Jump to content

वासुदेव वामन बापट

वासुदेव वामन बापट गुरुजी (२९ ऑगस्ट, १९५३ - १५ नोव्हेंबर, २०१५) हे एक धार्मिक विषयांवर लेखन करणारे मराठी लेखक आहेत.


धार्मिक पार्श्वभूमी

विज्ञान व अध्यात्म’ हे दोन्ही विषय एकत्र अभ्यासले जाऊ शकतात असे प्रतिपादन करणारे वासुदेव वामन बापट यांचा जन्म घनपाठी विद्वान दशग्रंथी ब्राह्मण कुळात सन १९५३ मध्ये झाला. त्यांच्या कुळात काही पिढ्या अग्निहोत्राची साधना होती. ’वेदमूर्ती वेदाचार्य’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री गुरुजींच्या वडिलांनी ऋग्वेद आणि यजुर्वेदाचे सखोल अध्ययन केले होते आणि त्यांना ’दीक्षित’ ही पदवी मिळाली होती. श्री गुरुजींना त्यांच्या वडिलांकडून आध्यात्मिक परंपरेचा लाभ, तसेच वेदांचे शास्त्रोक्त अध्ययन प्राप्त झाले आहे. पुढे सन १९८१ ते १९९३ या बारा वर्षांच्या कालखंडात श्री गुरुजींनी श्री स्वामी विज्ञानानंद यांच्या विज्ञानाधिष्ठित ज्ञानमार्गाचा अभ्यास केला.

गुरुजींची धार्मिक कारकीर्द

विज्ञानाधिष्ठित मार्गाची जुळवणूक भारतीय अध्यात्माबरोबर केल्यास त्यातून सुयोग्य आणि अपेक्षित शक्तिनिर्मिती होऊ शकते हे जाणवल्यावर तसेच परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत्‌ वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज ह्यांच्या प्रेरणेनुसार श्री गुरुजींनी जात, धर्म, पंथ, लिंग भेदरहित १०८ सामूहिक यज्ञांचा संकल्प १९९४ मध्ये प्रथमतः केला. त्याकरिता, यज्ञातले मूळ तत्त्व अबाधित ठेवून बदललेल्या समाजरचनेला अनुरूप आणि उचित अशी ’मंत्रशक्तीच्या सामर्थ्यासहित प्रकाशावर केलेली एकाग्रता’ ह्या साधनस्वरूपातील यज्ञसंकल्पना श्री गुरुजींनी स्वीकारली.

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत्‌ वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी देखील दत्तपुराणाची रचना करताना प्रथम जे श्लोक रचले, त्यातही यज्ञरूपी श्री दत्तांना प्रथम नमस्कार आहे, जो ’वेदपादस्तुति’ ह्या नावाने ओळखला जातो. मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या ’प्रकाश’ ही एक शक्ती आहे. सृष्टिनिर्मितीपासून अस्तित्वात असलेल्या प्रकाशशक्तीचे सामर्थ्य ओळखून प्राचीन ऋषीमुनींनी यज्ञसंस्था आकाराला आणली. प्रकाशाशी मित्रत्वाचे नाते जोडून, यज्ञाच्या माध्यमातून समाजकल्याणाबरोबरच ’स्व’कल्याण कसे साधावे या संबंधीचे मार्गदर्शन श्री गुरुजी सातत्याने गेली अठराहून अधिक वर्षे करत आहेत. या मार्गदर्शनाचा लाभ आजवर अनेक साधकांनी करून घेतला आहे. जात, धर्म, पंथ, लिंग या सर्व भेदांना बाजूला सारून, समूहाला एकत्र आणणाऱ्या या यज्ञांचे महत्त्व आणि त्या पाठीमागचा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन, समाजाला समजावून सांगण्यासाठी श्री गुरुजी सतत प्रयत्नशील असतात. यज्ञाच्या संकल्पनेमध्ये ज्ञान, भक्ती आणि कर्म मार्गांची यथोचित जुळवणूक कशी साधता येईल याचा अभ्यास करून श्रीगुरुजींनी यज्ञकार्यक्रमाची रूपरेषा निश्चित केली आहे.

