Jump to content

विद्याधर ओक

विद्याधर ओक
पार्श्वभूमी ची माहिती
जन्मनाम विद्याधर गोपाळ ओक
जन्म ३० मे, १९५२ (1952-05-30) (वय: ७२)
मुंबई, भारत
निवासमहाराष्ट्र, भारत
शैली औषधशास्त्र, भारतीय शास्त्रीय संगीत, संगीतशास्त्र, ज्योतिषशास्त्र
व्यवसाय हार्मोनियमवादक, संशोधक, वक्ता, लेखक, सल्लागार, संगीत दिग्दर्शक
सक्रिय वर्ष १९७२- वर्तमान
जालपृष्ठwww.22shruti.com


विद्याधर ओक (ज. १९५२) हे एक भारतीय औषध शास्त्रातले डॉक्टर, संगीतशास्त्रज्ञ, हार्मोनियम वादक, ज्योतिष सल्लागार तसेच भविष्यनिर्माण समुपदेशक आहेत. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील २२ श्रुतींवर (मायक्रोटोन्स) संशोधन केले असून जगातील एकमेव [] २२ श्रुती हार्मोनियम निर्माण केली आहे.


सुरुवातीचे जीवन

डॉ. ओक हे मुंबई विद्यापीठाचे एम.बी.बी.एस् व एम. डी. (औषधशास्त्र) पदवीधर असून नंतर त्यांचे उच्च प्रशिक्षण लंडनमधील वेलकम ट्रस्ट (नैदानिक संशोधन/ क्लिनिकल रिसर्च), लंडन बिझनेस स्कूल (व्यवस्थापन) आणि अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना मधील ड्यूक विद्यापीठ येथे झाले. []. डॉ.ओकांच्या सुदैवाने त्यांना वेलकम रिसर्च लॅबोरेटरीज, बेकनहॅम, युके येथे प्रशिक्षण घेण्याचे भाग्य लाभले; जेथे पाच नोबेल पुरस्कार विजेत्यांनी एकाच वेळी काम केले होते. रघुनाथ अनंत माशेलकर यांनी आयोजित केलेल्या युवा संशोधक बैठकीमध्ये (‘यंग सायंटिस्ट्स मीट’) मध्ये डॉ. ओक यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. डॉ. ओकांनी प्रदीर्घ काळ औषध क्षेत्रातील उद्योगज़गतात सेवा बजावली. वोखार्ड, ग्लॅक्सो, पिरामल ग्रुप या कंपन्यात 'वैद्यकीय संचालक' व 'अध्यक्ष ' या पदांचा कार्यभार त्यांनी सांभाळला. वयाच्या ५२ व्या वर्षी ते अध्यक्ष पदावरून सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी पूर्ण वेळ संगीत संशोधनात स्वतःला वाहून घेण्याचा निर्णय घेतला.[][][]

डॉ.ओक यांचे सुरुवातीचे शिक्षण राजा शिवाजी विद्यालय (पूर्वीचे किंग जॉर्ज हायस्कुल) आणि रामनारायण रुईया महाविद्यालय येथे झाले. त्यानंतर किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय येथून त्यांनी पदवी प्राप्त केली. शालेय जीवनात असताना डॉ ओक यांची पहिल्यावहिल्या भारतीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे (इंडियन चेस चॅम्पियनशिप) विजेतेपद पटकावणाऱ्या रामचंद्र सप्रे यांच्यासोबत बुद्धिबळ खेळण्यासाठी निवड झाली होती. डॉ. ओक यांनी विविधं बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकल्या असून यात आंतर शालेय / आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धांचा समावेश होतो. तसेच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया,माटुंगा जिमखाना, सेंट्रल इंडियन रेल्वे इन्स्टिटयूट, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या खुल्या गटाच्या स्पर्धांत यश संपादन केले आहे.

