Jump to content

विषुववृत्त

विषुववृत्ताची काल्पनिक रेषा दर्शविणारा जगाचा नकाशा.
विषुववृत्त असे रस्त्याच्या कडेला दर्शविल्याचे बऱ्याच वेळा टूरिस्ट जागांमध्ये आढळून येते.

पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या अक्षास (आस), काटकोन करून असलेले आणि उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे विषुववृत्त होय. विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्धदक्षिण गोलार्ध असे विभाजन होते.

विषुववृत्ताची लांबी साधारणपणे ४०,०७५.० किलोमीटर अथवा २४,९०१.५ मैल एवढी आहे. विषुववृत्त हे पृथ्वीवरील पाच प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. विषुववृत्तावरील ठिकाणांवर सर्वात जलद सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. तसेच विषुववृत्तावर नेहमी १२ तास दिवस तर १२ तास रात्र अनुभवायास मिळते. इतर ठिकाणी दिवस आणि रात्र ऋतूप्रमाणे लहान अथवा मोठ्या होतात.

आपली पृथ्वी ही पूर्ण गोलाकार नसून काहीशी लंबगोलाकार आहे. पृथ्वीचा सरासरी व्यास १२,७५० किलोमीटर असून विषुववृत्ताशी मात्र तो साधारणपणे ४३ किलोमीटरने अधिक आहे.

अवकाशयाने अवकाशात सोडण्यासाठी विषुववृत्तावरील ठिकाणांचा वापर करतात. कारण पृथ्वीच्या परिवलनामुळे विषुववृत्तावरील ठिकाणे पृथ्वीवरील इतर कुठल्याही ठिकाणांपेक्षा पृथ्वीच्या मध्याभोवती जास्त वेगाने फिरत असतात. ह्या मिळालेल्या अधिक वेगामुळे अवकाशयाने सोडायला कमी इंधन लागते. फ्रेंच गयाना (French Guiana) मधील कोउरू (Kourou) येथील गयाना स्पेस सेंटर (Guiana Space Center) हे ह्याचेच एक उदाहरण आहे.