प्रकाश ज्ञान शक्ती केंद्र

प्राचीन भारतीय अध्यात्म व समाजधुरीणांनी अंगिकारलेल्या ह्या यज्ञसंस्थेचा प्रचार आणि प्रसार आजच्या आधुनिक काळातही होणे आवश्यक आहे हे लक्षात आल्यानंतर श्री गुरुजींनी ’प्रकाश ज्ञान शक्ती केंद्राची’ स्थापना करण्यासाठी साधकांना प्रोत्साहित केले. केंद्रातर्फे सन २००३ सालापासून बदलापूर येथे दरमहा दुसऱ्या रविवारी एक दिवसीय सामूहिक यज्ञ तसेच भारतातील एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री सात दिवसीय वार्षिक सामूहिक यज्ञ आयोजित केला जातो. ह्यामध्ये चित्रकूट, हरिद्वार, नैमिषारण्य आणि पुष्कर ह्या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. श्री गुरुजींच्या प्रेरणेने ’आमंत्रण सर्वांना, आग्रह कोणालाही नाही’ अशा निःस्पृह आणि निरपेक्ष तत्त्वावर यज्ञप्रचार राबविणाऱ्या प्रकाश ज्ञान शक्ती केंद्रातर्फे गायत्री यज्ञ, रुद्र स्वाहाकार, शतचंडी स्वाहाकार, गणेश यज्ञ, विष्णू यज्ञ इ. अनेक यज्ञ आयोजित झाले आहेत. अशा रितीने समाजातील सर्व स्तरांवरील लोकांना ह्या प्राचीन साधनेचा लाभ घेता यावा, ह्या आंतरिक तळमळीने श्री गुरुजींनी सुरुवातीस १९९४ मध्ये लावलेल्या १०८ सामूहिक यज्ञांच्या संकल्परोपट्याचे रूपांतर, त्यांच्याच प्रेरणेने आयोजित झालेल्या सुमारे ३०० च्या वर सामूहिक यज्ञांत झाले आहे.

’अध्यात्मातला साधक जसा एक श्रेष्ठ भक्त असावा तसाच तो कर्मतत्पर आणि ज्ञानमार्गी असावा’ या भूमिकेतून श्री गुरुजी प्रत्येक यज्ञकार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या ओघवत्या शैलीत एखाद्या विशिष्ट आध्यात्मिक विषयावर आधारित असे विवेचन करतात. बहुश्रुतता, व्यासंगी वृत्ती आणि समाजाचे अचूक निरीक्षण करण्याची खुबी या स्वभाव-वैशिष्ट्यांमुळे यज्ञ-प्रसंगी होणारे श्री गुरुजींचे विवेचन श्रवणीय आणि संस्मरणीय असे असते. यज्ञप्रसंगी श्री गुरुजींनी केलेल्या विवेचनांना वेगवेगळ्या नियतकालिकांमधून प्रसिद्धी मिळते. [ संदर्भ हवा ]

प्राचीन भारतातल्या समाज धुरिणांचे, तत्त्ववेत्त्यांचे आणि सत्पुरुषांचे विचार आणि साहित्यकृतींचे ज्ञान आधुनिक युगातल्या साधकाला व्हावे, या आंतरिक तळमळीमुळे श्रीगुरुजींनी अनेक विवेचने तसेच विविध प्राचीन स्तोत्रांवरची विवरणे साधकांच्या ज्ञानवर्धनासाठी केली आहेत. श्रीमद्‍ आद्य शंकराचार्य, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांनी रचलेल्या अनेक स्तोत्रांचे अर्थासह विवरण करून त्याचे यज्ञसाक्षीने सामूहिक पठण श्री गुरुजींनी करवून घेतले आहे.

यज्ञाव्यतिरिक्त इतर आध्यात्मिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठीही श्री गुरुजींनी साधकांना प्रेरित केले आहे. यामध्ये जन्मपूर्व संस्कार, बालसंस्कार वर्ग, सामूहिक विद्याव्रत संस्कार, सामूहिक सत्यदत्त पूजा, लक्षार्चना, नामजप शिबिरे आणि पालखी संकल्पाचा समावेश आहे. परमपूज्य सद्‍गुरू श्री भाऊ महाराज करंदीकर यांनी सन २००२ मध्ये केलेला ’नमो गुरवे वासुदेवाय’ या नामाचा १५१ कोटींचा जपसंकल्प, त्यांचेनंतर श्री गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने अर्चन, मार्जन आणि हवनासह सन २००८ मध्ये पूर्ण करण्यात आला. आता ’नमो गुरवे वासुदेवाय’ या नामाला सिद्धमंत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या नाममंत्राचा पुढील १०१ कोटींचा जपसंकल्प श्री गुरुजींच्या प्रेरणेने, सन २०१४ साली असणाऱ्या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या १००व्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ पूर्ण करण्यात येणार आहे.

