Jump to content

वारली

तारपा नृत्य १ Tarpa Dance 1

वारली ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात आहे.[] मुख्यत्वे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात या जमातीचे वास्तव्य दिसून येते. वारली चित्रकला हे वारली जमातीचे वैशिष्ट्य आहे.[]या चित्रकलेचा प्रचार जगभरात झालेला आहे.[]

निवासस्थान

वारल्यांची वस्ती मुख्यत्वे महाराष्ट्र, व गुजरात राज्यांत तसेच दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांत असून महाराष्ट्र राज्याच्या ठाणे, पालघर व नाशिक जिल्ह्यांत त्यांची वस्ती अधिक प्रमाणात आढळते. सात- आठ किंवा दहा-पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. वारली पाड्यांतच राहतात. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले असतात.

नावाची व्युत्पत्ती

वारली या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल विद्वानांत मतैक्य नाही आणि तत्संबंधी अनेक कथा, दंतकथा व वदंता प्रसृत झाल्या आहेत. प्राचीन साहित्यातही या जमातीचे भिन्न नावांनी उल्लेख आढळतात. कात्यायनाने वार्तिकात निषाद, व्यास व वरूड या तीन अनार्य जमातींचा उल्लेख केला आहे. त्यांपैकी वरूड म्हणजे वारली होत, असे वि. का. राजवाडे यांनी महिकावतीच्या बखरीत म्हणले आहे. 'वरूड' शब्दावरून वरुडाई-वारुली-वारली अशी त्यांनी व्युत्पत्ती दिली आहे. डॉ. विल्सन यांच्या मते दक्षिणेतील सात कोकणांपैकी वरलाट ह्या कोकणात राहणारे ते वारली, अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. आर्. इ. एन्थोवेन व लॅथॅम हे वारली ही भिल्लांचीच एक पोटजात असल्याचे नमूद करतात.

वारली चित्रकलेचा प्रसार

Warli Paintings SGNP by Raju Kasambe DSCF0200 (1) 05
  • नवी दिल्ली येथील आनंदग्राम येथे वारली संस्कृतीचे संग्रहालय आहे. तेथे वारली चित्रे आहेत.
  • यशोधरा दालमिया यांच्या पुस्तकात पुस्तकात वारली चित्रांच्या प्रतिकृती आहेत. मूळ चित्रे इ.स.पू. २५०० ते ३००० वर्षांपूर्वीची असावीत. मध्य प्रदेशातील भीमबेटका तेथील खडकांवरील चित्रे इ.स.पू. ५०० ते १०००० या काळातली असावीत.

जिव्या सोमा म्हसे या वारली चित्रकलाकाराने वारली चित्रकला जगभरात पोहोचविली.

वारली चित्रकला

या चित्रांमधे एक वर्तुळ, एक त्रिकोण आणि एक चौरस असतो. ही अत्यंत प्राथमिक भित्तिचित्रे अतिशय मूलभूत समजली जातात[].या चित्रांचा मध्यवर्ती भाग विशेषकरून शिकार, मासेमारी आणि शेती, उत्सव आणि नृत्य, झाडे आणि प्राणी अशा दृश्यांचा असतो. मानवी आणि प्राणी दोन त्रिकोणाद्वारे प्रस्तुत केले जातात; वरचा त्रिकोण म्हणजे पोट आणि खालचा लहान त्रिकोण म्हणजे ओटीपोट.

विधी चित्रे ही बहुधा झोपड्यांमध्ये आढळतात. भिंती बनवण्यासाठी, झाडाच्या फांद्या, माती आणि शेण यांचे मिश्रण वापरले आहे. लाल गेरूने रंगविलेली भिंत वारली चित्रांची पार्श्वभूमी असते. वारली चित्रकलेत फक्त पांढरा रंग वापरतात. एक पांढरे रंगद्रव्य आणि घट्टपणा यावा म्हणून तांदुळाची पिठी आणि डिंक असतो. कुंचला म्हणून दातांनी चावलेली बांबूची लवचिक काडी वापरतात. भित्तिचित्रे फक्त विवाहसोहळ्यासारख्या विशेष प्रसंगी काढली जातात.

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ "निसर्गपुत्र वारली समाज". Maharashtra Times. 2024-05-14 रोजी पाहिले.
  2. ^ Dandekar, Ajay (1998). Mythos and Logos of the Warlis: A Tribal Worldview (इंग्रजी भाषेत). Concept Publishing Company. ISBN 978-81-7022-692-5.
  3. ^ भावसार-बगाडे, धनश्री (2023-08-09). "World Tribal Day : आदिवासी संस्कृतीचे कलात्मक चित्रण करणाऱ्या वारली चित्रकलेचा इतिहास माहितीये का?". Marathi News Esakal. 2024-05-14 रोजी पाहिले.
  4. ^ Dalmia, Yashodhara (1988). The Painted World of the Warlis: Art and Ritual of the Warli Tribes of Maharashtra (इंग्रजी भाषेत). Lalit Kala Akademi.