वसंत विचारधारा (वसंतवाद)
वसंतविचारधारा (वसंतवाद) ही महानायक वसंतराव नाईक यांनी अंगीकारलेल्या विशिष्ट मूल्याधारित जीवनशैलीला व सामाजिक आणि राजकीय चळवळींतील तत्त्वप्रणालीला उद्देशून प्रचलित झालेली एक स्थूल संज्ञा आहे. यामध्ये मुख्यतः विकेंद्रीकरण , स्वावलंबन , सर्वसमावेशकता , सहिष्णुता , कृषीनिष्ठा , दूरदृष्टी या तत्त्वाचा मुख्यतः समावेश होतो. वसंतवाद हे सामाजिक न्यायाचे प्रकर्षाने समर्थन करणारे आहे. वसंतविचारधाराचे अभ्यासक तथा 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीमेचे' प्रवर्तक, विचारवंत एकनाथराव पवार यांच्या मते , "वसंत विचारधारेचे मुलतत्वे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक,विकेंद्रित आणि दूरदर्शी असून कोणत्याही विशिष्ट जात्यांधता किंवा धर्मांधता याला कुठेही स्पर्शत नाही. त्यामुळे वसंतविचारधारेचा केंद्र बिंदू हा 'माणूस' राहिला आहे. वसंतराव नाईकांचे जीवनमूल्ये, दूरगामी सर्जनशील विचार आणि विकासाभिमुख तत्वांचा परिपाक म्हणजे वसंतविचारधारा होय." वसंतविचारधारा यालाच 'नाईक विचारधारा' , नाईक थॉटस्' (V. P. Naik Thoughts) असेही म्हटल्या जाते. वसंतविचारधारा अर्थात वसंतवादाचा (Vasantism) विकासात्मक सामाजिकरणाच्या दृष्टीने अभ्यास होणे तितकेच गरजेचे आहे.[१][२] पहिले वसंतवादी साहित्य संमेलन नागपूर येथे संपन्न झाले.तिसऱ्या वसंतवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्रा. जयसिंग जाधव यांनी भूषविले.
वसंतविचारधारेचा शेतकरी , वंचितावरील प्रभाव
वसंतविचारधारा ( Naik Thoughts) चा प्रभाव हा अधिकतेने शेतकरी, वंचित, ग्रामीण भागावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तथापि राजकीय क्षेत्रात देखील 'वसंतविचारधारा' चा प्रभाव दिसून येतो. महानायक वसंतराव नाईक यांनी शेतकरी, कामगार, गरिब, दुर्बल , विमुक्त अशा सकल बहुजन घटकांचे सबलीकरण करून त्यांना आत्मसन्मान बहाल केले. त्यांनी हरितक्रांती, श्वेतक्रांती यशस्वीपणे घडवून आणली. शिवाय रोजगार हमी योजना आणि पंचायत राजची मुहूर्तमेढ रोवली, त्यामुळे वसंत विचारधारेचा प्रभाव स्वाभाविकच शेतकरी, वंचित, दुर्बल अशा बहुजन घटकावर पडल्याचे दिसून येतो. वसंतराव नाईक हे एक स्वतः प्रगतशील शेतकरी आणि दूरदर्शी विचारवंत होते. "जोपर्यंत कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून येणार नाही, तोपर्यंत देशात अमूलाग्र प्रगती साधली जाणार नाही." वर्ग संघर्षातून गरिबी संपुष्टात येणार नाही. शेतकरी-कामगारात आशावाद निर्माण करून सामाजिक न्यायाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल." असे वसंतराव नाईकांचे प्रेरक विचार विकासाला गवसणी घालणारे आहे. [३] सर्व घटकांच्या हिताला सामावून घेणारी, लोक कल्याणाचा मार्ग दाखवणारी विचारधारा असल्याने 'वसंत विचारधारा (V.P.Naik Thoughts) जनमानसात रुजविण्यासाठी पुढाकार घेणारे प्रख्यात विचारवंत एकनाथराव पवार यांनी "वसंत विचारधारा ही एक लोकाभिमुख विकासवाहिनी होय."[४] असे मत मांडले आहे.
वसंतवादाला चालना देणारे उपक्रम
•वसंत व्याख्यानमाला
•वसंतवादी साहित्य संमेलन
•थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम
•शेतकरी कृतज्ञता सप्ताह
वसंतविचार
•शेती ही उद्योगाची जननी आहे. शेती संपन्न झाली तरच लोकशाही संपन्न होईल. शेती मोडली तर लोकशाही मोडेल. (७जून १९७१ कॉंंग्रेस शिबीर)
• शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. वंचित घटकाला अन्नाबरोबरच आता उद्यमशील शिक्षणाची सुद्धा तितकीच गरज आहे. (वरोली, नवाटी भूमीपूजन सोहळा, १९६३)
• शिक्षणाने आपल्यात माणुसकी यायला पाहिजे. समाजाप्रती कृतज्ञतेची भावना सतत मनात रहावी, ही बीजे शिक्षणातून रुजायला हवीत. (आंध्र दीक्षांत समारोह, १५ मार्च १९७०)
• माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे, धर्माच्या जातीच्या नावाखाली त्याला कमी लेखणे यासारखा दूसरा कोणताही असंस्कृतपणा नाही.(अस्पृश्यता निवारण शिबीर, नागपूर)
हे सुद्धा पहा
• गांधीवाद
संदर्भ
- ^ पवार, एकनाथराव (मार्च 2021). "वसंतविचारधारा विकासाचा पासवर्ड : एक चिकित्सा". बंजारा पुकार: 3.
- ^ पवार, एकनाथराव (मार्च 2018). वसंत विचारधारा : समग्र विकासाची लोकधारा. मुंबई: ऄआयबीएसएस मुंबई.
- ^ पवार, एकनाथराव (एप्रिल 2022). "आधुनिक भारत के कृषिसंत वसंतराव नायक". POKRJ. I.
- ^ पवार, एकनाथराव (२०२३). "वसंत विचारधारा एक लोकाभिमुख विकासवाहिनी". नांदेड. pp. ३.