विलयछिद्र
भूपृष्ठाचा काही भाग जेव्हा काही कारणांमुळे भंग पावतो किंवा कोसळतो, तेव्हा जे छिद्र तयार होते त्याला विलयछिद्र किंवा भूछिद्र म्हणतात. अनेक विलयछिद्रे ही चुनखडीचे पाण्यामध्ये विरघळणे यासारख्या कार्स्ट (विद्रावण) प्रक्रियेमुळे घडतात.[१] काही विलयछिद्रे भूपृष्ठाखालील खडकाळ भाग भूजलाबरोबर वाहून गेल्यामुळे निर्माण होणाऱ्या पोकळीमुळे तयार होतात.[२] विलयछिद्रांचा व्यास तसेच खोली १ ते ६०० मी. पर्यंत असू शकते. त्यांचा अंतरभाग मृदेचा किंवा खडकाचा किंवा इतरही पदार्थांचा असू शकतो. विलयछिद्रे अचानक किंवा संथपणे तयार होऊ शकतात, आणि जगात सर्वत्र आढळून येतात.[३] जुलै २०१५ मध्ये शास्त्रज्ञांनी ६७पी/चुरिमोव्ह-गेरासिमेंको या धूमकेतूवरही विलयछिद्रे असल्याचे जाहीर केले.[४][५]
निर्मिती
नैसर्गिक प्रक्रिया
अनेकदा विलयछिद्रे वाहत्या किंवा निश्चल जलस्रोतांच्या पाणलोट क्षेत्रात तयार होतात. पण काही विशिष्ट परिस्थितींत उंच आणि कोरड्या ठिकाणीही ते तयार होऊ शकतात. विद्राव्य खडकांचे झिरपत्या पाण्यामुळे होणारे अपक्षरण[६], गुहेच्या छताचे कोसळणे, भूजल पातळी खालावणे ही विलयछिद्रांच्या निर्मितीची काही नैसर्गिक कारणे आहेत. भूजल वाहताना त्यात खडकांतील ठराविक क्षारे विरघळतात आणि सैल मातीचे कण वाहून जातात. त्यामुळे पोकळी निर्माण होते आणि विलयछिद्र तयार होते. कधीकधी विलयछिद्रांमध्ये भूपृष्ठाखालील गुहांची मुखे असतात, तर कधीकधी एखाद्या मोठ्या विलयछिद्राच्या तळाशी वाहणारी भूमिगत नदीही दिसून येते. पापुआ न्यू गिनी मधील मिन्ये विलयछिद्र आणि अमिरिकेतील सिडार सिंक विलयछिद्र यांमध्ये अशा भूमिगत नद्या आढळून येतात. भूपृष्ठाखालील खडक जर चुनखडी, इतर कार्बोनेट संयुगे, मीठ अथवा जिप्सम यांसारख्या जलविद्राव्य पदार्थांचा बनलेला असेल तर त्यात विलयछिद्रे बऱ्याचदा दिसून येतात.[७] गारगोटी आणि क्वार्टझाईट खडकांच्या प्रदेशांमध्येही ते तयार होतात. खडकाचे कण जसजसे पाण्यात विरघळतात तसतशा भूपृष्ठाखाली पोकळ्या निर्माण होतात. पृष्ठभागाखाली पुरेसा आधार नसेल तर तो अचानक कोसळून विलयछिद्र तयार होते.
अनैसर्गिक प्रक्रिया
मानवी क्रियांमुळेही विलयछिद्रे तयार होतात. वापरात नसलेल्या खाणी कोसळणे, नागरी भागांमधील जुने जमिनीखालचे पाण्याचे पाईप किंवा निचरा वाहून नेणाऱ्या वाहिन्या फुटणे, अतिप्रमाणात भूजल उपसणे ही काही मानवप्रणीत कारणे आहेत. नैसर्गिक जलवहन प्रवृत्तींमध्ये केलेले बदल (उदा. सिंचनासाठी वा वीजनिर्मितीसाठी नदीचे पाणी दुसरीकडे वळविणे) देखील विलयछिद्रांच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतो. कधीकधी अौद्योगिक कारखान्यांतील निचरा साठवण्यासाठी कृत्रिम तळी बांधली जातात. यामुळे पृष्ठभागाच्या रचनेत मोठा बदल होतो आणि पृ़ष्ठभागाखालील खडक कमकुवत असल्यास ती कोसळून विलयछिद्र बनते.
