयारी) जमिनीत लावून त्यावर दूध-पाणी शिंपडल्यास त्या बीजास त्वरित फुले येतात.

रोपप्रक्रिया

तूप, वाळा, तीळ, मध, वावडिंग, दूध, गाईचे शेण यांचा मुळापासून फांद्यांपर्यंत लेप लावून तो वृक्ष अन्य देशी नेऊन लावला तरी जगतो.

जीवनवर्धके

झाडांच्या इंद्रियांना कार्यप्रवण करून त्यांना फलदायी बनविणे हा या जीवनवर्धक मिश्रणांचा हेतू आहे. ही मिश्रणे पुढीलप्रमाणे - लेंडी चूर्ण २ आढक (२४ किलो ५७६ ग्रॅम) + तीळ चूर्ण १ आढक (१२ कि. २८८ ग्रॅ) + सातू चूर्ण १ प्रस्थ (७६८ ग्रॅ.) + पाणी १ द्रोण (४८१.१५२ लिटर्स) गोमांस (१ तोळा) हे मिश्रण ७ रात्री ठेवून केव्हाही फवारावे. सर्व काल फुले फळे येतील. भात, तीळ, उडीद, सातू यांचे चूर्ण+दुर्ग्रंधीयुक्त मांस + पाणी यांचे वृक्षावर सिंचन करून फवारावे. त्याला हळदीची धुरी द्यावी. यामुळे अतिकठीण अशी चिंचही अंकुरित होते तर इतर झाडे होतीलच.

रोग

ऊन, थंडी, वारा यांचा अतिरेक झाला म्हणजे रोग होतात असे यात मानले आहे.
लक्षणे - पाने पांढरी पडतात, अंकुर वाढत नाहीत, फांद्या वाळतात.
वृक्षरोग व्रण - व्रणांवर वावडिंग, तूप व मातीचा चिखल यांचा लेप देऊन त्यावर दूध-पाणी शिंपडावे.
वृक्ष लागवड - लागवडीसंबंधी विस्तृत विवेचन यात दिले आहे. दोन वृक्षांत अंतर कां ठेवावे, किती ठेवावे, लागवडीचा काल (यासंदर्भात ऋतू, नक्षत्रे इत्यादीचा विचार केला आहे), खड्डा केवढा घ्यावा, त्यावर कोणती प्रक्रिया करून तो कसा भरावा या संबंधीचे विवेचनही यात केले आहे. एका ठिकाणचा वृक्ष काढून दुसऱ्या ठिकाणी लावायचा असल्यास काय काळजी घ्यावी याचाही तपशील दिला आहे.

अंतर - २० हात उत्तम, १६ हात मध्यम, १२ हात कनिष्ठ. (१ हात =१.५ फू.)अंतर ठेवण्याची कारणे - लागवड जवळ झाल्यास फांद्या एकमेकास लागतात व मुळे एकमेकांत गुंततात व त्यामुळे फळे मिळत नाहीत.

कवठाच्या झाडासाठी खड्डा भरणे : हातभर लांब व रुंद, २ हात खोल खड्डय़ात दूध-पाणी भरावे. तो कोरडा झाल्यावर भाजून काढावा. नंतर राखेत तूपमध मिसळून त्याचा लेप द्यावा. नंतर उडीदयव (जवस) यांचे चूर्ण मातीत मिसळावे (माप नाही) या मातीने खड्डा भरून नंतर मांस व मासे मिश्रित पाणी घालून माती ठोकून घ्यावी. नंतर संस्कारित कवठाचे बी (पहा बीजप्रक्रिया) ३:३ श्लोक २२-२३) चार बोटे खोल लावून त्यावर मांस व मासे मिश्रित पाणी घालावे. आश्चर्यकारक अंकुर येतील. लागवड काल - नक्षत्रे, उत्तरा, रोहिणी, मृग, रेवती, चित्रा, अनुराधा, मूळ, विशाखा, पुष्य, श्रवण, अश्विनी, हस्त या नक्षत्रांत लागवड करावी. वर्षां काळात (श्रावण-भाद्रपद महिने) फांद्या फुटलेले वृक्ष लावावे.

लागवड पद्धत

एका ठिकाणीचा वृक्ष दुसरीकडे लावणे असल्यास, त्याचे जे अंग ज्या दिशेस असेल तेच अंग त्याच दिशेस ठेवून तो लावावा. (उपटण्यापूर्वी चुन्याची खूण करावी.)

सिंचन

झाडांना कोणत्या ऋतूत किती पाणी द्यावे याचा थोडक्यात तपशील दिला आहे. ग्रीष्म ऋतूत - सकाळ-संध्याकाळ पाणी द्यावे. हेमंत ऋतूतशिशिरात - दिवसाआड पाणी द्यावे, वर्षा ऋतूत - जमीन कोरडी पडल्यास द्यावे.

बाह्य दुवे

अधिक माहिती