Jump to content

विद्याधर गंगाधर पुंडलिक

मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी.

आयुष्य

पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दुःख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकातल्या मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात त्यांनी त्या दिवसांबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे.

रागिणी पुंडलिक या विद्याधर पुंडलिकांच्या पत्नी. त्याही लेखिका होत्या. त्यांचे निधन ६ मे २०१९ रोजी झाले.

साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा, पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असे नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला.
आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही, मात्र मनापासून वाटले तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचे आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचे व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपले.

विद्याधर पुंडलिक यांनी लिहिलेली पुस्तके

  • आवडलेली माणसे (आवडलेल्या दहा माणसांचे व्यक्तिचित्रण)
  • कुणीकडून कुणीकडे (नाटक)
  • चक्र (एकांकिका संग्रह)
  • चार्वाक (नाटक)
  • चौफुला (एकांकिका संग्रह)
  • टेकडीवरचे पीस (कथासंग्रह)
  • तिरंदाजी
  • देवचाफा (कथासंग्रह)
  • धर्माचे समाजशास्त्र
  • पोपटी चौकट (कथासंग्रह)
  • फॅन्टासिया (कथासंग्रह)
  • बहर
  • मरणगंध
  • माता द्रौपदी (रंगभूमीवर प्रयोग झालेले नाटक)
  • माळ (कथासंग्रह)
  • शाश्वताचे रंग (समीक्षात्मक)
  • श्रद्धा
  • सती (वि.दा.सावरकरांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित कादंबरी

विद्याधर पुंडलिकांची सती

विद्याधर पुंडलिकांची ’सती’ ही दीर्घकथा सत्यकथेच्या १९७४ सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित त्यांच्या या कथेवरून मोठे वादळ उठले होते. पुंडलिकांच्या तोंडाला काळे फासण्यापर्यंत सावरकरभक्तांची मजल गेली होती. विचित्र योगायोग म्हणजे, स्वतः पुंडलिक सावरकरांचे चाहते व हिंदुत्ववादी प्रकृतीचे होते. पण या हल्ल्यामुळे ते डगमगले नाहीत. त्यामुळे सत्यकथेचे संपादक श्री.पु. भागवत आणि पुंडलिक यांना कोर्टातही खेटे मारावे लागले. पण दोघांनीही तडजोडवादी भूमिका घेतली नाही.