Jump to content

वामनभाऊ

वामनभाऊ

संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज (जन्म - १ जानेवारी, इ.स. १८९१ मृत्यू - २४ जानेवारी, इ.स. १९७६) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी संत आणि कीर्तनकार होते. संत वामनभाऊ महाराज हे एक अवतारी सिद्धपुरुष, साक्षात्कारी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित केले होते. वामनभाऊ महाराज यांनी अध्यात्मातून अठरा पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी केली. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले आणि चालू असलेल्या अनिष्ट रूढी, चुकीच्या परंपरा व अंधश्रद्धा बंद करण्याचा उपदेश केला. भाऊंना प्रत्यक्ष पाहिलेले, त्यांचे अनुभव घेतलेले असंख्य लोक आजही हयात आहेत, त्यांचा शिष्यगण, त्यांनी घडवलेले अनेक कीर्तनकार, टाळकरी, वारकरी गहिनीनाथ गड येथे या महात्म्याच्या पुण्यतिथीला न चुकता हजेरी लावतात. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक व सर्व क्षेत्रातील लाखो, आबालवृद्ध भक्त येथे 'भाऊंच्या' समाधीच्या दर्शनाला येतात.[]

माता राहीबाई भाग्याची खाण ।
पिता तोलाजी हा पुण्यवान ।।
पुत्र जन्माला रत्नासमान ।
तयासी शोभे नाव वामन ॥

फुलसांगवी, ता.शिरूर (कासार), जि. बीड येथील तोलाजी ग्यानबा सोनावणे व बोरगाव (चकला) ता. गेवराई जि. बीडचे विठोबा राख यांच्या कन्या राहीबाई यांचा विवाह झाला. वंजारी समाजातील या पुण्यवान माता-पित्याच्या पोटी सदगुरू संत वामनभाऊ महाराज यांनीं जन्म घेतला. त्यांना जेष्ठ बंधू नारायन हे होते. माता राहीबाई या जुन्या प्रथेप्रमाणे बाळंतपणासाठी माहेरी बोरगावला गेल्या होत्या. सन १८९१ साली श्रावण शुद्ध सोमवारी सूर्योदय समयी त्यांनी या रत्नाला जन्म दिला. नाव ठेवले, वामन. 'भाऊ' हे भगवान शंकराचा अवतार मानले जातात. माता राहीबाई यांच्या पोटी प्रत्यक्ष देवाने जन्म घेतला. हे त्याचे भाग्य थोर असले तरी. नियतीला काही वेगळेच घडवायचे होते. भाऊंचे संगोपन त्या माउलीच्या नशिबी नव्हते. भाऊंच्या जन्मानंतर अवघ्या ४० दिवसानंतर माता राहीबाई यांना देवाज्ञा झाली. मातेचे प्रेम या बाळाला मिळाले नाही. पूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बाळाचे संगोपन कसे करायचे हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा होता. राहीबाईने त्यांची आई आबाबाई यांना दृष्टांत दिला व सांगितले 'आई आता तूच माझ्या बाळाची आई हो. तूच माझ्या वामनचा सांभाळ कर.' आबाबाई सकाळी झोपेतून उठल्या त्यांनी बाळाला जवळ घेतले आणि चमत्कार झाला. नातवासाठी आजीला पान्हा फुटला. या आजीनेच भाऊंना लहानचे मोठे केले.

संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित करणारे वैराग्य मूर्ती संत वामनभाऊ महाराज. डोंगर दऱ्यातून पायपीट करून या महात्म्याने भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. 'भाऊ ' हे अतिशय कडक स्वभावाचे होते. असे म्हणले जाते. परंतु चोरी करायला आलेल्या चोरांनाही त्यांनी जेऊ घातले होते. या महात्म्याचा हाच एक प्रसंग. पौष् वद्य ७/८ हा संत वामनभाऊंच्या पुण्य स्मरणाचा दिवस. 'भाऊ ' श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत यादवबाबा यांचे उत्तराधिकारी झाले. यानंतर त्यांनी वारकरी सांप्रदायाचे कार्य सुरू केले. आजीवन ब्रह्मचार्यव्रत व त्यागी वृत्तीमुळे त्यांची परिसरात ख्याती होती. वाचासिद्धी प्राप्त असलेल्या या साधूने कधीही महिलांना पायावर दर्शन दिले नाही. महिलांना त्यांचे दुरूनच दर्शन घ्यावे लागे.आजही त्यांच्या समाधीचे दर्शन महिलांना बाहेरूनच घ्यावे लागते. भाऊंचा स्वभाव कडक होता व ते रागात काही बोलून गेले तर ते सत्य होत असे. म्हणून बरेच लोक त्यांच्या जवळ जायला घाबरत होते. मात्र त्यांच्या शब्दाने असंख्य भक्तांचे कल्याणही झाल्याचे अनेक उदाहरणे समाजात आहेत. वयाच्या १२ व्या वर्षी भाऊंकडे दाखल झालेले धामनगावचे रघुनाथ महाराज चौधरी भाऊंचे अनेक प्रसंग आपल्या कीर्तनात आवर्जून सांगतात, आज ज्या ठिकाणी श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे बांधकाम आहे त्याच ठिकाणी पूर्वी मोजके बांधकाम झालेले होते. म्हणजे पत्र्याचा निवारा होता. श्रावण महिन्यातील दिवस होते. रात्रीची वेळ रिमझिम पाऊस येत होता. गडावर सर्वत्र भक्त झोपलेले होते.वामनभाऊंना जाग आली व ते हातात कंदील घेऊन बाहेर आले. सध्या यादवबाबा व खंडुबाबांची समाधी आहे त्याच्या मागच्या बाजूला एक छोटा नाला आहे. त्या नाल्यात कोणीतरी लपल्याची चाहूल बाबांना लागली आणि ते आत आले. त्यांनी आपले शिष्य दगडूबा व किसानबा यांना आवाज दिला. ते सहसा त्यांना एकेरीने हाक मारायचे त्याप्रमाणे भाऊ म्हणाले 'किसन्या.... दगड्या उठा, जागे आहेत का झोपलेत, का मेलेत... उठा ' भाऊंचे शब्द कानी पडताच ते दोघे उठले व काय बाबा काय झाले ? असे त्यांनी विचारले त्यावेळी त्यांना बाबांनी बाहेर कोणीतरी माणसे लपलेले दिसत आहेत, जाऊन पहाबर असे सांगितले . दगडूबा हे शरीराने धष्टपुष्ट पण भित्र्या स्वभावाचे होते, किसानबा हे किरकोळ पण धाडसी होते. भाऊंच्या आदेशाप्रमाणे ते दोघे तेथे गेले आणि थेट त्या लपलेल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांची चौकशी केली व तुम्हाला बाबांनी बोलावले असे सांगितले. भाऊंचा आदेश त्या चोरांनाही मोडता आला नाही. ही सर्वमंडळी भाऊंच्या समोर आली त्या वेळी भाऊंनी प्रश्न केला, तुम्ही कोण..कुठले आणि येथे काय करता ? त्यावर त्यांना खोटे बोलण्याचे धाडस न झाल्याने त्यांनी आपण बीडसांगवीचे असून चोरी करायला आलो असल्याचे सांगितले. घरी गेल्या आठ दिवसांपासून खायला दाणा नाही व लेकरबाळ उपाशी आहेत, त्यामुळे आम्ही चोरी करायला आल्याचे त्यांनी सांगितले. भाऊंना त्यांची दया आली. त्या चोरांना भाऊ म्हणाले 'आता तुम्ही जेवण करून येथेच आराम करा'. त्यांना पोटभर जेऊ घातले व सकाळी प्रत्येकाला झेपेल एवढे धान्य सोबत दिले व त्या चोरांना घरी जाण्याची परवानगी दिली. परिणाम असा झाला की, या चारही चोरांनी पुढच्या एकादशीच्या वारीला भाऊंच्या हाताने तुळशीची माळ घातली व चोरी करण्याचे कायमचे सोडून दिले.

गहिनीनाथगड (चिंचोली-ता.पटोदा, जिल्हा बीड) हे संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले क्षेत्र आहे. तेथूनच वामनभाऊ त्यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य सुरू करून ते सर्वत्र पोहोचविले. संत वामनभाऊ महाराज यांचे 'संत वामनभाऊ महाराज जीवन कार्य' हे चरित्र नव्याने प्रकाशित झाले आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "मुंडे यांच्या विजयासाठी शिवसेना जिल्हाप्रमुखांचे साकडे[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2016-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे

http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5014727546495420396http://www.tseries.com/music/shree-vamanbhaunchi-katha Archived 2016-03-06 at the Wayback Machine.