विश्वनाथ मोरे
विश्वनाथ शंकर मोरे यांचा जन्म आजोळी म्हणजे पंढरपूरजवळच्या धुमाळ या गावी झाला. हे मूळचे घडशी समाजाचे. वडील शंकरराव मोरे यांचे सोलापूरला सायकलचे दुकान होते. शंकररावांचे कुटुंब मोठे होते. त्यामानाने मिळकत फारच कमी. विश्वनाथ यांना तीन भाऊ व चार बहिणी होत्या. विश्वनाथ सर्वात मोठे होते. विश्वनाथ तेरा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यामुळे लहान वयातच त्यांच्यावर कुटुंबाची सारी जबाबदारी येऊन पडली. या धबडग्यात विश्वनाथ यांचे मराठी तिसरीपर्यंत कसेबसे शिक्षण झाले होते. शिक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे अगदी भांडीकुंडी घासण्यापासून धुणी धुण्यापर्यंत सारी कामे त्यांना करावी लागली. पुढे त्यांनी वडिलांचे सायकलचे दुकान विकून, सोलापूरच्या भागवत चित्रमंदिरासमोरील इराण्याच्या हॉटेलात हॉटेलबॉय म्हणून काम करू लागले. पण एवढ्यानेही भागत नव्हते. मग विश्वनाथ यांनी सरळ मुंबईचा रस्ता धरला. तेथेही विड्याची पाने विकण्यापासून ते पिठाची चक्की चालवण्यापर्यंत सारी हलकीसलकी कामे त्यांनी केली.
मोरे गिरगावात कांदेवाडीतील गंधर्व ब्रास बँड नेहमी ऐकत असत. या बँडच्या सुरांनी त्यांना भुरळ घातली. या सुरांनी त्यांच्यातील सुप्तावस्थेतला ‘संगीतकार’ जागा केला. ते तिथला बँडवादनाचा सराव तास न तास ऐकत असत. पिठाच्या गिरणीत काम करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून थोडीफार बचत करून ते आंबेवाडीतील गणपतराव पुरोहित यांच्या संगीताच्या वर्गात जाऊ लागले. तेथे ते हार्मोनियम व तबला शिकले.
लवकरच विश्वनाथ मोरे आयएनटीच्या नाट्यसंस्थेत बदली तबलजी म्हणून काम करू लागले. तेथे गुजराती संगीतकार मिनू मुजुमदार यांच्या ओळखीचा त्यांना खूप फायदा झाला. त्यामुळे त्यांना मुंबई आकाशवाणीवर दोन गाणी स्वरबद्ध करण्याची संधी मिळाली. याच सुमारास गिरणगावातील राजाराम शुक्ल यांच्याकडे ते शास्त्रीय गाणे शिकले. त्यांना ‘काका मला वाचवा’ व ‘पायाचा दास’ अशा दोन नाटकांना संगीत द्यायची संधी मिळाली.
१९६२ साली त्यांना संगीत दिग्दर्शनासाठी ‘नंदिनी’ हा चित्रपट मिळाला, पण हा चित्रपट पडद्यावर फार उशिरा आला. विश्वनाथ मोरे यांनी भावगीते, भक्तिगीते, लावण्या, लोकगीत, गझल, कवाली, ठुमरी व अस्सल शास्त्रीय चिजांवर बांधलेली गीते असे सर्व प्रकारचे संगीत दिले. त्यांनी एकूण ४२ चित्रपटांना संगीत दिले. ‘गोंधळात गोंधळ’ (१९८१) आणि ‘संसार पाखरांचा’ (१९८३) या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट संगीताचे पारितोषिक, तर ‘हळदीकुंकू’ मधील ‘झन झन झन छेडिल्या तारा’ या गीताला सूरसिंगार संसदाचा शास्त्रीय गीताचा पुरस्कार मिळाला होता.
‘शब्द शब्द जपुन ठेव’, ‘तुला ते आठवेल का सारे’ ही भावगीते मराठी जनमानसात खूप गाजली असून ‘खास मालक घरचा’, ‘दार उघड बया दार उघड’, ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ यांसारख्या लोकनाट्यांचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले होते.