Jump to content

वसंत नीलकंठ गुप्ते

वसंत नीलकंठ गुप्ते

वसंत नीलकंठ गुप्ते (मे ९, इ.स. १९२८ - सप्टेंबर ९, इ.स. २०१०) हे मराठी समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक होते.

जीवन

गुप्त्यांचा जन्म मे ९, इ.स. १९२८ रोजी महाराष्ट्रात पनवेल येथे झाला. बडोदा, मुंबई आणि पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले. राष्ट्रसेवा दलात सहभागी झाल्यानंतर एस. एम. जोशी आणि साने गुरुजींच्या प्रभावाखाली आल्यानंतर त्यांच्या कामाला गती आली. दरम्यान इ.स. १९४९ साली पुण्यातील आय.एल.एस. विधिमहाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. शिक्षणानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. तेथे समाजवादी पक्षाच्या कामात सहभाग घेण्यास त्यांनी सुरुवात केली. कामगारांच्या समस्यांवरील खटले लढवणे, संघटनात्मक बांधणी इत्यादी कामांत त्यांनी विशेष सहभाग घेतला. इ.स. १९५२ साली मिल मजदूर सभेचे काम करणाऱ्या शालिनी पाटील या कामगार-कार्यकर्तीबरोबर त्यांनी विवाह केला. गुप्ते व शालिनीबाई या दोघांनी मिळून कामगार चळवळीचे कार्य पुढेही चालू ठेवले. इ.स. १९७१ साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयात ४० कंपन्यांच्या वकिलांसमोर कामगारांचा एकमेव वकील म्हणून उभे ठाकून गुप्त्यांनी तो खटला कामगारांना जिंकून दिला.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या जीनिव्हा येथील अधिवेशनात त्यांनी लागोपाठ तीन वेळा भारतीय कामगारांच्या शिष्टमंडळात प्रतिनिधित्व केले. गुप्त्यांनी मिल मजदूर सभेचे सरचिटणीसपद, अध्यक्षपद काही काळ सांभाळले. हिंद मजदूर सभेचेही ते काही काळ राष्ट्रीय सचिव होते. हिंद मजदूर सभेच्या पुढाकाराने कामगार चळवळीच्या संशोधनार्थ स्थापलेल्या मणिबेन कारा लेबर इन्स्टिट्यूट या संस्थेचे ते स्थापनेपासून संचालक होते. कामगार चळवळीच्या अनुषंगाने त्यांनी मराठी व इंग्लिश भाषांतून ग्रंथ, निबंध लिहिले.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार भाषा प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
मुंबईतील कामगार चळवळललितेतरमराठी
आंतरराष्ट्रीय कामगार चळवळललितेतरमराठी
नोकरीतील समस्याललितेतरमराठी
कामगारांचा संपाचा हक्कललितेतरमराठी
स्त्रीजातीचा प्रवासअनुवादितमराठी
ऑस्कर वाइल्डच्या कथाअनुवादितमराठी
उलटी पावलंअनुवादितमराठी
गुलामगिरीला आव्हानअनुवादितमराठी
लेबर मूव्हमेंट इन बाँबेललितेतरइंग्लिश१९८१