वासुदेव गोपाळ परांजपे
संशोधक, वेदशास्त्र अभ्यासक
जन्म : १२ जून १८८७; - ५ एप्रिल १९७६
वासुदेव गोपाळ परांजपे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे झाला. त्यांनी १९०६ मध्ये पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून बी.ए. आणि १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठातून एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. १९११ मध्ये ते एल्एल.बी.झाले. त्यानंतर १९१३ मध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीत प्रवेश केला. ते त्या संस्थेचे १९१५पासून आजीव सदस्य होते. फर्ग्युसन महाविद्यालयात ते संस्कृत इंग्लिश शिकवत. शासकीय शिष्यवृत्ती घेऊन ते १९२०मध्ये फ्रान्समधील पॅरिस येथे संशोधनासाठी गेले व तेथे डी.लिट्. झाले. पॅरिस येथे असताना पुढे जे महान प्राच्यविद्या संशोधक ठरले असे सुनीलकुमार चॅटर्जी आणि सुशीलकुमार डे हे त्यांचे समकालीन मित्र होते, तर फ्रान्समधील सिल्हँ लेव्ही हे महान प्राच्यविद्या पंडित त्यांचे मार्गदर्शक होते.
वा.गो. परांजपे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विविध विद्यालयांत आणि महाविद्यालयांत अध्यापन केले.
वासुदेव परांजपे यांनी १९३१ ते १९३३ या काळात साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केले. पुढे १९४६ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते. उंबरगाव येथील शाळा ही त्यांचीच निर्मिती होय. त्या शाळेत ते ‘व्हिजिटर’ या नात्याने जात येत. हे करत असताना त्यांनी शाळेत भरपूर सुधारणा केल्या. रहिमतपूर येथे शाळेची स्थापना केली. यासाठी त्यांनी स्वतःची मालमत्ताही शाळेला दिली. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे १९२३ ते १९२७ या काळात ते सचिव होते. या संस्थेतील अतिथिगृह व मुद्रणालय ही त्यांचीच निर्मिती आहे. भांडारकर संस्थेच्या अॅनल्स या नियतकालिकाचे १९३४ ते १९३९ या काळात त्यांनी संपादक म्हणून कार्य केले. वासुदेव परांजपे यांचे संशोधन व प्रकाशन कार्यही विस्तृत प्रमाणात होते. त्यांनी पी. पीटरसनच्या (Hymans of the Rigveda) आवृत्तीचे संपादन, १९३६मध्ये महाभारत सौप्तिकपर्व आणि स्त्री-पर्व, १९३७ मध्ये (Toy- cart of Clay)) भाग १/२ संपादन, १९४० मध्ये पंडित रंगाचार्य रेड्डी यांच्या लेखसंग्रहाचे संपादन, १९२२मध्ये ‘लतीर्तिक द कात्यायन’, १९६९ ते १९७४ या काळात पुणे येथे ‘द वेदिक रिलिजन’ या बर्गेन्यच्या ग्रंथाचा ‘द वेदिक रिसर्च’ हा फ्रेंचमधून इंग्लिशमध्ये अनुवाद, तसेच ओल्डेनबर्गच्या ग्रंथाचा जर्मनमधून इंग्लिशमध्ये अनुवाद केला. याशिवाय विविध संकीर्ण लेख, पुस्तक परीक्षणे इत्यादी सर्व भांडारकर संस्थेच्या अॅनल या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. त्यांचा गौरव ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर १९७७ मध्ये दिल्लीमध्ये प्रसिद्ध झाला.
डॉ. परांजपे संस्कृतध्ये त्यातही वेद विषयातील विद्वान होतेच; शिवाय त्यांना इंग्लिश, फ्रेंच, जर्मन ह्या भाषांचेही उत्तम ज्ञान होते. फर्गसन महाविद्यालयात संस्कृत, इंग्लिश यांबरोबरच स्वयंस्फूर्तीने ते जर्मन व फ्रेंच भाषाही शिकवत असत. ज्या काळात या भाषांच्या अध्ययनाची व्यवस्था (सोय) नव्हती, त्या काळातही या भाषांचे प्राच्यविद्येच्या अध्ययनातील महत्त्व जाणून ते त्या भाषा शिकले व त्या शिकण्यास इतरांनाही प्रवृत्त केले. भारतात आज जर्मन, फ्रेंच यांसारख्या भाषांच्या अध्ययनाची सोय सर्वच विद्यापीठांत आहे. परंतु या भाषांच्या अध्ययनाचा व अध्यापनाचा प्रारंभ पुण्यातील प्राच्यविद्या पंडितांनी स्वयंस्फूर्त व विनामूल्य पद्धतीने केला. असे कार्य करणाऱ्यांमध्ये डॉ. वासुदेव गोपाळ परांजपे यांचे स्थान मोठे आहे.