Jump to content

विद्याभारती

विद्याभारती  : सामाजिक दृष्टीकोनातून शिक्षणाचा अभ्यास व संशोधन करणारी महाराष्ट्रातील संस्था. सध्याचे नाव ‘भारतीय शिक्षणसंस्था’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन). ज्येष्ठ शिक्षणतज्ञ जे. पी. नाईक यांनी १९४८ मध्ये मुंबई येथे या संस्थेची स्थापना केली. स्वतंत्र भारताची राष्ट्रीय शैक्षणिक प्रणाली विकसित करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक धोरण आणि नियोजन यासंबंधीचा अभ्यास व विद्यापीठीय दर्जाचे संशोधन करण्याची उद्दिष्टे यासंस्थेच्या स्थापनेमागे होती. मुंबई विद्यापीठाशी संलग्नता प्राप्त झालेल्या या संस्थेने एम्.एड्. आणि पीएच्.डी. हे अभ्यासक्रम राबवले, प्राथमिक शिक्षण केंद्रस्थानी ठेवून महत्त्वपूर्ण संशोधन केले आणि इंडियन जर्नल ऑफ एज्युकेशनल रिसर्च हे नियतकालिकही चालवले. रा. वि. परूळेकर, जे. पी. नाईक, व्ही. व्ही. कामत, के. जी. सैय्यद्दिन, टी. के.एन्, मेनन, ग. श्री. खैर, ए. आर्. दाऊद, सुलभा पाणंदीकर, माधुरी शाह यांसारख्या शिक्षणतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्य भरभराटीस आले. १९६० च्या सुमारास मानवी आणि आर्थिक संसाधनांच्या अभावी संस्थेला अनेक कार्यक्रम आवरते घ्यावे लागले. तथापि पुढे १९७५-७६ मध्ये आंतरशास्त्रीय शिक्षणाचे केंद्र म्हणून पुनरूत्थापन करण्यात आले. १९७६ साली संस्थेचे मुख्यालय मुंबईहून पुण्यास आणण्यात आले. संस्थेचे स्थलांतर पुण्याला झाल्यावर ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ला ‘विद्याभारती’ हे पर्यायी मराठी नाव देण्यात आले. परंतु हेच नाव अन्य संस्थेचे आहे, असे लक्षात आल्यानंतर मूळ इंग्रजी नावच अधिकृत म्हणून पुढे चालू ठेवण्यात आले. ‘भारतीय शिक्षणसंस्था’ हे सध्याचे पर्यायी नाव असले, तरी इंग्रजी नाव अद्यापही अधिकृत मानले जाते. १९७९ मध्ये पुणे येथे आंतरशाखीय एम्.फिल्. आणि पीएच्.डी. हे शिक्षणक्रम चालविणारे ‘शिक्षणाभ्यास केंद्र’ व मुंबई येथे तशाच स्वरूपाचे ‘जी.डी.पारीख शिक्षणाभ्यास केंद्र’ ही स्थापण्यात आली. या दोन्ही केंद्रांना विद्यापीठीय मान्यता मिळाली. शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख साधन असल्याने त्याचा सर्वदूर प्रसार व्हावा व त्याद्वारे आरोग्यादी सार्वजनिक कल्याणाच्या विविध योजना व उपक्रम राबवता यावेत, या हेतूने संस्थेचा कार्यविस्तार करण्यात आला आणि कार्याचे नियोजन करण्यासाठी आठ विभागीय केंद्रे स्थापण्यात आली. ही केंद्रे पुढीलप्रमाणे :

अ) शिक्षणाभ्यास केंद्र : एम् फिल. व पीएच्.डी. या आंतरशाखीय शिक्षणक्रमाबरोबरच, पर्यायी धोरणे आणि कार्यक्रम विकसित करण्यासाठी शिक्षणाचे नियोजन आणि व्यवस्थापन या क्षेत्रात कृतिसंशोधनाचे कामही या केंद्रातर्फे चालते.