उद्भाव
कार्स्ट भूस्वरूपाच्या परिसरांशी विलयछिद्रांचा संबंध असतो. अशा प्रदेशांमध्ये छोट्या क्षेत्रातही शेकडो विलयछिद्रे असू शकतात, जेणेकरून वरून पाहिल्यावर पूर्ण क्षेत्र छिद्रांनी व्यापलेले दिसते. परिसरातील सर्व पाणी भूपृष्ठाखाली वाहत असल्यामुळे अशा प्रदेशात पृष्ठजल उद्भवत नाही. लाओस देशातील खांमोवान पर्वत आणि पापुआ न्यू गिनीतील मामो पठार ही अशा कार्स्ट भूप्रदेशाची उदाहरणे आहेत.[८] तसेच व्हेनेझुएला देशातील सिमा हंबोल्ट आणि सिमा मार्टेल ही सँडस्टोन (गारगोटी) खडकात तयार झालेली जगातील सर्वात मोठी विलयछिद्रे आहेत.[८] काही विलयछिद्रे एकजिनसी चुनखडकाच्या जाड थरांमध्ये निर्माण होतात. पुष्कळ पावसामुळे विपुल प्रमाणात असलेले भूजल त्यांच्या निर्मितीस अनुकूल ठरते. पापुआ न्यू गिनीतील न्यू ब्रिटन बेटावरील नाकानाई पर्वतांमध्ये अशी बरीच विलयछिद्रे आहेत.[९] चुनखडकाचा त्याखालील अविद्राव्य खडकाशी संपर्क झाल्यास शक्तीशाली भूनद्या आकाराला येऊ शकतात आणि भूपृष्ठाखाली मोठ्या पोकळ्या तयार होऊ शकतात. चीनमधील 'श्याओचाय त्यांकंग' हे ६६२ मी. खोलीचे विलयछिद्र अशाच परिस्थितीत निर्माण झाले आहे. मेक्सिको देशातील क्वेरेटारो आणि सान लुइस पोतोसी राज्यांमध्येही अशीच मोठाली विलयछिद्रे आहेत.[८][१०] मेक्सिकोच्या तामौलिपास राज्यातील झाकाताॅन प्रणालीतील विलयछिद्रांची निर्मिती असामान्य प्रक्रियांमुळे झाली आहे. ज्वालामुखीमुळे उष्ण होणाऱ्या आम्लमय भूजलाची क्रिया येथील २०हून जास्त विलयछिद्रांच्या निर्मितीस कारणीभूत ठरली आहे.[११][१२] येथील झाकाताॅन हे पाण्याने भरलेले जगातील सर्वात मोठे विलयछिद्र आहे. काही विलयछिद्रांच्या वरच्या भागावर ट्रॅव्हर्टाईन खनिजाच्या गाळामुळे विलक्षण अशी 'झाकणे' तयार झाली आहेत.[१२] अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याच्या मध्यभागात वारंवार भूपृष्ठाचा भाग कोसळल्यामुळे विलयछिद्रे तयार होतात. इटलीतील मुर्जे पठारावरही बरीच विलयछिद्रे आहेत. जलाशयात खूप पाऊस पडल्यामुळेही विलयछिद्र निर्माण होऊ शकते.[१३] [further explanation needed]
मानवी कार्यांसाठी उपयोग