संगीत क्षेत्र

डॉ.ओक यांची आई शांता आणि त्यांचे आजोबा गोपाळ जोगळेकर (आईचे वडील) हे हार्मोनियम वादन करीत असत. शांता या गायिका सुद्धा होत्या, आणि त्या विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य नारायणराव व्यास यांच्या शिष्या होत्या. डॉ.ओक हे तिसऱ्या पिढीतील हार्मोनियम वादक असून [][][] वयाच्या चौथ्या वर्षापासून हार्मोनियम वादन करीत आहेत. [] त्यांनी नामवंत हार्मोनियम वादक कै. पं. गोविंदराव पटवर्धन यांच्याकडे २५ वर्ष हार्मोनियम वादनाचे शिक्षण घेऊन [][] [] स्वतः त्यात प्रभुत्व संपादन केले आहे. [] त्यांनी १९७२ साली मुंबई दूरदर्शनवर हार्मोनियमच्या स्वतंत्र वादनाने आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ केला. [] नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् (एन.सी.पी.ए., मुंबई) येथे त्यांनी आपल्या कलाविष्काराचे सादरीकरण केले आहे तसेच पु. ल. देशपांडे आणि डॉ. अशोक रानडे यांचे संयोजन लाभलेल्या संगीत कार्यक्रमांत हार्मोनियम वादन केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात डॉ. अशोक रानडे प्रमुख पदावर असताना डॉ.ओक यांना तेथे मानद व्याख्याता म्हणून हार्मोनियम वादन शिकविण्याची संधी प्राप्त झाली होती. तसेच त्यांनी अनेक नामवंत गायकांना हार्मोनियमची साथ संगत केली असून यात प्रामुख्याने आशा भोसले, वसंतराव देशपांडे, सुधीर फडके, कुमार गंधर्व, माणिक वर्मा, [][][] मालविका कानन, राशिद खान, सी. आर. व्यास, जितेंद्र अभिषेकी, विद्याधर व्यास, सुरेश वाडकर, ज्योत्स्ना भोळे, पद्मा तळवलकर, श्रुती सडोलीकर, सत्यशील देशपांडे, आशा खाडिलकर, उपेंद्र भट, शुभा मुद्गल, विजय कोपरकर, आरती अंकलीकर-टिकेकर, वीणा सहस्रबुद्धे, राहुल देशपांडे या कलाकारांचा समावेश होतो ; त्याचबरोबर विख्यात तबला वादक मरहूम अल्लारखा याना लेहेरा साथ केली आहे, या मैफिलीकरिता गायन आणि मृदूंग साथ प्रसिद्ध दाक्षिणात्य कलाकार टी. व्ही.गोपालकृष्णन यांनी केली होती.

डॉ. ओक यांनी अमेरिका,युरोप येथे हार्मोनियम वादनाचे कार्यक्रम केले आहेत, [] महाराष्ट्र मंडळ लंडन आयोजित १९९३ मधील लातूर भूकंपग्रस्तांसाठी मदतनिधी कार्यक्रम, बृहन्महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिका, ह्युस्टन येथे कार्यक्रम केले आहेत. मराठी संगीत नाटकांकरिता त्यांनी संगीतकार म्हणून काम केले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित 'संन्यस्त ज्वालामुखी', संत ज्ञानेश्वर माउलींवर आधारित 'ज्ञानोबा माझा', तसेच 'संगीत ताजमहाल' अशा नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.