(आ) अनौपचारिक शिक्षणासाठी राज्य साधन केंद्रे : अनौपचारिक शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि निरंतर शिक्षण या क्षेत्रांत प्रशिक्षण, साहित्यनिर्मिती, कृतिसंशोधन आणि तज्ज्ञ-सल्ला पुरविण्याचे काम या केंद्रातर्फे केले जाते. या साधन केंद्राला जोडून एका अनौपचारिक शिक्षणकक्ष असून, महाराष्ट्रातील अशासकीय संस्थांना प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरांतील शालाबाह्य विद्यार्थ्यांचे अनौपचारिक शिक्षणवर्ग चालविण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. १९७९ पासून अनौपचारिकशिक्षणासंबंधी केंद्राने केलेल्या कृतिसंशोधनातून तयार झालेल्या अनौपचारिक कार्यक्रम ‘आय्. आय्. ई. मॉडेल’ म्हणून प्रसिद्ध असून, काही राज्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. संस्थेच्या अध्याक्षा व राष्ट्रीय नियोजन मंडळाच्या सदस्या चित्रा नाईक.यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासंबंधी १३७ खेड्यांतून राबविला गेलेला ‘प्रॉपेल’ प्रकल्प खूपच यशस्वी ठरला. यूनेस्कोने त्याची आशिया खंडातील अन्य विकसनशील देशांसाठी आदर्श प्रकल्प म्हणून शिफारस केली.

(इ) विज्ञानाधिष्ठित ग्रामविकास केंद्र : ग्रामीण जीवन अधिक सोयी-सुविधापूर्ण करण्याच्या दृष्टीने विज्ञान आणि तंत्रविद्या यांचा दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कसा उपयोग करता येईल, याचे प्रात्यक्षिक व प्रसार करण्यासाठी हे केंद्र स्थापन करण्यात आले. ज्वलनातून मिळणारी ऊर्जा काटकसरीने कशी वापरता येईल, आरोग्याला पोषक अशा धूरविरहीत चुली कशा बनविता येतील, बागाईत कशी सुधारता येईल, शेती आणि वनशेती यांत सुधारणा घडवून उत्पन्न कसे वाढविता येईल, नवोपाय योजनेतून कुटिरोद्योग व अन्य लघुउद्योग कसे उभारता येतील इ. बाबींचा प्रयोग, प्रकल्प आणि प्रात्यक्षिके यांच्याद्वारे प्रभावी रीत्या प्रसार करण्याचे काम हे केंद्र करते.

(ई) विज्ञानाश्रम : पाबळ (जि. पुणे) ह्या दुष्काळी भागात हे केंद्र असून, ग्रामीण भागातील गरजा विज्ञान व तंत्रविद्या यांच्या साहाय्याने कशा पुर्या) करता येतील व स्वयंरोजगार कसा निर्माण करता येईल, हे शालेय शिक्षण अर्धवट सोडलेल्या तरुणांना येथे अनौपचारिक पद्धतीने शिकवले जाते. या अभ्यासक्रमात कुक्कुटपालन, ग्रामीण तंत्रज्ञान, नळदुरुस्ती, सुतारकाम, रक्त-मलमूत्र-तपासणी, भूमिगत पाणी संशोधन इ. विषयांचा अंतर्भाव होतो.

(उ) श्रमिक विद्यापीठ : शहरी व असंघटित कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या प्रशिक्षणाची व सर्वांगीण विकासाची जबाबदारी हे केंद्र पार पाडते. स्त्रिया आणि कामगार मुले यांना शिक्षण देऊन स्वावलंबी व सक्षम बनवण्यावर या केंद्राचा भर आहे.

(ऊ) जी. डी. पारीख शिक्षणाभ्यास केंद्र : मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी, कालिना परिसरात हे केंद्र आहे. शहरी शिक्षणाच्या समस्या, विशेषतः झोपडपट्टीवासियांचे प्राथमिक शिक्षण आणि कौशल्यप्रशिक्षण हे ह्या केंद्राचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे.

(ए) जे. पी. नाईक शिक्षण आणि विकास केंद्र : आदिवासी व ग्रामीण जनतेच्या शिक्षणाच्या आणि कृतिशीलतेच्या द्वारे, ग्रामीण विकासाचे नियोजन करण्याच्या हेतूने व्यापक क्षेत्राभ्यास आणि कृतिसंशोधन आयोजित करण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली. पंचायत राज्यव्यवस्थेतील प्रशासकीय व आर्थिक विकेंद्रीकरण्याच्या भूमिकेला पोषक ठरण्याच्या दृष्टीने स्थानिक जनतेच्या क्षमता विकसित करण्यावर या केंद्रामध्ये भर दिला जातो. स्थानिक जनतेमध्ये आपल्या सामाजिक-आर्थिक व राजकीय परिस्थितीचे पुनर्घटना आणि नियोजन करण्याच्या दृष्टीने जागरूकता व सामर्थ्य निर्माण व्हावे, म्हणून अनौपचारिक शिक्षणाद्वारे अनेक प्रयोग हाती घेतले जातात. या केंद्रातर्फे ‘ॲस्ट्रा’ नावाचा नवा प्रकल्प सुरू असून, देशभर नवे पर्याय देणाऱ्या ५२० स्वयंसेवी संस्थांमध्ये संवाद निर्माण करण्यासाठी नवोपाययोजना व प्रयोग यांद्वारे साधना-साहाय्य दिले जाते. दिसरा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ११० पंचायतींना स्थानिक नियोजनाबाबत केले जाणारे उद्‌बोधन होय.