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विलयछिद्रांचा अनेक शतकांपासून वापर करण्यात आला आहे. परंतु अशा ठिकाणी भूजलाच्या प्रदूषणामुळे आरोग्यास धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. माया संस्कृतीमध्ये युकातान द्वीपकल्पातील विलयछिद्रांचा वापर मौल्यवान वस्तू साठवण्यासाठी आणि माणसांचा बळी देण्यासाठी करण्यात येत असे.[citation needed] अतिशय खोल किंवा गुहांच्या मुखांना जोडलेली विलयछिद्रे अनुभवी साहसी पर्यटकांसाठी आव्हान म्हणून सामोरी येतात. पाण्याने भरलेली विलयछिद्रे पाणबुड्यांसाठी उपयुक्त ठरतात. मेक्सिकोतील झाकाताॅन, दक्षिण अफ्रिकेतील बुशमन्स होल, व्हेनेझुएलातील सरिसरिनामा पठार, मेक्सिकोतील सोतानो डेल बारो, अाॅस्ट्रेलियातील माउंट गँबियर ही यासाठी प्रसिद्ध अशी स्थळे आहेत. प्रवाळ खडकांंमध्ये असणारी खोल विलयछिद्रे पाणबुड्यांसाठी आकर्षक स्थळे ठरतात.[१४]
स्थानिक नावे
जगातील काही विलयछिद्रांचे त्यांच्या भौगोलिक स्थळानुसार गट पाडून त्यांना खालीलप्रमाणे विशिष्ट नावे दिली गेली आहेत.[१५]
- कृष्णविवरे (Black holes) – बहामासमधील पाण्याने भरलेल्या विशिष्ट विलयछिद्रांच्या समूहाला हे नाव दिले आहे. समुद्रपाण्यामुळे कार्बोनेटच्या मातीत पृष्ठाचा काही भाग विरघळल्यामुळे ती तयार झाली आहेत. छिद्रातील पाण्यात १५ ते २० मी. खोलीवर प्रकाश शोषून घेणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या थरामुळे निर्माण झालेला जांभळ्या रंगाचा पट्टा आहे. या सूक्ष्मजीवांच्या चयापचय क्रियेमुळे पाणी उष्ण होते. या एकमेव बाबतीत सूक्ष्मजीवांच्या क्रिया लक्षणीय अौष्णिक परिणाम घडवून आणतात. अँड्रोसचे कृष्णविवर हे असे एक उदाहरण आहे.[१६]
- नीलविवरे (Blue holes) – बहामासमधील खोल जमिनीखालील विलयछिद्रांना हे नाव मुळात देण्यात आले, पण कुठल्याही कार्बोनेट खडकातील खोल पाण्याने भरलेल्या विवरांना नीलविवर म्हणतात. अशा खोल विलयछिद्रातील स्वच्छ पाणी गडद निळ्या रंगाचे दिसते. प्रकाशाच्या दृश्य वर्णपटातील केवळ गडद निळ्या रंगाचा प्रकाश विलयछिद्रातून परावर्तित होऊन बाहेर पडतो.
- सेनोटी (Cenotes) – मध्य अमेरिकेतील युकातान द्वीपकल्प, बेलीझ इ. प्रदेशांमध्ये आढळून येणाऱ्या विशिष्ट पाण्याने भरलेल्या विलयछिद्रांना सेनोटी असे म्हणतात. उथळ सागरी भागात चुनखडीच्या निक्षेपणामुळे अनेक सेनोटी तयार झाले आहेत.
- सोतानो (Sótanos) – मेक्सिकोच्या अनेक राज्यांमधील मोठाल्या भूविवरांना सोतानो असे म्हणतात.
- त्यांकंग (Tiankengs) – चीनी भाषेत 'त्यांकंग' शब्दाचा अर्थ 'आकाशातील पोकळी' असा होतो. त्यांकंग २५० मी. पेक्षा खोल आणि रुंद असतात आणि त्यांना जवळपास लंबकोनी कडा असतात. ते भूमिगत गुहा कोसळल्यामुळे तयार होतात.[१७]
- टोमो (Tomo) – न्यू झीलंडच्या कार्स्ट प्रदेशातील विलयछिद्रांना टोमो म्हणतात.