डॉ. ओक यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील मूलभूत २२ श्रुतींवर केलेले संशोधन या क्षेत्रातील सर्वानाच दिशा देणारे आणि क्रांतिकारक ठरले आहे. [] श्रुती म्हणजे न्यासा करता प्रमाणित केलेले २२ नाद ; ज्यांच्यामुळे राग निर्माण होतो. त्यांनी असे शोधले की गणिती दृष्ट्या स्वरांचे क्रमस्थान चढत्या भाजणीने पुढे जाते. प्रत्येक स्वर हा गणितीदृष्ट्या मोजता येतो हे त्यांनी दाखवून दिले व तारेवर या स्वरांचे अचूक वादनही करून दाखवले. [] त्यांनी जगातील पहिली,[] आणि एकमेव २२ श्रुती हार्मोनियम निर्माण केली आहे. ह्या हार्मोनियमचे पेटंट त्यांनी प्राप्त केले असून या हार्मोनियमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा ॲकॉर्डीयन म्हणून पण वापर करता येऊ शकतो. [] या २२ श्रुती हार्मोनियम मुळे स्वतः नवीन वाद्य निर्माण केलेल्या भारतीयांच्या यादीत त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.[] डॉ. ओक यांनी विविध ठिकाणी आपल्या श्रुतींवरील संशोधनासंदर्भात प्रात्यक्षिकांसह व्याख्याने दिली आहेत. [] यामध्ये टेड -एक्स टॉक - आय.आय.टी गांधीनगर, गानवर्धन पुणे, जागतिक हार्मोनियम वादक संमेलन बंगळुरू या व्याख्यानांचा समावेश होतो. []

'संगीत ताजमहाल' या संगीत नाटकाकरिता डॉ. ओक यांनी लेखक, गीतकार आणि संगीतकार अशी तिहेरी भूमिका पार पाडली आहे. यापूर्वी अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी १८८२ साली 'संगीत सौभद्र' या नाटकाकरिता अशी तिहेरी कामगिरी केली होती. ही दुर्मिळ कामगिरी करणारे डॉ. ओक हे मराठी संगीत नाटकांच्या इतिहासात केवळ दुसरे नाटककार ठरले आहेत. ५९ व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाटक स्पर्धेत 'संगीत ताजमहाल' या नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले तसेच या नाटकाकरिता सर्वोत्कृष्ट नाट्यलेखन आणि संगीत दिग्दर्शन हे स्वतंत्र पुरस्कारही डॉ. ओक यांनी प्राप्त केले. [१०]

लेखक

  • पुनर्जन्म : मिथ्य की तथ्य (मराठी), परम मित्र पब्लिकेशन्स - २०१८.[११]
  • २२ श्रुती (हिंदी), संस्कार प्रकाशन - २०१५.
  • श्रुतिविज्ञान व रागसौंदर्य , राजहंस प्रकाशन - २०१५ [१२]
  • ताजमहाल, (संगीत नाटक - महाराष्ट्र राज्य प्रयोग परिनिरीक्षण मंडळ तथा नाट्य सेन्सॉर बोर्ड, महाराष्ट्र राज्य, मान्यताप्राप्त संगीत नाटक) २०१४.
  • श्रुतिगीता, माधव राफ्टर पब्लिकेशन्स - २०११.[१३]
  • २२ श्रुती (मराठी), संस्कार प्रकाशन - २०१०.
  • २२ श्रुती (इंग्रजी ), संस्कार प्रकाशन - २००७.
  • गोविंद गुणदर्शन, (पं. गोविंदराव पटवर्धन जीवनचरित्र ) , भाग्यश्री पब्लिकेशन्स - २००६.
  • मनोरंजक स्वभावशास्त्र , (पारंपरिक चिनी पद्धतीनुसार उपजत मानवी स्वभावाचे सहजसुंदर अवलोकन), उद्वेली बुक्स - २००२.[१४]
  • मित्र जिवाचा (आय चिंगच्या चीनी प्रणालीवर एक ज्योतिष ग्रंथ), कस्तुरीका कम्युनिकेशन – १९९६.[१५]

ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ

विख्यात ज्योतिषतज्ज्ञ पंडिता लीलाताई परांजपे यांचे शिष्य असलेल्या डॉ.ओक यांचा ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास असून हिंदू ज्योतिषशास्त्र, चिनी ज्योतिषशास्त्रआणि पाश्चात्य ज्योतिषशास्त्राचा अभ्यास ते गेली ५० वर्ष करत आहेत. डॉ.ओक हे महान ज्योतिष शास्त्रतज्ज्ञ ग्रॅन्ट लेवी याचे समर्थक तथा अनुयायी आहेत. लेवी यांना अमेरिकेतील आधुनिक काळातील ज्योतिष शास्त्राचा जनक संबोधले जाते. लेवी यांच्या तत्त्वानुसार माणसाचे जीवन हे भाग्य आणि कर्म यांच्या गुणाकाराने तयार होते. या स्थितीमध्ये वर्तमान आणि भविष्य यांचा सतत संघर्ष चालू असतो. माणसांच्या कुंडलीचा अभ्यास करून त्यांच्या भाग्यात डोकावून बघता येते आणि भविष्यातील कर्मांचे नियोजन करता येते. या नियोजनामुळे अनेक पर्याय आजमावून बघता येतात आणि त्यातील सर्वोत्तम पर्याय निवडायला मदत होते. या संदर्भात डॉ.ओक यांनी वर्तमानपत्रात लेख लिहिले असून पुस्तके सुद्धा प्रकाशित केली आहेत. यामध्ये १२ राशिचक्रांवर आधारित चिनी राशीचक्र [१४] , आय चिंग ज्योतिषशास्त्र [१५] पुरातन चिनी भविष्यवाणी विषयक पुस्तकांचा समावेश होतो. तसेच त्यांनी ह्या संदर्भात व्याख्याने दिली असून [१६] ई टिव्ही मराठी या वृत्तवाहिनीवर ज्योतिषशास्त्रावर दैनंदिन कार्यक्रम सादर केला आहे.

आत्मा मृत्यूनंतर जीर्ण मानवी देह बदलून नवीन देह धारण करतो या देहात आत्मा लहानपणापासून वृद्धापकाळापर्यंत राहतो आणि नंतर दुसऱ्या देहात प्रवेशतो [१७] याच पुनर्जन्मासंदर्भात डॉ.ओक यांनी पुस्तक लिहिले असून पुनर्जन्माची संभाव्य उदाहरणे फोटोंसहित दिली आहेत. या उदाहरणांमध्ये नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, स्वामी रामदेव, मोहन भागवत, मेधा पाटकर, विश्वनाथन आनंद, सोनू निगम, ए. आर. रेहमान, राशिद खान, शिवकुमार शर्मा, अजय चक्रवर्ती, शाहिद परवेझ, राजन मिश्रा, किशोरी आमोणकर, अल्लारखां, विष्णू दिगंबर पलुसकर, दादासाहेब फाळके, डी. व्ही. पलुसकर, अनोखेलाल मिश्रा, वसंतराव देशपांडे आणि बालगंधर्व यांचा समावेश आहे. [११]

पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट नाटक , सर्वोत्कृष्ट नाटक संहिता आणि सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - 'संगीत ताजमहाल' (५९ वी महाराष्ट्र राज्य संगीत नाटक स्पर्धा,२०२०)
  • पंचरत्न पुरस्कार (हार्मनी फाउंडेशन)
  • विठ्ठलराव कोरगांवकर पुरस्कार (सुरेल संवादिनी संवर्धन, बेळगाव)
  • महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था (पुणे)
  • पु . ल. देशपांडे पुरस्कार (उत्तुंग सांस्कृतिक परिवार, मुंबई )
  • बंडूभैया चौगुले पुरस्कार (इंदोर)
  • अप्पासाहेब जळगांवकर पुरस्कार (गानवर्धन, पुणे)
  • केशवराव भोसले पुरस्कार - महाराष्ट्र शासन
  • ठाणे भूषण पुरस्कार (ठाणे महानगरपालिका)
  • ठाणे नगर रत्न पुरस्कार (नगर विकास मंच)
  • ठाणे मानबिंदू पुरस्कार (महाराष्ट्र टाइम्स - इंद्रधनू)
  • अनिल मोहिले पुरस्कार (सिद्धकला अकादमी)
  • विनायक दामोदर सावरकर पुरस्कार (सावरकर न्यास)
  • डॉ. शरदिनी डहाणूकर हिरवाई सन्मान (किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज)
  • स्वर-क्रांती पुरस्कार (नादब्रह्म)
  • सहवादक पुरस्कार (स्वरबंध, मुंबई)
  • सुरमणी (सुर सिंगार संसद)
  • लीडरशिप इंनोव्हेशन पुरस्कार (वोखार्ड)
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (नाटक), ज्ञानोबा माझा (महाराष्ट्र टाइम्स सन्मान)
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (नाटक), ‘संन्यस्त ज्वालामुखी ‘ (झी टीव्ही नामांकन )
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (नाटक), 'संगीत ताजमहाल'- महाराष्ट्र शासन
  • सर्वोत्कृष्ट नाट्यलेखन (नाटक), 'संगीत ताजमहाल'- महाराष्ट्र शासन
  • अष्टपैलू पुरस्कार (चित्पावन ब्राह्मण संघ , ठाणे )
  • श्रद्धानंद पुरस्कार (ब्राह्मण सभा, मुंबई)
  • पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार (पुणे)
  • अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुरस्कार

