Jump to content

विश्राम घोले

डॉ. विश्राम घोले (इ.स. १८३३ - इ.स. १९००) हे पुण्यातील एक निष्णात शल्यविशारद आणि उदारमतवादी समाजसुधारक होते.[][][]

यादव गवळी समाजातून आलेले डॉ. घोले यांना गव्हर्नरच्या दरबारात फर्स्ट कलास सरदाराचा म्हणजे संस्थानिकांच्या बरोबरीचा दर्जा होता. त्यांची लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, जोतिबा फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, कृष्णशास्त्री-विष्णूशास्त्री चिपळूणकर अशा पुण्यातल्या अनेक सुधारकांशी मैत्री होती.[][]

विश्राम रामजींचे वडील सोजीर असल्याने शिक्षणाची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करून ते सर्जन झाले. गोऱ्या पलटणीत १८५७ च्या धामधुमीतही डॉकटर म्हणून ते भारतभर फिरले आणि मानमरातब प्राप्‍त करून १८७४ साली पुण्यात स्थायिक झाले.[][]

विधायक कार्य

स्त्री-शिक्षण, मागास जातीतील सुधारणा, शेती व उद्योग या क्षेत्रांतही डॉ. विश्राम रामजी घोले या बुद्धिमान आणि कर्तबगार व्यक्तीचे कार्य होते. १८५७ सालच्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात डॉ. घोले यांनी एक सर्जन म्हणून निःपक्षपातीपणे कामगिरी बजावली होती. नंतरच्या काळात, बिटिश अधिकारी तसेच पारशी-मारवाडी समाजातले श्रीमंत पेशंट, तत्कालीन समाजसुधारक व राजकीय चळवळीतले नेते आणि सामान्यजन अशा त्या ऐन इंग्रजी अमदानीतल्या सर्व थरांतील रुग्णांचे ते डॉकटर होते.[][][]

सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ 1875ला साजरा करण्यात आला. त्यावेळेस सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद डॉ. विश्राम रामजी घोले यांना देण्यात आले.

विश्राम रामजींची भूमिका समन्वयवादी होती. 'ज्ञानप्रकाश'च्या संपादक मंडळातही त्यांचे मित्र होते. आणि सत्यशोधक समाजाच्या व्यासपीठावरही त्यांचा वावर होता. विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि जोतिबा फुले यांच्यातील वैमनस्य विकोपाला जाऊनही या दोघांशी विश्राम रामजींचे सख्य होते.[][]

पुण्यात बाहुलीचा हौद म्हणून जे ठिकाण होते त्या हौदाच्या मध्यावर विश्राम रामजींची थोरली मुलगी काशीबाई ऊर्फ बाहुली हिचे शिल्प होते. वयाच्या नवव्या वर्षी, १८७७ मध्ये काशीबाई मरण पावली. तिला डॉ. घोले यांनी इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. घोले यांच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती व महिलांचा याला प्रखर विरोध होता. जातीतील प्रमुख लोकांनी घोले यांनी मुलीला शिकवू नये असा सल्ला अनेक वेळा दिला व तसे न केल्यास जातीतून बहिष्कृत करण्याची धमकीही दिली. काही नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तींनी काशीबाईला काचांचा लाडू खायला घातल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन ती मृत्युमुखी पडली.[][][]

मात्र या घटनेनंतरही विश्राम रामजींनी माघार घेतली नाही. आपली दुसरी मुलगी गंगूबाई हिला त्यांनी जिद्दीने शिकवले. केवळ तिचे शिक्षणच केले नाही तर तिचे लग्नही लहानपणी न लावता वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच केले.[][][]

शेतीविषयक कार्य

१८७५ सालच्या दुष्काळानंतर विश्राम रामजींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपले लक्ष केंद्रित केले. शेतीविषयक अनेक प्रयोग त्यांनी केले. शेतकरी मासिकाच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतला आणि आर्थिक कारणांमुळे हे मासिक बंद पडू नये, याची सुरुवातीच्या काळात त्यांनी काळजी घेतली.[][][]

कुटुंब

विश्राम रामजींची कन्या गंगूबाईचा विवाह डॉ. रघुनाथराव खेडकर यांच्याशी झाला. रघुनाथरावही एक निष्णात सर्जन होते. इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस करताकरता त्यांनी वेदान्त धर्माचे अध्ययन आणि अध्यापन चालू ठेवले होते.[][]

बाहुलीचा हौद

घोले यांनी आपल्या दिवंगत मुलीच्या स्मरणार्थ पुण्यात बाहुलीचा हौद बांधला आणि तो सर्व जातिधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला.[][][]

चरित्रे

  • डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार (डॉ. अरुणा ढेरे)

स्मारके

  • पुण्यातील मॉडर्न हायस्कूलजवळच्या रस्त्याला घोले रोड असे नाव देण्यात आले आहे.

संदर्भ

  1. ^ a b c d e f "कहानी 8 साल की उस बच्ची की जो कुर्बानी देकर सैकड़ों लड़कियों को शिक्षित कर गई". टीव्ही9 हिंदी. १४ एप्रिल २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e f g h i j "विविधा: डॉ. विश्राम रामजी घोले". dainikprabhat.com. १४ एप्रिल २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ a b c d e f g h i j "8 साल की इस लड़की की मौत के बाद मिला था भारतीय महिलाओं को शिक्षा का अधिकार, हुआ था पढ़ने का विरोध". indiatimes. १४ एप्रिल २०२४ रोजी पाहिले.