कृत्रिम कार्स्ट
मे २०१० मध्ये ग्वातेमाला सिटीमध्ये 'अगाथा' वादळामुळे झालेली अतिवृष्टी आणि खराब झालेल्या मलनिःसारण प्रणालीमुळे विलयछिद्र तयार झाले. एका घराला आणि एका तीन मजली इमारतीला त्याने गिळंकृत केले. विलयछिद्र २० मी. रुंदीचे आणि ३० मी. खोलीचे होते. फेब्रुवारी २००७ मध्येही जवळच असेच दुसरे विवर तयार झाले होते.[१८][१९][२०] वस्तुतः कुठल्याही खडकाच्या विद्रावणामुळे निर्माण झालेले नसल्यामुळे त्याला विलयछिद्र म्हणता येणार नाही.[२१][२२] ग्वातेमाला सिटीच्या भूपृष्ठाखाली ज्वालामुखीची राख आणि ज्वालामुखीनिर्मित खडकांचे जाड थर आहेत. त्यांच्या विद्रावणामुळे ग्वातेमाला सिटीमधील विवरे निर्माण झाली नाहीत.[२१] उलट, या नाजूक खडकांत निर्माण झालेल्या मोठ्या पोकळ्या कोसळल्यामुळे ही विवरे तयार झाली. नाजूक असतानाही या खडकांमध्ये पोकळ्या निर्माण होऊ शकतात. पाण्याच्या पाइपांतून गळणाऱ्या पाण्याने ज्वालामुखीच्या निक्षेपातील बरीक राख वाहून नेली. त्यामुळे खडकात पोकळ्या तयार झाल्या. त्यानंतर अधिक खडबडीत पदार्थांचे अपक्षरण घडवून आले. हळूहळू या पोकळ्या कोसळण्याइतपत मोठ्या झाल्या.[२१]
उदाहरणे
जगातील काही मोठ्या विलयछिद्रांची उदाहरणे खंडानुसार खाली नमूद केली आहेत.[८]
अफ्रिका
- ब्ल्यू होल - १३० मी. खोलीचे दहाब, इजिप्त येथील समुद्रपातळीखालील नीलविवर. ते लाल समुद्राच्या किनाऱ्यावर असून त्याच्या व समुद्राच्या कडेवर ६० मी. उंचीची नैसर्गिक कमान आहे.[२३]
- बुशमन्स होल - दक्षिण अफ्रिकेतील २९० मी. खोलीचे विलयछिद्र[२४]
- काशिबा सरोवर - झांबिया देशातील १०० मी. खोलीचे आणि ३.५ हेक्टर क्षेत्रफळाचे विलयछिद्र.
आशिया
- अखायात विलयछिद्र - १५० मी. व्यासाचे आणि ७० मी. खोलीचे तुर्कस्तानातील विलयछिद्र
- बामा विलयछिद्र - ओमानमधील ३० मी. खोलीचे विलयछिद्र[२५]
- दाशिवेई त्यांकंग - चीनच्या क्वांक्शी प्रांतातील ६१३ मी. खोलीचे विलयछिद्र. त्याच्या तळाशी दुर्मिळ प्रजातींचे वन आहे.
- श्याओचाय त्यांकंग - चीनच्या चोंगचिंग शहराजवळचे ६६२ मी. खोलीचे विलयछिद्र
- सायबेरियामध्ये यमल द्वीपकल्पावर एका ८० मी. रुंदीच्या विलयछिद्राचा २०१४ मध्ये शोध लागला. [२६]
- तेक विलयछिद्र - ओमानमधील ९,००,००,००० मी३ घनफळाचे विलयछिद्र. हे जगातील घनफळानुसार सर्वात मोठ्या विलयछिद्रांपैकी एक असून त्याची खोली २५० मी. आहे.
- रशियाच्या बेरेझनिकी शहराजवळ आणि शहराच्या इमारती, रस्ते आणि रेल्वे रुळांच्या खाली बरीच विलयछिद्रे आहेत.
- आंध्र प्रदेशात अनंतपूर शहराजवळ नदीच्या तळाशी विलयछिद्रे आहेत.