वैयक्तिक जीवन

डॉ. विद्याधर ओक यांचा विवाह भाग्यश्री ओक यांच्याशी झाला असुन सौ. भाग्यश्री ह्या कथक नृत्यांगना आहेत . त्यांना आदित्य,आनंद आणि आमोद अशी तीन अपत्ये आहेत. आदित्य हा सुद्धा हार्मोनियम वादक आहे. [] डॉ.ओक यांची सून आणि आदित्य याची पत्नी वेदश्री ओक ही रंगमंच अभिनेत्री आणि गायिका आहे.

संदर्भ

  1. ^ a b c Anandi Mishra. "Young musicians fuse tradition with technology". Times of India.
  2. ^ a b c d Asheesh Kumar Shukla. "In Perfect Harmony". DNA SYNDICATION.
  3. ^ a b c d e DNA webdesk. "#LifeIsMusic: Dr Vidayadhar Oke on the 22 Shrutis in Indian Classical Music". DNA India.
  4. ^ a b c Prachi Pinglay. "Man gets patent for 22-note harmonium". Hindustan Times. 24 April 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  5. ^ a b c d e f g Sana Yaseen. "Creating some great harmony". DNA SYNDICATION.
  6. ^ Dr. Asha Mandpe. "An artistic veneration for the gurus - The Times of India". The Times of India.
  7. ^ Debarati S Sen. "Mumbai musician Kavish Seth patents his musical instrument Noori". Times of India.
  8. ^ Nadkarni, Mohan (22 September 1994). "Pleasant Surprise". Times of India.
  9. ^ TEDx IIT Gandhinagar. "The science of music". TEDx.
  10. ^ Maharashtra Times. "संगीत ताजमहाल, राज्य नाटय स्पर्धेचे विजेते". Maharashtra Times.
  11. ^ a b Oke, Vidyadhar (2018). Punarjanma : Mithya Ki Tathya. India: Parama Mitra Publications. ISBN 978-93-86059-35-2.
  12. ^ Bakre Sadashiv, Oke Vidyadhar (2015), Shrutividnyan Va Ragasoundarya, Rajhansa Prakashan, pp. 5, 86, 88–104, ISBN 978-81-7434-853-1
  13. ^ Oke, Vidyadhar (2011), Shrutigeeta, Madhav Rafter Publications, pp. 244–270, ISBN 978-81-922379-2-3
  14. ^ a b Oke, Vidyadhar (2002). 'Manoranjak Swabhavashastra', An Astrological treatise on the Chinese Astrology. Udveli Books. ISBN 978-93-84330-90-3.
  15. ^ a b Oke, Vidyadhar (1996). 'Mitra Jivacha', An astrological treatise on the Chinese system of I Ching. Kasturika Communications.
  16. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2021-08-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2021-08-15 रोजी पाहिले.
  17. ^ Cooper, Irving Steiger (1951). Reincarnation, the Hope of the World. USA: The Theosophical Press.

बाह्य दुवे