(ऐ) वनिता विकासिनी : ग्रामीण स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय समस्यांचा संशोधनात्मक अभ्यास व प्रशिक्षण यांवर या केंद्रात भर दिला जातो. खेड-शिवापूर (जि.पुणे) येथे हे केंद्र वसलेले असून निवास, चर्चाकक्ष इ. सुविधा येथे उपलब्ध आहेत. पंचायतीव तत्सम माध्यमातून प्रयोगात्मक कार्यक्रम विकसित करण्यासाठी दोनशे गावांची प्रयोगशाळा या केंद्राला उपलब्ध आहे. देशात अन्य ठिकाणी यांसारखे प्रयोग करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ‘प्रात्याक्षिक क्षेत्र’ म्हणूनही या भागाचा उपयोग केला जातो.


याखेरीज संस्थेमार्फत साक्षरता, साक्षरोत्तर प्रगत शिक्षण, अनौपचारिक शिक्षण हे कार्यक्रम राबवण्यासाठी मुंबई व पुणे येथे जिल्हासाधन केंद्रे स्थापण्यात आली आहेत. शिक्षण आणि विकास या क्षेत्रांत काम करणाऱ्या अन्य संघटना, तसेच समाजातील बुद्धिमंत, कार्यकर्ते व नागरिक यांच्याशी संवाद साधण्याच्या दृष्टीने संस्थेतर्फे व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा इ. उपक्रम योजले जातात. उदा., ‘आचार्य भागवत चर्चासत्र’ व ‘रामभाऊ परूळेकर व्याख्यानमाला’ या राज्य पातळीवर, तर ‘जे. पी. नाईक स्मृति-चर्चासत्र’ राष्ट्रीय पातळीवर आयोजित केले जाते. संस्थेमार्फत अनेक संशोधन-अहवाल आणि विचारप्रवर्तक पुस्तके इंग्रजी व मराठी भाषांतून प्रसिद्ध केली जातात. उदा., हेल्थ फॉ द ऑल बाय द थिअर टू थाअजंड : ॲन ऑक्टरनेटिव्ह स्ट्रॅटेजी डिव्हेलपिंग नॉनफॉर्मल, प्रायमरी एज्युकेशन अ रिवार्डिंग एक्सपीरिअन्स एज्युकेशन कमिशन अँड आफ्टर एज्युकेशन रिफॉर्म इन इंडिया : १९१९-१९८० (पाच खंड) इंडियन एज्युकेशन इंडेक्स प्रॉपेल प्रोव्हेक्ट इत्यादी. तसेच जर्नल ऑफ एज्युकेशन अँड सोशल चेंज व शिक्षण आणि समाज ही त्रैमासिकेही वाचकांच्या व कार्यकर्त्यांच्या विविध गरजा लक्षात घेऊन प्रसिद्ध केली जातात.

महाराष्ट्रातील विविध संघटना आणि विद्यापीठे यांच्या सहकार्याने संस्थेच्या विस्तार-सेवायोजनेअंतर्गत सर्वांसाठी शिक्षण व सर्वांसाठी आरोग्य हे उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे संस्थेमार्फत विविध राज्यांतील शासकीय व खाजगी संघटनांना तज्ज्ञसल्ला आणि साधन-साहाय्यही पुरविले जाते. उदा., किमान अध्ययन पातळीसंबंधात राजस्थान येथील ‘लोकजुम्बिश’ ही स्वयंसेवी संस्था, गुजरातमधील गुजरात विद्यापीठ आणि बिहारमधील ‘बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट’ यांना संस्थेमार्फत सध्या तज्ज्ञसल्ला व साधनसाहित्य पुरविले जाते. त्याचप्रमाणे संस्थेला अनौपचारिक शिक्षण आणि शिक्षणातील प्रयोग व पर्याय यांबाबत राष्ट्रीय साधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे, तसेच ‘एपीड’ (एशियन प्रोग्रॅम फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन्स अँड डिव्हेलपमेंट) या यूनेस्कोच्या कार्यक्रमांतर्गत उपविभागीय केंद्र म्हणूनही मान्यता लाभली आहे. यूनेस्कोच्या वतीने संस्थेने आशियाई देशाच्या प्रतिनिधीकरिंता चर्चासत्रे, कार्यशाळा इ. आयोजित केल्या आहेत.