कॅरिबियन समुद्र
- डीन्स ब्ल्यू होल - बहामास देशातील २०३ मी. खोलीचे विलयछिद्र. हे समुद्राखालील ज्ञात असलेले सर्वात खोल विलयछिद्र आहे.
मध्य अमेरिका
- ग्रेट ब्ल्यू होल - बेलीझ देशातील १२४ मी. खोलीचे विलयछिद्र. त्यात अत्यंत खोल स्तरांवर अधोमुखी लवणस्तंभ आहेत.
- २००७ चे ग्वातेमाला सिटीतील विलयछिद्र
- २०१० चे ग्वातेमाला सिटीतील विलयछिद्र
युरोप
- पोझो डेल मोरो - रोम, इटलीजवळचे ४०० मी. खोलीचे विलयछिद्र. त्याचे मुख एका ८० मी. खोलीच्या गर्तेत आहे.
- लाल सरोवर - क्रोएशिया मधील ५३० मी. खोलीचे विलयछिद्र. त्यात २८० मी. खोलीवर सरोवर आहे.
- वोलियाग्मेनी - ग्रीस देशातील ३५.२ मी. खोलीचे आणि १५० मी. रुंदीचे विलयछिद्र
- पोल्डरगॅडेरी - आयरलँडमधील ८० मी. व्यासाचे आणि ३० मी. खोलीचे विलयछिद्र.
उत्तर अमेरिका
मेक्सिको
- केव्ह आॅफ स्वाॅलोव्ह्ज - सान लुइस पोतोसी राज्यातील ३७२ मी. खोलीचे विलयछिद्र
- सिमा डे लास कोटोरास - च्यापास राज्यातील १६० मी. रुंदीचे आणि १४० मी. खोलीचे विलयछिद्र. त्यात प्राचीन पाषाणचित्रे आढळून येतात.
- सोतानो डेला ल्युका - च्यापास राज्यातील विलयछिद्र. त्याच्या तळावर एका गुहेतून जाता येते.
- सोतानो डेल बारो - क्वेरेतारो राज्यातील ४१० मी. खोलीचे विलयछिद्र
- झाकातोन - तामौलिपास राज्यातील ३३९ मी. खोलीचे विलयछिद्र. हे जगातील सर्वात खोल पाण्याने भरलेले विलयछिद्र आहे. [further explanation needed]
अमेरिकेची संयुक्त राज्ये
- बेयो काॅर्न - लुइसियाना राज्यातल २५ एकर क्षेत्रफळाचे आणि २३० मी. खोलीचे विलयछिद्र[२७]
- दि ब्ल्यू होल - न्यू मेक्सिको राज्यातील विलयछिद्र. त्याच्या मुखाचा व्यास २४ मी. तर तळाचा व्यास ४० मी. आहे.
- डायसेट्टा - टेक्सास राज्यात डायसेट्टाजवळ अनेक विलयछिद्रे आहेत. सर्वात नवीन विलयछिद्र २००८ मध्ये तयार झाले. त्याचा व्यास १९० मी. असून खोली ४६ मी. आहे.[२८][२९]
- डेव्हिल्स मिलहाॅपर - फ्लोरिडा राज्यातील ३७ मी. खोलीचे आणि १५० मी. रुंदीचे विलयछिद्र. त्याच्या तळाशी १२ झरे आणि एक तळे आहे.[३०]
- ग्रासी कोव्ह - टेनेसी राज्यातील १३.६ किमी२ क्षेत्रफळाचे आणि ४२.७ मी. खोलीचे विलयछिद्र [३१]
- जिप्सम विलयछिद्र - युटा राज्यातील कॅपिटाॅल रीफ राष्ट्रीय उद्यानातील एक विलयछिद्र. त्याचा व्यास १५ मी. आणि खोली ६० मी. आहे.[३२]
- किंग्जले सरोवर - फ्लोरिडा राज्यातील ८.१ किमी२ क्षेत्रफळाचे आणि २७ मी. खोलीचे जवळजवळ वर्तुळाकार विलयछिद्र
- पेइन्योर सरोवर - लुइसियाना राज्यातील मूळ १४२ मी. खोलीचे विलयछिद्र. डायमंड क्रिस्टल खाण कोसळल्यानंतर त्याची खोली ४३ मी. आहे. [citation needed] [३३]
- बाल्टिमोर - मेरीलँड राज्यातील या शहरात ३० एप्रिल २०१४ या दिवशी अतिवृष्टीमुळे एक रस्ता कोसळून विलयछिद्र तयार झाले.[३४]
ओशेनिया
- हारवुड होल - न्यू झीलंडमधील आबेल तास्मान राष्ट्रीय उद्यानातील १८३ मी. खोलीचे विलयछिद्र
- मिन्ये - पापुआ न्यू गिनीतील ५१० मी. खोलीचे विलयछिद्र. त्याच्या तळाशी वाहणारा एक झरा आहे.
