वामन गोपाळ जोशी
जीवन
वामन नारायण जोशी हे क्रांतिकारक होते. ते मुळचे अमरावतीचे होते. त्यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंत झाले होते. वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला व शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. अहमदनगर शहरातील गुजर गल्लीत बाँब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरू केले.
अनंत कान्हेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. नाशिक येथे २३ डिसेंबर, इ.स. १९०९ रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. आरोपींत त्यावेळी नगर जिल्ह्यातील समशेरपूर (ता. अकोले) येथील वामनराव जोशी हे एक होते. नावात सारखेपणा असल्याने वीर वामनराव यांचा या घटनेशी संबंध जोडला गेला. पण या खटल्याची कागदपत्रे व नोंदी तपासल्या असता समशेरपूर येथील वामन नारायण जोशी उर्फ दाजीकाका या कटात सहभागी असल्याचे लक्षात आले. त्यांना अंदमानात ८ वर्षे शिक्षा भोगावी लागली.
वीर वामनराव जोशी
वीर वामनराव जोशी (वामन गोपाळ जोशी) (जन्म : अमरावती, १८ मार्च १८८१; - अमरावती, ३ जून १९५६) हेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक असून मराठी नाटककार, कवी आणि पत्रकार होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘राष्ट्रमत’ ह्या वृत्तपत्रात देशभक्त गंगाधरराव देशपांडे ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून काम केले. लोकजागृतीसाठी त्यांनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान’ हे साप्ताहिक चालवले होते. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती.
वीर वामनराव जोशी यांनी इ.स. १९२० ते १९४२ या काळात अनेकवेळा तुरुंगवास भोगला. महात्मा गांधींच्या चळवळीतही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती.
प्रकाशित साहित्य
नाटके
- ढोटुंग पादशाही
- धर्मसिंहासन
- रणदुंदुभि (पहिला प्रयोग, बलवंत संगीत नाटक मंडळी ने १७-२-१९२७ रोजी केला होता).
- राक्षसी महत्त्वाकांक्षा (पहिला प्रयोग, ललित कलादर्श ने २०-९-१९१३रोजी केला होता).
- शीलसंन्यास
अन्य पुस्तके
- चंद्रपूरची महाकाली
- राष्ट्रपिता महात्मा गांधी
गाजलेली नाट्यगीते
- आपदा राज-पदा भयदा (संगीत रणदुंदुभि)
- जगी हा खास वेड्यांचा पसारा (संगीत रणदुंदुभि)
- दिव्य स्वातंत्र्य रवि (संगीत रणदुंदुभि)
- परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला (संगीत रणदुंदुभि)
- वितरि प्रखर तेजोबल (संगीत रणदुंदुभि)
वारसा
वामनराव जोशी यांच्या नावाने अमरावतीत वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर नावाचे नाट्यगृह आहे. त्यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. (या व्यायाम मंडळाच्या संकेतस्थळावर, ’मुस्लिम लिबरेशन आर्मी’ने हल्ला केला आहे, अशी माहिती ’पाक सोल्जर डॉट कॉम’ या ठिकाणी दिली आहे.) या व्यायामशाळेने १९३६ साली यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला होता. दीड-दोन महिने आगबोटीने प्रवास करीत हा चमू आपला भगवा झेंडा घेऊन जर्मनीत पोहोचला. तिथे व्यायाम परिषदेत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गदगा फिरवणे हे भारतीय व्यायामप्रकार करून दाखवले, त्याचे जगभर कौतुक झाले. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर हिटलर, गोबेल्स प्रभृति हजर होते. सिद्धनाथ काण्यांच्या आग्रहास्तव संघाच्या पथसंचालनाच्या वेळी ’गॉड सेव्ह द किंग’ऐवजी ’वंदे मातरम्’ हे गीत वाजवण्यात आले. हे राष्ट्रप्रेम पाहून हिटलरने स्वतः डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांना प्लॅटिनम मेडल व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले. संघाच्या जाण्यायेण्याचा आणि जर्मनी राहण्याचा सर्व खर्च औंध संस्थानचे अधिपती श्रीमंत पंतप्रतिनिधी यांनी केला होता. वीर वामनराव जोशींमुळेच महात्मा गांधी, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती[ संदर्भ हवा ].
१९८९साली ६२वे मराठी साहित्य संमेलन या जागतिक कीर्तिप्राप्त अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात भरले होते. अध्यक्ष कथालेखक प्राचार्य के. ज. पुरोहित (शांताराम) होते, तर स्वागताध्यक्ष केरळचे तत्कालीन राज्यपाल रा. सू. गवई होते.
वामनराव जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त संस्कार भारतीच्या अमरावती शाखेच्या वतीने रविवार, २१ मार्च, इ.स. २०१० रोजी अमरावतीत बडनेरा मार्गावरील व्यंकटेश लॉनमध्ये मोठा समारंभ झाला होता.