Jump to content

विजय वसंतराव पाडळकर

विजय पाडळकर
जन्म नाव विजय वसंतराव पाडळकर
जन्म ४ ऑक्टोबर, १९४८ (1948-10-04) (वय: ७५)
बीड
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र आस्वादक समीक्षक, कादंबरीकार,
ललितलेखक, चित्रपट समीक्षक
साहित्य प्रकार कादंबरी, ललित वाङ्‌मय,
कुमार वाङमय, चित्रपट समीक्षण
आस्वादक समीक्षा
प्रसिद्ध साहित्यकृती कवडसे पकडणारा कलावंत
वडील वसंतराव पाडळकर
आई वासंतिका पाडळकर
पत्नी पुष्पा पाडळकर
पुरस्कार महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मिती पुरस्कार
केशवराव कोठावळे पुरस्कार
संकेतस्थळhttp://www.vijaypadalkar.com/

विजय वसंतराव पाडळकर (जन्म : ४ ऑक्टोबर, १९४८) हे मराठीतील एक समीक्षक, ललित लेखक आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. अभिजात साहित्य व चित्रपट हे त्यांच्या अभ्यासाचे मुख्य विषय आहेत.[ संदर्भ हवा ] विजय पाडळकर यांची ३५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना पाच राज्य पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.[ संदर्भ हवा ]

अल्प चरित्र

विजय पाडळकर यांचा जन्म बीड, (महाराष्ट्र) येथे एका मध्यमवर्गीय घरात झाला. त्यांचे वडील वसंतराव पाडळकर हे उप-शिक्षणाधिकारी असल्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत, म्हणून त्यांचे शिक्षण देगलूर, कंधार, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या गावी झाले. इ.स. १९७२ साली ते नांदेडच्या पीपल्स कॉलेजमधून एम.कॉम.ची परीक्षा प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले.[ संदर्भ हवा ] इ.स. १९७० साली विजय पाडळकर हे महाराष्ट्र बँकेत दाखल झाले. मात्र नोकरीचा कार्यकाल संपण्यापूर्वीच इ.स. २००१ साली त्यांनी लेखनाला पूर्ण वेळ देण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली.[ संदर्भ हवा ]

प्रारंभिक लेखन

विजय पाडळकर यांनी लेखनाला सुरुवात इ.स. १९८४ साली ’मराठवाडा’ दैनिकात ’अक्षर संगत’ हे सदर लिहून केली.या सदरातील लेखांचे संकलन ’देखिला अक्षरांचा मेळावा’ या नावाने प्रकाशित झाले व त्याला वाल्मीक पुरस्कार मिळाला. या पुस्तकामुळे आस्वादक समीक्षक म्हणून पाडळकरांचे नाव सुप्रतिष्ठित झाले. इ.स. १९९० साली पाडळकरांनी महाराष्ट्र टाइम्स दैनिकाच्या रविवार पुरवणीत जागतिक कथेचा मागोवा घेणारी ’कथांच्या पायवाटा’ ही लेखमाला लिहिली. जागतिक कथा व अभिजात साहित्य या संदर्भात पाडळकरांनी यानंतर ’मृगजळाची तळी’, ’वाटेवरले सोबत’ आणि ’रानातील प्रकाश’ ही पुस्तके लिहिली. गाजलेल्या साहित्यकृती आणि त्यावर निर्माण झालेले चित्रपट या विषयांवरील पाडळकरांचे पुस्तक ’चंद्रावेगळं चांदणं’ हे इ.स. १९९५ साली प्रकाशित झाले. मराठी साहित्यात प्रथमच चित्रपट आणि साहित्य या दोन कलांचा तुलनात्मक विचार या पुस्तकाद्वारे केला गेला. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला.[ संदर्भ हवा ]