दक्षिण अमेरिका
- सिमा हंबोल्ट - व्हेनेझुएला देशातील सँडस्टोन खडकातील जगातील सर्वात मोठे विलयछिद्र. त्याची खोली ३१४ मी. आसून तळाशी जंगल आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ Lard, L., Paull, C., & Hobson, B. (1995).
- ^ "Caves and karst – dolines and sinkholes".
- ^ Kohl, Martin (2001).
- ^ Vincent, Jean-Baptiste; et al. (2 July 2015).
- ^ Ritter, Malcolm (1 July 2015).
- ^ Friend, Sandra (2002).
- ^ "Sinkholes in Washington County" Archived 2011-03-23 at the Wayback Machine..
- ^ a b c d "Largest and most impressive sinkholes of the world".
- ^ "Naré sinkhole".
- ^ Zhu, Xuewen; Chen, Weihai (2006).
- ^ "Sistema Zacatón". by Marcus Gary.
- ^ a b "Sistema Zacatón".
- ^ "Sinkholes, Blue Holes".
- ^ Rock, Tim (2007).
- ^ "Sinkholes".
- ^ "Black Hole of Andros".
- ^ Waltham, Tony; Bell, Fred; Culshaw, Martin (2005).
- ^ Fletcher, Dan (June 1, 2010).
- ^ Vidal, Luis; Jorge Nunez (2 June 2010).
- ^ Than, Ker (June 1, 2010).
- ^ a b c Waltham, T. (2008).
- ^ Halliday, W.R. (2007).
- ^ Halls, Monty; Krestovnikoff, Miranda (2006).
- ^ Beaumont, P.B.; Vogel, J.C. (May–June 2006).
- ^ "Bimmah sinkhole".
- ^ Large crater appears at the 'end of the world' The Siberian Times, July 15, 2014
- ^ Wines, Michael (September 25, 2013).
- ^ Horswell, Cindy (January 5, 2009).
- ^ Blumenthal, Ralph (May 9, 2008).
- ^ "Devils Millhopper Geological State Park" Archived 2015-01-02 at the Wayback Machine..
- ^ Dunigan, Tom.
- ^ "Cathedral Valley – Capitol Reef National Park".
- ^ YouTube-Mysterious Louisiana Sinkhole Drains Entire Lake
- ^ Block-long chunk of street collapses in Baltimore AOL.com article, April 30, 2014
बाह्य दुवे
- US Geological Survey Water Science School page about sinkholes (इंग्रजी मजकूर)
- Daily Telegraph slide show of 31 sinkholes (इंग्रजी मजकूर)
- Video of Sinkhole forming in Texas (May 8, 2008) (इंग्रजी मजकूर)
- Google map of deepest "hole" for each state (Andy Martin) (इंग्रजी मजकूर)
- Tennessee sinkholes 54,000+ sinkholes (इंग्रजी मजकूर)
- James, Vincent (February 18, 2014). "What are sinkholes, how do they form and why are we seeing so many?". The Independent.co.uk. Retrieved 19 February 2014.