Jump to content

विनीता पवनीकर

विनिता विवेक पवनीकर या अमेरिकेतील २६ विशेष निष्णात स्त्री अभियंत्यांपैकी एक आहेत.[]

शिक्षण

विनीता पवनीकर या नागपूरच्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्माला आल्या. वडलांचे नाव शिवाजीराव गोंगाडे. आधी त्या मुंबईत त्या न्यू सायन महानगरपालिका शाळेच्या मराठी माध्यमात सहावीपर्यंत शिकल्या. वडिलांच्या सरकारी फिरतीच्या नोकरीमुळे त्यांचे पुढचे शालेय शिक्षण अकोला व नागपूर या शहरांतून झाले.

विनीता गोंगाडे महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागपूरच्या मेहता सायन्स कॉलेजमध्ये गेल्या. बारावीत गुणवत्ता यादीत आल्यावर व्यावसायिक शिक्षणासाठी त्यांनी नागपूरच्या विश्वेश्वरय्या रीजनल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये (आताचे व्हीएनआयटी) इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल शाखेत प्रवेश घेतला आणि त्या अंतिम परीक्षेत सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या.

नोकऱ्या

विनीता पवनीकर यांनी सुरुवातीला मुंबईतील ‘बेस्ट’ कंपनीत आणि नंतर टाटा ग्रुपच्या ‘नेल्को’ कंपनीत अभियंता म्हणून नोकरी केली. त्यानंतर त्या झेनिथ काँप्युटर्समध्ये गेल्या व डेव्हलेपमेंट मॅनेजर झाल्या.

१९९३ साली सॉफ्टवेर व्यवसायाला प्रचंड मागणी होती, त्या दरम्यान विनीताला जर्मनीतल्या सिमेन्स इन्फॉम्रेशन सिस्टिम्स् लिमिटेड या कंपनीत कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित सॉफ्टवेर प्रकल्पात काम करण्याची संधी चालून आली. त्या अनुषंगाने त्यांना जर्मनीत काम करायला मिळाले. ‘सिमेन्स’मध्ये काम करीत असतानाच त्यांचे लग्न झाले आणि त्यांना एक मुलगीही झाली.

पुढच्या आव्हानात्मक संधीच्या शोधात विनीता पवनीकर अमेरिकेत गेल्या आणि तेथे त्यांनी सायबेस, मायक्रोसॉफ्ट, व्ही.एम. वेर व शेवटी ओरॅकलसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये काम केले. २००५ साली विनीता सॉफ्टवेर डेव्हलपमेंटचे काम सोडून एन्टरप्राइज मॅनेजर झाल्या. पुढील १० वर्षात हजाराहून अधिक सॉफ्टवेरनिर्मिती करणाऱ्या संघाच्या रिलीज मॅनेजमेंट व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची जबाबदारी सांभाळत त्यांनी दोनशेच्यावर रिलीज हाताळले.

पती आणि कुटुंब

विनीताचे पती विवेक पवनीकर, मुंबईच्या आय.आय.टी. संस्थेचे पदवीधर तसेच उत्तम चित्रकार आहेत. ते सध्या ‘ओरॅकल’मध्ये सीनिअर डायरेक्टर (डेव्हलपमेंट) आहेत. त्यांची कन्या कार्नेजीमेलन या जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटीची पदवीधर असून सध्या अमेरिकेतील रॉकेट लॉयर या कंपनीत सीनिअर प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करीत आहे.

सन्मान

आज २०१६ साली आज विनीता पवनीकर सॉफ्टवेरमधील जगप्रसिद्ध ‘ओरॅकल’ कंपनीच्या प्रोग्राम मॅनेजमेंटच्या व्हाइस प्रेसिडेंटपदावर असून ‘गुगल’च्या डायन ग्रीन, ‘मायक्रोसॉफ्ट’च्या एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेन्ट पेगी जॉन्सन, ‘अ‍ॅपल केअर’च्या व्हाइस प्रेसिडेंट तारा बंच यांच्यासारख्या अतिशय कर्तबगार स्त्रियांसोबत अमेरिकेतील विशॆष निष्णात स्त्री अभियंत्यांमध्ये त्यांची निवड झाली आहे. ‘बिझनेस इनसायडर’ या नियतकालिकाने निवडलेल्या २६ जणाच्या या यादीत त्यांचा क्रमांक १४वा आहे.

संदर्भ

  1. ^ "झेप". Loksatta. 25 मे 2020 रोजी पाहिले.