नंतरचा कालखंड

विजय पाडळकर यांनी इ.स. २००१ साली महाराष्ट्र बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. इ.स. २००१ च्या मेमध्ये त्यांनी फिल्म इंस्टिट्यूट ऑफ इंडिया वतीने घेण्यात येणारा चित्रपट रसास्वादाचा कोर्स (फिल्म ॲप्रिसिएशन कोर्स) केला. या कोर्सदरम्यानचे अनुभव शब्दबद्ध करणारे त्यांचे पुस्तक, ’सिनेमाचे दिवस पुन्हा’ हे इ.स. २००५ साली प्रकाशित झाले. यानंतर पाडळकरांनी साहित्य आणि चित्रपट या विषयाचा सखोल अभ्यास करणे चालू केले. या विषयावर त्यांची "नाव आहे चाललेली" (विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या दोन कादंबऱ्या व त्यावर सत्यजित राय यांनी केलेले तीन चित्रपट यांचा अभ्यास) व ’गर्द रानात भर दुपारी’ (जपानी लेखक अकुतागावा याच्या दोन कथा व त्यांवरील अकिरा कुरोसावाने तयार केलेला चित्रपट राशोमोन) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.[ संदर्भ हवा ] प्रख्यात हिंदी चित्रपट दिग्दर्शक गुलजार यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीचा आढावा घेणारे "गंगा आए कहाँ से" हे त्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गुलजार म्हणतात, मुझे लगता है, हिंदुस्तान की हर जुबान में, सिनिमा पर लिखने के लिए एक विजय पाडलकर की जरूरत हैं।[] २००६ साली विजय पाडळकर यांनी गुलजार यांची टप्प्या टप्प्याने सुमारे वीस तास मुलाखत घेतली. त्या मुलाखतीवर आधारित गुलजार यांच्या संपूर्ण १६ चित्रपटांचा अभ्यास व आस्वाद पाडळकर यांनी या पुस्तकात मांडला आहे.[ संदर्भ हवा ]  

’कवडसे पकडणारा कलावंत’ हे श्रेष्ठ रशियन कथाकार आंतोन चेखव याचे जीवन व त्याच्या कथा यांचा अभ्यास करणारे पाडळकरांचे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. या पुस्तकाला प्रतिष्ठेच्या केशवराव कोठावळे पुरस्कारासोबत अनेक चांगले पुरस्कार मिळाले आहेत.[ संदर्भ हवा ] आस्वादक समीक्षात्मक लेखन करीत असतांनाच पाडळकरांनी काही स्वतंत्र कथाही लिहिल्या. या कथांचा संग्रह ’पाखराची वाट’ या नावाने प्रकाशित झाला आहे. याशिवाय व्यक्ती, समाज व राष्ट्र यांचा परस्परसंबंध शोधणारी ’अल्पसंख्य’ ही कादंबरीही त्यांनी लिहिली आहे. इ.स. २००८ साली लोकसत्ता दैनिकाच्या रविवार पुरवणीत पाडळकरांनी ’सिनेमाटोग्राफ’ या नावाने एक सदर लिहिले, ज्यातून जगातील महान चित्रपट दिग्दर्शकांच्या कार्याची माहिती देत त्यांनी चित्रपट कलेचा इतिहास सादर केला. या सदरातील लेखांचे पुस्तक सिनेमायाचे जादूगार या नावाने लवकरच प्रकाशित होत आहे.[ संदर्भ हवा ]

हिंदी चित्रपट आणि सिनेसंगीत हे देखील विजय पाडळकरांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. हिंदी सिनेमात गीतकारांना योग्य तो मान दिला जात नाही ही खंत मनात असल्यामुळे त्यांनी नव्वद गीतकारांच्या जीवनाची व कार्याची माहिती देणारे ‘बखर गीतकारांची’ हे पुस्तक परिश्रमपूर्वक सिद्ध केले. ते मुंबईच्या ‘मैत्रेय प्रकाशनर्फे २०१४ साली प्रकाशित झाले. याच प्रकाशनातर्फे ‘देवदास ते भुवन शोम’ हा हिंदी सिनेमाच्या इतिहासाचा प्रथम खंड २०१५ साली प्रकाशित झाला.[ संदर्भ हवा ]