श्रीगुरुचरित्राचे सोळा वर्षे केलेले नियमित पारायण, सात वर्षांच्या पठणासहित सिद्ध केलेली श्रीरामरक्षा या व अशा कित्येक तपचक्रांसह आध्यात्मिक विश्व समृद्धी असलेले श्री गुरुजी, प्रत्येक साधकाकडून ज्ञानपूर्वक तप घडावे, जेणेकरून अध्यात्मात त्यांची पत वाढावी व जीवनात त्यांची प्रत सुधारावी, ह्यासाठी अहर्निश कार्यरत असतात. त्याच दृष्टिकोनातून श्री गुरुजींनी प.प. श्रीमत्‌ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची पालखी घेऊन सुमारे ३०० साधकांसहित सामूहिक नर्मदा परिक्रमेचा संकल्प नोव्हें-डिसें २०११ मध्ये पूर्ण केला. परिक्रमेदरम्यान नर्मदातीरी ठिकठिकाणी ११ सामूहिक यज्ञांची यज्ञमाला नर्मदा मैय्याला अर्पण झाली. ऑक्टोबर- नोव्हेंबर २०१२ मध्ये सुमारे तेवढ्याच साधकांसहित आणि प.प. श्रीमत्‌ वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या पादुकांसह चारधाम - पंचप्रयाग यात्रा ११ सामूहिक यज्ञांच्या आयोजनासह करण्याचा संकल्प श्री गुरुजींनी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

’समाजाची धारणा करणारा तो धर्म’ अशी व्याख्या करत श्री गुरुजी, सामाजिक विकासाला उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यासाठीसुद्धा साधकांना सतत प्रेरित करतात. त्यागाशिवाय यज्ञ कार्यक्रमाला पूर्तता लाभत नाही, याकरिता प्रत्येक साधकाने आपल्या वेळेचा, श्रमाचा, धनाचा निरपेक्ष त्याग समाजोपयोगी कृत्यांसाठी करावा यासाठी श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली, मोफत वैद्यकीय शिबिरे, विद्यार्थी दत्तक योजना, आदिवासी शिक्षण संस्थेला मदत इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

प.प. श्रीमत्‌ वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांच्या पादुकास्थानी दरवर्षी होणाऱ्या सामूहिक सत्यदत्तपूजेच्या निमित्ताने श्री गुरुजी, स्वामी महाराजांच्या एखाद्या स्तोत्ररचनेवर तीन दिवस विवरण करतात. स्वामी महाराजांची साहित्यकृती, तिच्यातील आध्यात्मिक संदेश व त्यावरील श्री गुरुजींची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचावी व त्यानिमित्ताने स्वामी महाराजांच्या उज्ज्वल आध्यात्मिक साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, ह्या सद्‍हेतूने श्री गुरुजींची ही विवेचने ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात येत आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत अघोरकष्टोद्धरण स्तोत्र, श्रीगुरुस्तुति, श्रीदत्तात्रेय स्तोत्र व करुणात्रिपदी, चित्तसद्‍बोधनक्षत्रमाला ह्यांचा समावेश आहे. ह्यापैकी (अ) घोरकष्टोद्धरण स्तोत्र हे पुस्तक चार भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. लवकरच ह्या पुस्तकाची तेलुगू आवृत्ती प्रकाशित होईल.

सद्‍गुरू श्रीबापट गुरुजींची पुस्तके ( जानेवारी २०१५ पर्यन्त)

  • (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र : संपूर्ण अर्थ आणि विवेचन(मराठी, हिंदी, गुजराती)
  • श्री गुरुस्तुति : संपूर्ण अर्थ आणि विवेचन
  • यज्ञरहस्य (मराठी, हिंदी)
  • श्री नर्मदा परिक्रमा : एक अभ्यासपूर्ण आनन्दयात्रा
  • श्रीदत्तात्रेय स्तोत्र : संपूर्ण अर्थ आणि विवरण
  • करुणात्रिपदी :संपूर्ण अर्थ आणि विवेचन
  • चित्तसद‌्बोधनक्षत्रमाला : संपूर्ण अर्थ आणि विवेचन
  • || नमो गुरवे वासुदेवाय || - मंत्र व यंत्र साधना
  • विचारें मना तूंचि शोधूनि पाहें
  • श्रीनवरत्नमाला : संपूर्ण अर्थ आणि विवेचन
  • नर्मदा नित्यपाठ
  • श्रीगंगा गीतावली
  • श्रेष्ठ मंत्रशक्ती
  • संतोपदेश ( भाग १ ते ५) -
    • १. वर्तमान एक संधिकाल
    • २. ज्ञानदीप उजळू दे
    • ३. सुखाचा शोध
    • ४. गुरू तोचि देव
    • ५. साधना मार्ग प्रदीप

संदर्भ

  • www.yadnya.in