Jump to content

वीणा

वीणा
लघुचित्रः वीणेवर राग गुर्जरी वाजवणारी वादिका व मंत्रमुग्ध हरीण (१७ वे शतक)
सरस्वती देवी वीणा वाजवतांना - रविवर्म्याचे चित्र
  1. वीणा : भारतीय संगीतातील एक प्राचीन व प्रमुख तंतुवाद्य. प्राचीन काळी वीणा हे नाव साधारणतः अवनद्ध वाद्ये आणि घनवाद्ये वगळता, इतर प्रकारांना उद्देशून वापरले जात असावे. सर्व ततवाद्यांना तर ते लागू होतेच पण नागस्वरम्‌, सनई यांसारख्या सुषिर वाद्यांनाही ‘मुखवीणा’ हेच नाव होते. वैदिक मंत्रांच्या स्वरगणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या वीणेला ‘हस्तवीणा’ किंवा ‘गात्रवीणा’ म्हणत असत. हिंदीमध्ये ‘बीन’ हे नाव वीणा हे तंतुवाद्य व गारूड्याची पुंगी या दोहोंचे निदर्शक आहे. अलीकडे मात्र वीणा ही संज्ञा सामान्यतः दांड्यावर स्वरांचे पडदे असलेल्या तंतुवाद्याला अनुलक्षून वापरली जाते.

प्राचीन वीणाप्रकार : वीणेचे अनेक प्रकार प्राचीन काळापासून अस्तित्वात असावेत. धनुष्याकार (कमानदार) वक्रवीणा हे अतिप्राचीन तंतुवाद्य असून ईजिप्तमध्ये इ.स.पू.सु. चार हजार वर्षांपूर्वी अशा प्रकारचे वाद्य प्रचारात असल्याचे उल्लेख आढळतात. हॉर्टेन्स पानुम या लेखिकेने स्ट्रिंग्ड इन्स्ट्रुमेंट्‌स ऑफ द मिडल्‌ एजिस, देअर ईव्हलूशन अँड डेव्हलपमेंट या ग्रंथात, वक्राकार वीणा सर्व वीणाप्रकारांतील मूळ प्रकार असून बाकीच्या वीणा नंतर निर्माण झाल्या, असे म्हणले आहे. वैदिक संगीतातही वीणावादन प्रचलित होते. यज्ञप्रसंगी उद्‌गाते गात असताना, यजमानपत्नी निरनिराळ्या वीणा वाजवत असल्याचे निर्देश आढळतात. वाण, कर्करी, कांडवीणा, अपघाटिल, गोधा इ. वीणांचे वेगवेगळे प्रकार होते. त्या कमानीत आडव्या तारा बसवलेल्या धनुर्वीणा असाव्यात किंवा सपाट चौकटींवर तारा जोडलेल्या मंजूषावीणा (पेटीसारख्या आकाराच्या) असाव्यात. ऋग्वेदात आघाटी, गर्गर, वाण इ. ततवाद्यांचा निर्देश आढळतो. ‘गोधा’ (घोरपडीच्या कातड्याने आच्छादलेली वीणा), ‘क़ांडवीणा’ (बांबूची पेरे जोडून तयार केलेली), ‘अलाबुवीणा’ (भोपळा असलेली), ‘वाण’ (शंभर तारा असलेली), ‘किन्नरी वीणा’ (बोटांनी छेडून वाजवली जाणारी), ‘रावणहस्त वीणा’ (गजाने वाजवली जाणारी),असे वीणेचे विविध प्रकार प्राचीन काळी रूढ होते.