भ्रम आणि भ्रमनिरास या वर्तुळात मानवी जीवन फिरत असते या आशय सूत्राभोवती गुंफलेली ‘कवीची मस्ती’ ही पाडळकर यांची कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई तर्फे प्रकाशित झाली असून तिला ‘द. ता. भोसले साहित्य पुरस्कार’ मिळाला आहे.[ संदर्भ हवा ]

साहित्य आणि चित्रपट यांच्या तुलनात्मक अभ्यासाचा पुढला टप्पा असे ‘शेक्सपिअर आणि सिनेमा’ हा पाडळकरांचा ग्रंथ २३ एप्रिल २०१६ रोजी, शेक्सपिअरच्या चारशेव्या पुण्यतिथीस प्रकाशित झाला. या पुस्तकाच्या पूर्वार्धात नाटक आणि सिनेमा या कलांचा तौलनिक अभ्यास मांडलेला असून उत्तरार्धात ‘मॅकबेथ’ आणि ‘किंग लिअर’ ही नाटके व त्यांवर आधारित चित्रपट यांची चर्चा केली आहे.[ संदर्भ हवा ]

२०१६ सालच्या डिसेंबरमध्ये पाडळकरांचे ‘गगन समुद्री बिंबले’ हे पुस्तक ‘राजहंस प्रकाशन पुणे’ यांच्याकडून प्रकाशित झाले असून या पुस्तकात गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या नऊ चित्रपटांची आस्वादक समीक्षा त्यांनी सादर केली आहे.[ संदर्भ हवा ]

कविता हा पाडळकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. रॉबर्ट फ्रॉस्ट याचे जीवन आणि कार्य यांचा वेध घेणारा 'कवितेच्या शोधात' हा ग्रंथ राजहंस प्रकाशन पुणे यांच्यातर्फे 2018 साली प्रकाशित झाला आहे. या पुस्तकास 'महाराष्ट्र ग्रन्थोत्तेजक संस्था, पुणे यांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. याच वर्षी पाडळकरांच्या 'लघुतम कथांचे 'छोट्या छोट्या गोष्टी' हे पुस्तक प्रकाशित झाले.[ संदर्भ हवा ]

श्रेष्ठ कथाकार जी.ए. कुलकर्णी यांच्या साहित्याचा वेध घेणारे 'जी.एंच्या रमलखुणा' हे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई तर्फे २०१८ साली प्रकाशित झाले. जी.एंच्या कथेवरील उत्तम समीक्षा ग्रंथात त्याची गणना केली जाते.[ संदर्भ हवा ]

प्रख्यात हिन्दी गीतकार शैलेन्द्र याचे जीवन आणि त्याचे काव्य यांचा वेधक अभ्यास सादर करणारे 'सुहाना सफर, और' हे पुस्तक रोहण प्रकाशन पुणे यांच्यातर्फे (साल ??) प्रकाशित झाले आहे. १७७ चित्रपटांसाठी लिहिलेल्या जवळपास आठशे गीतांचा खजिना आपल्यासाठी सोडून गेलेल्या महान गीतकाराचे जीवन आणि त्याचे कार्य यांचा वेध घेत त्यांच्या अजरामर गीतांचा रसास्वाद घेणारा हा आगळावेगळा ग्रंथ.[ संदर्भ हवा ]

हायकू हा जपानचा लोकप्रिय काव्यप्रकार. २०१८ साली पाडळकर अमेरिकेस गेले असताना तेथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर हायकूंचे वाचन केले. सुमारे ३००० हायकूंच्या वाचंनंनंतर त्यांना या साहित्य प्रकाराची इतकी भूल पडली ही त्यांतील निवडक हायकू त्यांनी मराठीत भाषांतरित करण्याचा प्रकल्प हाती घेतला. जपान मधील तीन महाकवींच्या सुमारे ५०० हायकूंचे भाषांतर सादर करणारा त्यांचा ग्रंथ 'घंटेवरले फुलपाखरू' हा २०१९ साली प्रकाशित झाला. या पुस्तकाला त्यांनी हायकूची चिकित्सा करणारी एक दीर्घ प्रस्तावनाही जोडली आहे.[ संदर्भ हवा ]

