विदुर
विदुर हा महाभारतात उल्लेखलेला धृतराष्ट्राचा व पंडूचा सावत्रभाऊ होता. त्याचा जन्म हस्तिनापुराच्या राण्या अंबिका व अंबालिका यांच्या एका दासीच्या पोटी झाला.
अंबिका व अंबालिका यांचा विवाह हस्तिनापुराचा राजा विचित्रवीर्य याच्याशी झाला. विचित्रवीर्य निस्संतान असतानाच निधन पावला. वंश चालू ठेवण्यासाठी विचित्रवीर्याची आई सत्यवती हिने तिचा दुसरा पुत्र ऋषी व्यास पाराशरास विचित्रवीर्याच्या राण्यांस नियोग देण्यासाठी पाचारले. तपस्येतून उठून आलेल्या व्यासाचे उग्र रूप पाहताच अंबिकेने डोळे झाकून घेतले, तर अंबालिकेचा चेहरा पांढराफटक पडला. यातून कालांतराने अंबिका व अंबालिकेस व्यासाच्या प्रभावाने आंधळा असलेला धृतराष्ट्र व पंडुरोगी असलेला पंडु हे पुत्र झाले.
उपरोल्लेखित प्रसंगानंतर सत्यवतीने व्यासास पुन्हा एकदा अंबिकेकडे धाडले. त्यावेळेसही अंबिकेने स्वतःऐवजी आपल्या दासीला प्रासादात ठेवले. व्यासाचे रूप पाहून ती कर्तव्यनिष्ठ दासी मात्र घाबरली नाही. व्यासामुळे या दासीला राहिलेला गर्भ राण्यांना राहिलेल्या गर्भांप्रमाणे दोषयुक्त न राहता निर्दोष राहिला. तोच विदुर या नावाने ओळखला गेला.