भरताच्या नाट्यशास्त्रात ‘चित्रा’ (७ तारांची) आणि ‘विपंची’ (९ तारांची) या प्रमुख वीणांचे निर्देश असून घोषा, कच्छपी इ. दुय्यम वीणा होत्या. नाट्यशास्त्रात ‘महती वीणा’ (२१ तारांची) ह्या मुख्य वीणेचा निर्देश आढळतो. ‘कच्छपी’ ही खालच्या भागाचा आकार कासवाच्या पाठीसारखा असलेली, गिटारसदृश वीणा प्रचलित होती. ‘याळ’ ही वक्राकार वीणा दक्षिण भारतात प्रचारात होती. प्राचीन वीणांचे तारांच्या संख्येवरूनही वेगवेगळे प्रकार पडत. उदा., नकुला (२ तारा), त्रितंत्री (३ तारा), राजधानी (४ तारा), शार्वरी (६ तारा), परिवादिनी (७ तारा), इत्यादी. अशा अनेकतंत्री (वा बहुतंतुक) वीणांमध्ये साधारणतः प्रत्येक स्वरासाठी स्वतंत्र तार असे. त्यामुळे एकतर प्रत्येक तार सुरात लावणे जिकिरीचे होते आणि सुरात लावल्यावर वाजवताना त्या स्वरात जराही बदल करता येत नव्हता. दुसरे म्हणजे, अशा तुटक स्वरांमुळे गमक, मींड वगैरे काढता येत नसल्यामुळे रागदारी संगीतात त्याचे अपुरेपण जाणवल्याने वीणेच्या रचनातंत्रात पुढे आमूलाग्र सुधारणा होऊन एकतंत्री (वा एकतंतुक) वीणा प्रचारात आली.

मध्ययुगीन वीणाप्रकार : एकाच तारेवर अनेक स्वर वाजवणारी दंडवीणा प्रचारात आल्यावर, वेगवेगळ्या स्वरांची स्थाने दाखवण्यासाठी वीणादंडावर पडदे बसवण्याची प्रथा (सु. आठव्या शतकापासून) रूढ झाली. शार्ङ्‌गदेवकृत संगीतरत्नाकराच्या (तेरावे शतक) सहाव्या वाद्याध्यायात अनेक वीणाप्रकारांचे तपशीलवार वर्णन आले आहे.

एकतंत्री वीणा : या वीणेच्या लाकडी दांडीच्या एका टोकाला गोलाकार भोपळा, तर दुसऱ्या टोकाला ‘ककुभ’ म्हणजे आडवा बसवलेला लाकडी  भाग असून त्यावर कासवाच्या पाठीच्या आकाराची  धातूची पट्टी बसवलेली असे. तातेची बनवलेली तार ककुभाच्या वरच्या पट्टीवरून नेऊन ताणून बांधलेली असे. तार व पट्टी यांमध्ये बांबूच्या तंतूची जीवा (जवारी) नादाच्या सहकंपनासाठी असे. या वीणेवर पडदे नसत. या वीणेलाच ‘घोषा’ (किंवा ब्रह्मवीणा) असे नाव होते. ही वीणा बाकीच्या सर्व वीणांची जननी मानली आहे.

मत्तकोकिला : एकवीस तारांची ही मुख्य वीणा असून हिलाच ‘महती’ असेही म्हणले आहे. मत्तकोकिला, विपंची इ. बाकीच्या वीणा यांचे मिळून होणारे वादन म्हणजे ‘करण’ होय. नाट्यशास्त्राप्रमाणेच सहा करणे शार्ङ्‌गदेवाने दिली आहेत.

आलापिनी : या वीणेची दांडी आतून पोकळ असलेल्या सरळ बांबूची असून तिची तार बकरीच्या तांतीची असे. ककुभ व भोपळा हे दोन भाग असत पण पडदे असण्याबाबत मतभिन्नता आढळते.

किन्नरी : किन्नरी वीणेला दोन भोपळे असून, वेळूच्या दांड्यावर चौदा पडदे मेणाने बसवलेले असत. हे पडदे घारीच्या हाडांचे किंवा धातूचे असत. शार्ङ्‌गदेवाने उल्लेखिलेली ‘लघुकिन्नरी’ अशीच असावी. त्याने तीन भोपळे व तीन तारा असलेल्या ‘बृहत्किन्नरी’ चाही उल्लेख केला आहे. ही किन्नरी वीणा दक्षिण भारतात आजही प्रचलित आहे.

