विलास वाघ
प्रा. विलास वाघ (जन्म : १ मार्च १९३९ - २५ मार्च २०२१)[१] हे मराठी लेखक, संपादक, प्रकाशक तसेच सामाजिक कार्यकर्ते होते. 'सुगावा' ह्या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच 'सुगावा' ह्या प्रकाशनसंस्थेद्वारे प्रकाशक म्हणून त्यांनी प्राधान्याने आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळीशी संबंधित वैचारिक साहित्य प्रकाशित केले. [२]
जन्म, शिक्षण आणि नोकरी
प्रा. वाघ ह्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील मोराणे येथे झाला. प्रा. वाघ ह्यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे तीन भाऊ आणि एक बहीण अशा कुटुंबाचे पालनपोषण त्यांच्या आईने कष्टपूर्वक केले.[३] गरिबीमुळे धुळे येथील हरिजन सेवा संघाच्या राजेंद्र छात्रालय ह्या वसतीगृहात त्यांना शिक्षणासाठी ठेवण्यात आले. त्यांचे शालेय शिक्षण उशिरा म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी सुरू झाले. [३] पुणे येथील स. प. महाविद्यालयातून त्यांनी १९६२मध्ये[४] विज्ञानविषयातील पदवी प्राप्त केली. [१] [३]
पदवी प्राप्त केल्यानंतर वाघ ह्यांनी काही काळ कोकणातील नरडावणे येथे शालेय शिक्षक म्हणून काम केले. १९६४पासून १९८१पर्यंत[४] पुणे येथील अशोक विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर पुणे येथील भारतीय शिक्षणसंस्थेत त्यांनी प्रौढशिक्षण विभागात काही काळ काम केले. तसेच पुणे विद्यापीठात प्रौढशिक्षण विभागात चार वर्षे काम केले. विद्यापीठात काम करत असतानाच तेथे गणिताच्या प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या उषाताई कुलकर्णी ह्यांच्याशी त्यांचा परिचय झाला. सामाजिक कार्य करत असताना जातिनिर्मूलनाचा एक मार्ग म्हणून आंतरजातीय विवाह होणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत असल्याने त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि १९८३मध्ये त्यांचा विवाह झाला. [३] नंतरच्या काळात त्यांनी आपल्या पत्नी उषाताई ह्यांच्यासह सामाजिक कार्यात सक्रिय होण्यासाठी विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा दिला.[१] [३]
सामाजिक कार्यातील सहभाग
नोकरी करत असल्यापासूनच वाघ हे सामाजिक कार्यात सहभाग घेत होते. १९६४ ते १९८० ह्या कालावधीत पुण्यातील वडारवाडी ह्या भागातल्या मुलांसाठी त्यांनी बालवाडी चालवली. तसेच सर्वेषा सेवासंघाच्या द्वारे देवदासींच्या मुलांसाठी वसतीगृह स्थापन केले.[४] १९७२मध्ये प्रा. वाघ ह्यांनी समता शिक्षणसंस्थेची स्थापना केली ह्या संस्थेद्वारे त्यांनी तळेगाव ढमढेरे येथे मुलींसाठी कस्तुरबा वसतीगृहाची स्थापना केली. तसेच १९७८मध्ये भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू केली. १९९४मध्ये त्यांनी आपले जन्मगाव मोराणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य-महाविद्यालयाची स्थापन केले.[४]
प्रकाशनकार्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या हेतूने १९७२पासून त्यांनी 'सुगावा' ही प्रकाशनसंस्था सुरू केली. 'माझा भाऊ अण्णाभाऊ' हे ह्या प्रकाशनाद्वारे प्रकाशित करण्यात आलेले पहिले पुस्तक होते. ह्या प्रकाशनाद्वारे नंतर रावसाहेब कसबे, कॉम्रेड शरद पाटील, डॉ. नरेद्र जाधव, डॉ. रूपा कुलकर्णी इ. पुरोगामी चळवळीतील विविध लेखकांचे साहित्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य आणि त्यांच्याविषयीचे विविध साहित्य अशी अनेक पुस्तके ह्या प्रकाशनाद्वारे प्रकाशित करण्यात आली.
तसेच १९७४पासून 'सुगावा' ह्याच नावाचे मासिकही सुरू केले.[४]
संदर्भ
संदर्भसूची
- कसबे, मिलिंद (एप्रिल २०१५). जागतिकीकरण संस्कृति संघर्ष करेल (प्रा. विलास वाघ ह्यांची मुलाखत). २० एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- कांदळकर, राजा (६ एप्रिल २०२१). वाघसर ‘बौद्धमय’, ‘बुद्धमय’ झाले होते. तीच त्यांची जीवनशैली झाली होती, जीवनमार्ग झाला होता. त्यानुसारच ते जगले!. १९ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- जगताप, राम (१२ एप्रिल २०२१). स्व-खुशीनं न-नायकत्व स्वीकारणाऱ्या वाघसरांचा आणि उषाताईंचा ‘स्वॅग’च वेगळा आहे…. २० एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- पालकर, मेधा (२१ मार्च २०२१). ठसा - प्रा. विलास वाघ. २० एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- सपकाळ, अनिल (२८ मार्च २०२१). प्रा. विलास वाघ : प्रागतिकांना जोडणारा कृतीशील ध्येयनिष्ठ. २० एप्रिल २०२१ रोजी पाहिले.