Jump to content

वाजंत्री

विशिष्ट प्रसंगी केले जाणारे सामूहिक वाद्यवादन व ते करणारे वादक या दोन्ही अर्थी ‘वाजंत्री’ ही संज्ञा वापरली जाते. अनेक वाद्ये एकत्र आणण्यातून विविध आविष्कार सिद्ध होऊ शकतात. प्रयोजन, प्रयोगाचे स्थळ आणि वाद्यांची निवड वगैरेंवरून ते निराळे होतात. उदा., नाट्यप्रयोगात भरताने वर्णिलेला ‘कुतप’, प्रांगणीय संगीतासाठी वाद्यघोष [⟶ बँड], तर कलासंगीतात ⇨ वाद्यवृंद यांचा निर्देश करता येईल. शिवाय युद्धप्रसंगीचा समरघोषही काहीसा निराळा जाणवतो. या सर्व प्रकारांना भारतात दीर्घ परंपरा आहे. भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये कुतप या वाद्यमेळाची व्यवस्था आणि त्याचा नाटकात उपयोग वर्णिले आहेत. हर्षचरितामध्ये सैनिकांच्या प्रयाणाच्या वेळी ‘गुंजा’नामक समरवाद्ये समूहाने वाजविणाऱ्या वाजंत्र्यांचा उल्लेख सापडतो. मनूने ‘वेण’ या जातीच्या लोकांचा वाजंत्र्याचा व्यवसाय असल्याचे म्हणले आहे. (१०. ४९ ).आदिपुराणातही वेण वाजंत्र्यांचा राजाज्ञेचे उद्‌घोषक म्हणून उल्लेख येतो. अमरावतीच्या प्राचीन शिल्पामध्ये शंख वाजविणारे स्त्री-पुरुष वाजंत्री पाहण्यास मिळतात तर सांची येथील एका शिल्पामध्ये दोघे वाजंत्री लांब तुताऱ्या वाजवीत असल्याचे दाखविले आहे. देवादिकांच्या उत्सवांमध्ये आणि राजेरजवाड्यांच्या स्वारीच्या समारंभांमध्ये फक्त स्वरांचा झोत असणारे शिंग पूर्वी रेड्याचे शिंग वाजविण्याची पद्धत खूप पूर्वीपासून आपल्याकडे आहे.पूर्वी रेड्याचे शिंग वाजविण्यात येई. त्यावरून ‘शिंग’ हे नाव पडले. गुरव समाजातील मोगरशिंग वाजविणारे प्रसिद्ध आहेत.

भारतातील विविध प्रांतांमध्ये गावोगावी वाजंत्रीचा ताफा घेऊन हिंडणाऱ्या अनेक जातिजमाती आहेत. मानवशास्त्र खाते आणि शिरगणती खाते यांनी पद्धतशीर पाहणी करण्यापूर्वी जातिभेदाचे खरे स्वरूप आपणास अवगत नसल्यामुळे तसेच अनेक वाजंत्री लोक शेती आणि अन्य उद्योग-व्यवसायही करीत असल्यामुळे वाजंत्र्यांची सुरुवातीची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र १९०१ च्या प्राथमिक खानेसुमारीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये वाजंत्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची लोकसंख्या १६६१ एवढी होती.

महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे ढोलके, सनई आणि सूर वाजविणारी गोपाळ ही महारांतील जमात फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. या व्यावसायिक वाजंत्र्यांना त्यांच्या ठरलेल्या बिदागीखेरीज विवाहसमारंभप्रसंगी मांडलेल्या पाटावरील तांदूळ आणि रुक्का ही काही नाणी देण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रातील सोलापूरकडील मातंगांपैकी होलार ही जमात अलगूज, सनई आणि डफ वाजविणारी वाजंत्री म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील भराडी हे भैरवाचे उपासक वाजंत्री डमरू वाजवून भिक्षा मागतात. वाजंत्री वाजविणे हा प्रमुख व्यवसाय असलेले घडशी महाराष्ट्रात आढळतात. त्यांच्या मूळ पुरुषासंबंधीची एक आख्यायिका अशी सांगतात, की श्रीराम आणि सीता यांच्या विवाहप्रसंगी वाजंत्री मिळाले नाहीत, तेव्हा श्रीरामाने चंदनाचे तीन पुतळे करून त्यांच्यांत प्राण घातला. मग त्यांनी एकाला संबळ, दुसऱ्याला सूर आणि तिसऱ्याला सनई दिली. वाजंत्रीतील संगीत कालौघात बदलत आलेले दिसते. लोकप्रिय झालेल्या चित्रपटगीतांपासून सर्वांचा बेमालूम समावेश त्यात झालेलाही आढळतो. मुख्यतः प्रांगणीय आविष्कार हे प्रयोजन असल्याकारणाने वाजंत्रीचे उच्चस्वरी, ठसठशीत वादन कानात भरल्याशिवाय राहत नाही. विवाहादी प्रसंगी मंगलसूचक वादन हे महत्त्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे सांगीतिक गुणवत्तेवर भर न राहणे स्वाभाविक वाटते.  