जागतिक चित्रपट सृष्टीतील काही चित्रपटांच्या कहाण्या रंजकपाणे मांडणारे 'आनंदाचा झरा' हे त्यांचे पुस्तक २०१९ सालीच प्रकाशित झाले.[ संदर्भ हवा ]

२०२१ साली, या साऱ्या पुस्तकांपेक्षा वेगळे असे एक अभिनव पुस्तक 'गोजी, मुग्धा आणि करोना' पाडलकरांनी लिहिले. प्रत्यक्षातल्या मुलीला जर पुस्तकातील मुलगी भेटली तर काय होईल या ‘काल्पनिकेभोवती’ या पुस्तकाची रचना केली आहे.’[ संदर्भ हवा ]

जी.एंच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने पाडळकरांनी त्यांना वाहिलेली अभिनव कथारूप श्रद्धांजली 'अनंत यात्री' या नावाने मे २०२३ मध्ये प्रकाशित झाली आहे. समीक्षक सुरेन्द्र दरेकर पाटील यांनी या पुस्तकाचा 'जी.ए. अभ्यासातील एक ध्यासपर्व' असा गौरव केला आहे.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित पुस्तके[ संदर्भ हवा ]

पुस्तकाचे नाव प्रकाशक वर्ष (इ.स.) पुरस्कार
अल्पसंख्यराजहंस प्रकाशन२००७महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
आनंदाचा झराअभिजित प्रकाशन२०१९
एक स्वप्न पुन्हा पुन्हागद्य अनुवाद, मूळ लेखक/कवी गुलझार
कथांच्या पायवाटासंगत प्रकाशन१९९४
कवडसे पकडणारा कलावंतमॅजेस्टिक प्रकाशन२००४अनेक पुरस्कार
कवितेच्या शोधात-राॅबर्ट फ्राॅस्ट : जीवन आणि कार्यराजहंस प्रकाशन२०१८अनेक पुरस्कार
कवीची मस्तीमॅजेस्टिक प्रकाशन२०१४द.ता. भोसले पुरस्कार.
गगन समुद्री बिंबलेराजहंस प्रकाशन२०१६
गंगा आएँ कहाँ सेमॅजेस्टिक प्रकाशन२००८महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
गर्द रानात भर दुपारीमौज वितरण२००७
गाण्याचे कडवेसंगत प्रकाशन१९९८महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
घंटेवरले फुलपाखरूअभिजित प्रकाशन२०१९
चंद्रावेगळं चांदणंमॅजेस्टिक प्रकाशन१९९५महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार
छोट्या छोट्या गोष्टीअभिजित प्रकाशन२०१८
जिवलगमॅजेस्टिक प्रकाशन2०१७
जीएंच्या रमलखुणामॅजेस्टिक प्रकाशन२०१८
ठसाअभिजित प्रकाशन२०२०
देखिला अक्षरांचा मेळावास्वयंप्रभा प्रकाशन१९८६वाल्मीक पारितोषिक
'देवदास ते भुवन शोम'मैत्रेय प्रकाशन२०१५बन पुरस्कार
नाव आहे चाललेलीराजहंस प्रकाशन२००४
पाखराची वाटयक्ष प्रकाशन, मौज वितरण२००३
बखर गीतकारांचीमैत्रेय प्रकाशन२०१४
मृगजळाची तळीमॅजेस्टिक प्रकाशन२०००
मोरखुणामॅजेस्टिक प्रकाशन२०११
येरझारास्वरूप प्रकाशन२००७
रानातील प्रकाशमेहता प्रकाशन१९९९
रावीपारमेहता प्रकाशनस्वरूप प्रकाशन२००७अनुवादित, मूळ लेखक - गुलझार
वाटेवरले सोबतीमॅजेस्टिक प्रकाशन२००१
शेक्सपिअर आणि सिनेमामौज प्रकाशन२०१६
सिनेमाचे दिवस पुन्हामौज प्रकाशन२००५
सिनेमायाचे जादूगारमॅजेस्टिक वितरण२०१०
सुहाना सफर और..रोहन प्रकाशन२०१८
गोजी मुग्धा आणि करोना राजहंस प्रकाशन २०२१
तो उंच माणूस मॅजेस्टिक प्रकाशन २०२२
अनंतयात्री यक्ष प्रकाशन २०२३
गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे गाव मौज प्रकाशन २०२३