वीणेचे आणखीही काही प्रकार संगीतरत्नाकरामध्ये निर्देशिले आहेत. उदा., ‘पिनाकी’ ही धनुष्याकृती, तातीच्या तारेची, एका बाजूला भोपळा असलेली वीणा होती. हिचे वादन धनुकलीने केले जाई. शार्ङ्‌गदेवाने स्वतःच्या नावाने एक वीणा उल्लेखिली, ती ‘निःशंकवीणा’ होय. तिला एक भोपळा व एक तार असे. त्रितंत्रिकेला ‘जंत्र’ अशीही संज्ञा होती. यातूनच ⇨ सतारीचा उगम झाला असावा. मध्ययुगात काही भारतीय वीणांच्या रचनेत (उदा., किन्नरी वीणा) पडदे योजले जात असल्याचे बाराव्या-तेराव्या शतकातील नान्यदेव, सोमेश्वर, हरिपाल, शार्ङ्‌गदेव आदींच्या ग्रंथांतील वाद्यांच्या वर्णनावरून तसेच शिल्पाकृतीवरून दिसून येते. बेलूर येथील एका शिल्पात (बारावे शतक) सरस्वतीच्या हाती असलेल्या वीणेला तेरा पडदे व दोन भोपळे दाखवले आहेत. रावणहस्त वीणेचे वर्णन कुंभाने संगीतराज ग्रंथात दिले आहे. तिची दांडी एक वीत लांबीची असून ती नारळाच्या कवटीला जोडलेली असे. खुंटीने पिरगळून तार ताणलेली असे.

अर्वाचीन वीणाप्रकार : बीन : उत्तर भारतीय संगीतपद्धतीतील स्वतंत्र वादनाचे प्रमुख वाद्य. मोगलकाळात ह्या वाद्याला फार महत्त्व होते. प्रथम याचा वापर मुख्यतः धृपद गायनाच्या साथीसाठी होत असे पण सध्या मात्र त्याचे स्वतंत्र वादन वैशिष्ट्यपूर्ण शैलीचे झाले आहे. धीरगंभीर, खर्जस्वरातील कामगत आणि संथ आलाप ही बीन वादनाची प्रमुख अंगे होत. या वाद्याच्या रचनेत पोकळ बांबूला खाली दोन मोठे भोपळे लावलेले असतात. बांबूच्या दांडीवर स्वरस्थानासाठी लाकडी गाळ्यांत बसविलेले चोवीस पितळी पडदे असतात. याच्या मुख्य वादनाच्या चार तार, त्यांच्या बाजूला आधारस्वरासाठी दोन तारा व बाहेरच्या अंगाला षड्‌जाची आणखी एक तारा असते. चार वादनतारा षड्‌ज, मंद्र पंचम, मंद्र षड्‌ज व अतिमंद्र पंचम स्वरांत क्रमाने लावतात. हे वाद्य डाव्या खांद्यावर टेकवून व तिरपे धरून, डाव्या हाताने स्वरवादन व उजव्या हाताने छेडून वाजवितात. स्वर कमी जास्त करण्यासाठी खुंट्या असतात. संमोखनसिंग ऊर्फ नौबतखॉं, रसबीनखॉं, न्यामतखॉं, ⇨सदारंग – अदारंग, हसनखॉं, अमीरखॉं, वजीरखॉं, ⇨बंदे अलीखॉं, बळवंतराव भैय्या, मंगेशराव तेलंग हे काही प्रसिद्ध बीनकार होत.

विचित्रवीणा : अभिजात संगीतातील ह्या सर्वत्र प्रचलित अशा भारदस्त तंतुवाद्याच्या निर्मितीचे श्रेय इंदूरचे उस्ताद अब्दुल अझीझखॉं यांस दिले जाते. तारेच्या नखीने उजव्या हाताने छेडून आणि डाव्या हातातील काचेचा गोळा तारेवर दाबून व सरकवून वादन करतात. जलद वादनापेक्षा संथ मींडीचे वादन यात होते.

दाक्षिणात्य वीणा : दाक्षिणात्य संगीतपद्धतीत वीणा-वेणू-मृदंग या वाद्यत्रयीचे असाधारण महत्त्व मानतात. त्या पद्धतीतील सर्व संगीतविशेष या वाद्यांवर वाजविता येतात. प्रचलित वीणा तंजावरच्या रघुनाथ नायकाने व त्याचा प्रधानमंत्री ⇨गोविंद दीक्षितरने (१५५४-१६२६) जुन्या वीणेत योग्य ते फरक करून तयार केली. या वीणेला चोवीस अचल पडदे आहेत. एका टोकास भोपळ्याऐवजी नासपती फळाच्या आकाराचा, लाकडाचा सहकंपक असतो. याच लाकडाची पोकळ, कोरीव व निमुळती होणारी दांडी सहकंपकाला जोडलेली असते व तिच्यावर पातळ तक्ता असतो. दांडीच्या कडा थोड्या उंच असून त्यावर आडवे चोवीस अचल पितळी पडदे असतात. वक्राकार शीर्षाच्या टोकाला खालच्या बाजूस सहकंपक व टेकू म्हणून एक भोपळा लावलेला असतो. हे वाद्य प्रायः आडवे ठेवून पण क्वचित उभे धरूनही वाजवतात. नखीने तारा छेडतात आणि डाव्या हाताने स्वर काढतात. शेषाण्णा, सुब्बाण्णा, वेंकटरमणदास, धन्नम्मल, सुब्रह्मियर व सांबशिव अय्यर हे काही प्रसिद्ध वैणिक होत.