कर्नाटकातील मूळच्या तिरुपती येथील हळ्ळीर या जातीचा परंपरागत व्यवसाय वाजंत्री वाजविणे हा असून ते आपल्या ढोल, समेळ, कांसाळ, सनई, शिंगइ. वाद्यांची पूजा करतात तर कर्नाटकातील कानडी मांगांमध्ये सनादी किंवा वाजंत्रीसारखा पोटभेद असून मध्यप्रदेशातील मांग वाजंत्र्यांमध्ये डफ वाजविणारे डफळे हा पोटभेद आहे.  

वाजंत्री व्यवसाय करणारी भारतातील बहुसंख्य मंडळी ही मागासवर्गांतील आहेत. त्यांमध्ये महत्त्वाचा अपवाद म्हणजे दक्षिणेतील तंबल हे वाजंत्री पुरोहिताच्या वर्गातील असून ते प्रामुख्याने नागस्वरम् ह्या स्वरछिद्रांच्या वाद्याचा आणि अन्य तालवाद्यांचा वापर करतात. उत्तर प्रदेशातील बरड ही वाजंत्र्याची जात ढोल, नगारा, तबला इ. वाद्ये वाजविण्याप्रमाणेच तयार करण्यातही वाकबगार आहे. ओरिसात शैवपंथी देवालयांत आणि ब्राह्मणांच्या विवाहसमारंभात शंख वाजविणारी रावुळो ही वाजंत्र्याची जात आहे. हिमाचल प्रदेशातील व्यावसायिक वाजंत्री सनई, ढोल, नगारी, काहळ, रणशिंग व बासरी ही वाद्ये वाजवितात. पंजाब आणि राजस्थान येथील मुसलमानांमध्ये मिरासी जातीचे लोक वाजंत्र्याचा व्यवसाय करून भीक मागतात. मंजिरी, किंगरी आणि ढोलक ही त्यांची वाद्ये असतात. दक्षिण भारतातील पानो ही जात वाजंत्र्याचे काम करून त्याच्या मोबदल्यात अन्न, वस्त्र आणि मद्य मिळवितात.

तमिळनाडूमध्ये मेलक्कारण व सवलैक्कारन अशा दोन वाजंत्री व्यावसायिकांच्या प्रमुख जाती आहेत. मेलक्कारणचा शब्दशः अर्थ वादनकार असा असून हे वाजंत्री तंजावरच्या भागात आढळतात. सवलैक्कारन या मच्छिमारीच्या जातीतील काहीजण शेतीबरोबरच देवालयात वाजंत्र्याचे काम करतात तर तेथील परैयन (परै म्हणजे ढोल) केवळ ढोलवाजंत्री म्हणून प्रसिद्ध आहे. मंगरूळ जिल्ह्यातील मोगेर लोकांचा मासे पकडणे हा प्रमुख व्यवसाय असला, तरी त्यांपैकी काहीजण वाजंत्र्याचा प्रमुख व्यवसाय करतात. गुजरातमध्ये गुर्ज नामक शूल वाजविणारी सुन्नी पंथी मुसलमानांची रकई ही भिक्षेकरी जात आहे. ती वाजंत्र्याचा व्यवसाय करणारी असली, तरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करण्याकडे या लोकांचा कल असतो.


वंशपरंपरागत वाजंत्री वाजविण्याचा व्यवसाय करणाऱ्या भारतातील सर्वसाधारण ताफ्यांमध्ये निरनिराळी वाद्ये वाजविणाऱ्या तीन ते चार वादकांचा समावेश असतो. सूर आणि ताल यांचा सुंदर संगम साधणे, हा प्रामुख्याने मंगलप्रसंगी जे वाजंत्री वाजवितात त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या या वादनात होणारा एकत्रित सांगीतिक परिणाम काहीसा शास्त्रीय मैफलीतील रागदारीचा आभास निर्माण करतो.  

वाजंत्री हा एक परंपरागत लोकसंगीतातील वाद्यवृंदाचाच प्रकार म्हणता येईल. या पारंपरिक ग्रामीण वाद्यवृंदाने आपले अभिजात वादन आजही जपले आहे. भारतातून मॉरिशससारख्या सुदूर देशात गेलेल्या वाजंत्र्यांनी तेथेही आपला वादनाचा ठसा उमटविला आहे. तेथील मराठी माणसांच्या रविवारी होणाऱ्या लग्नसमारंभांमध्ये वाजंत्र्यांचा बहुमान करण्यात येतो.

शेती आणि अन्य व्यवसायांत गुंतलेले वाजंत्री सोडल्यास साधारणपणे भारतातील निव्वळ वाजंत्रीचा व्यवसाय करणाऱ्या मंडळींचे राहणीमान फारसे समाधानकारक नसते. शिवाय वर्षाचे बारा महिने वाजंत्री व्यवसायात काम मिळत नसल्यामुळे आणि यांत्रिक प्रगतीमुळे नव्या पिढीतील वाजंत्री अन्य नोकरीधंद्यांत दाखल होतात. तरीही भारतातील सर्वच प्रांतांमध्ये आजही वाजंंत्री जातिजमाती आपल्या जुन्या कर्तृत्वाचा सांगीतिक वारसा जोपासताना दिसतात.