अन्य भाषांतून मराठीत अनुवादित केलेली पुस्तके [ संदर्भ हवा ]

  1. यक्ष भूमीचा जादूगार -मूळ लेखक एल.फ्रँक बाउम
  2. यक्ष भूमीची नवल कथा -एल.फ्रँक बाउम
  3. आंधी (मूळ लेखक - गुलझार)
  4. उमराव जान (मूळ लेखक - मिर्झा हादी रुसवा)
  5. एक स्वप्न पुन्हा पुन्हा (गुलजारांच्या कवितांचा मराठी अनुवाद)-पॉप्युलर प्रकाशन
  6. घंटेवरले फुलपाखरू
  7. बोस्कीचे कप्तानचाचा
  8. भुवनशोम
  9. रावीपार (गुलजारांच्या कथांचा मराठी अनुवाद)
  10. मुलांसाठी पथेर पांचाली -मूळ लेखक विभूतीभूषण बन्द्योपाध्याय

पुरस्कार[ संदर्भ हवा ]

  • ’चंद्रावेगळं चांदणं’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार.
  • केशवराव कोठावळे पुरस्कार (’कवडसे पकडणारा कलावंत’ या श्रेष्ठ रशियन कथाकार आंतोन चेखाॅव्ह याचे जीवन व त्याच्या कथा यांचा अभ्यास करणाऱ्या पुस्तकास)
  • द.ता. भोसले पुरस्कार
  • नरहर कुरुंदकर पुरस्कार
  • वाल्मीक पुरस्कार (’देखिला अक्षरांचा मेळावा’ या पुस्तकाला)
  • कवडसे पकडणारा कलावंत’ या पुस्तकास
    • महाराष्ट्र राज्य पुरस्कार
    • बी. रघुनाथ पुरस्कार
    • आपटे वाचन मंदिर पुरस्कार
  • ‘गाण्याचे कडवे’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्य पुरस्कार
  • ‘गंगा आये कहां से’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्य पुरस्कार
  • ‘अल्पसंख्य’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्य पुरस्कार
  • देवदास ते भुवनशोम या पुस्तकास बन पुरस्कार
  • ‘कवितेच्या शोधात’ या पुस्तकास पुण्याच्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचा पुरस्कार व नाशिकच्या ‘संवाद’ संस्थेचा पुरस्कार
  • 'तो उंच माणूस' या पुस्तकास
    • हिराचंद नेमचंद वाचनालय सोलापूर तर्फे 'कलास्वाद पुरस्कार'
    • लोकमंगल साहित्य पुरस्कार सोलापूर

इतर

  1. अध्यक्ष : लातूर जिल्हा साहित्य संमेलन (इ.स. १९९६)[ संदर्भ हवा ]
  2. ’यक्ष’ दिवाळी अंकाचे संपादन (इ.स. २००२ - इ.स. २००४), संपादनासाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा रत्नाकर पुरस्कार (इ.स. २००२).[ संदर्भ हवा ]
  3. संस्थापक, अध्यक्ष, ”मॅजिक लँटर्न फिल्म सोयायटी, नांदेड.[ संदर्भ हवा ]
  4. अध्यक्ष : ठाणे जिल्हा साहित्य संमेलन २००८[ संदर्भ हवा ]
  5. नियुक्त सदस्य – महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

  1. ^ ’गंगा आए कहाँ से” (इ.स. २००८), मॅजेस्टिक प्रकाशन, प्रस्तावना

बाह्य दुवे