गोट्टुवाद्यम्‌ : हे कर्नाटक संगीतातील महत्त्वाचे वाद्य. ‘महानाटक वीणा’ या नावानेही ते ओळखले जाते. याला वैशिष्ट्यपूर्ण अशी सात तारांची तरब असते. दोन भोपळे असल्यामुळे ते समोर जमिनीवर ठेवून वाजवता येते. वादन उजव्या हाताने छेडकाम करून आणि डाव्या हातातील लाकडी कांड्याने तारांवरून घासून करतात. सखाराम राव व नारायण अय्यंगार हे याचे प्रसिद्ध वादक होत.

रूद्रवीणा : या वाद्याचे अनेक प्रकारभेद व भिन्नभिन्न वर्णने आढळतात. याचे साम्य रबाबशी असल्याचे काही तज्ञ मानतात, तर काही दाक्षिणात्य वीणेशी दर्शवतात. या नावाने बंगालमध्ये प्रचलित असलेल्या वाद्याची दांडी आणि कोठा एकाच लाकडातून कोरलेला आणि चामड्याने मढविलेला असतो. याला पडदे नसतात. याच्या सहा तारा लाकडी काठीने दाबून वाजवितात.

यांखेरीज रंजनी वीणा (पन्हाळीच्या दांडीचे बीनसारखे वाद्य), प्रसारणी वीणा (प्रत्येकी पाच तारा असलेल्या दोन वादनपटांचे, पडदे असलेले वाद्य) इ. प्रकार आहेत. सतारीसारख्या, पण कासवाच्या पाठीसारखे सहकंपक असणाऱ्या वीणाप्रकारांत कच्छपी वीणा (सहा तारा व पडदे असलेली) कछवा (दोन वादनतारा व दोन झाल्याच्या तारा असलेली), काचवीणा (काचेचा वादनपट असलेली) आणि रूद्र व कच्छपीच्या मिश्र रूपाची भरतवीण ही वाद्ये मोडतात. नादेश्वर वीणा हे व्हायोलिनप्रमाणे सहकंपक आणि खुंट्या असलेले आणि सतारीप्रमाणे पडदे असलेले, सात तारांचे वैशिष्ट्यपूर्ण वाद्य आहे. शिंपांनी मढविलेल्या तुंब्याच्या, सतारीसारख्या वाद्याला सौक्तिक (सोतिक) वीणा असे नाव आहे.

लोकवाद्यांमध्येही अनेकविध पारंपरिक वीणाप्रकार आढळतात. त्यांत रावणहत्यो (रावणहस्त वीणा), एकतारी, नंदुण्णी, वीणा-कुंजू, सूरबहार आदींचा समावेश होतो.

नंदुण्णी : या छेडवाद्याला सहा-सात पडदे आणि दोन वा तीन वादनतारा असतात आणि ते कोणाने छेडतात. मलबारमधील देवळात याचे वादन होते. वादनपट आणि सहकंपक सपाट पाठीचे असतात.

वीणा-कुंजू : उथळ गोलाकार व कातडे लावलेला सहकंपक, त्याला जोडलेला निमुळता होणारा वाद्यपट आणि धाग्याचा किंवा दोऱ्याचा एकच वादनतंतू असलेले हे केरळमधील पुल्लुवन जमातीचे गजवाद्य आहे.

सूरबहार : याचा आकार सतारीहून मोठा असतो. त्याच्या बुडाचा भोपळा सतारीपेक्षा बराच मोठा असतो. दांड्यावरील पडदे पातळ व धारदार असतात. विलंबित लयीतील आलापीला हे वाद्य योग्य आहे.चुका उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला.

संदर्भ