वसंत आजगावकर
वसंतराव आजगावकर हे एक मराठी भावगीत गायक आणि संगीतकार आहेत. ते डोंबिवलीत राहतात.
गिरगावात जन्मलेले वसंतराव वयाच्या पाचव्या वर्षी डोंबिवलीत राहायला आले. तेथे स.वा. जोशी विद्यालयात त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे ते माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये शिकले. डोंबिवलीतील पं. एस. के. अभ्यंकर यांच्याकडे वसंतरावांनी संगीताचे शिक्षण घेतले. १९५८ च्या सुमारास त्यांनी आकाशवाणीवरून गाण्यास सुरुवात केली.
सुधीर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव 'संपूर्ण गीतरामायण' हा कार्यक्रम करू लागले. हिंदीत भाषांतरित झालेल्या गीतरामायणाचे असंख्य कार्यक्रम त्यांनी केले. त्याशिवाय वेगवेगळ्या विषयांवरील कार्यक्रमांमधून गायक-संगीतकार वसंतराव आजगावकर रसिकांना सतत भेटत राहिले आहेत. त्यांनी दिल्ली, आग्रा, कानपूर, लखनौ, हैदराबाद, बेंगलोर, अहमदाबाद, बडोदा, कलकत्ता या ठिकाणीही अनेक कार्यक्रम केले आणि आपला वेगळा रसिकवर्ग तयार केला. त्यांनी आजवर त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत हजारांहून अधिक गीतगायनाचे कार्यक्रम केले आहेत.
वसंत आजगावकरांनी केलेले सार्वजनिक कार्यक्रम
- आचार्य अत्रे विरचित 'झेंडूची फुले'मधील विडंबन कवितांचे साग्रसंगीत गायन
- श्रीगजानन गीतांजली
- गीत रामायण (मराठी-हिंदी)
- गुरुचरित्रावर आधारित गीतदत्तात्रेय
- संत नामदेवरचित ज्ञानेश्वर समाधीच्या अभंगांचा 'अवस्था लावोनि गेला' हा कार्यक्रम
- व्यासरचित महाभारतावर आधारित गीतमहाभारत (पहिला कार्यक्रम १९७०मध्ये)
- शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीतशिवायन
- मर्ढेकरांच्या कवितांचा एक नादानुभव हा कार्यक्रम
- श्रीरामचरितमानसचे गायन
- रामदास म्हणे
- विंदांची प्रेमगाणी
- श्रीसाई चरित्रगान
- सावरकर दर्शन
- हिंदी भजनांच्या गायनांचा 'संतोंकी बानी' हा कार्यक्रम
गाणी
- आली कुठूनशी कानी, टाळ मृदुंगाचि धून (कवी - सोपानदेव चौधरी; गायक/संगीतकार - वसंत आजगावकर)
- चांदणे निळे टिपूर (कवी- गुरुनाथ शेणई; संगीत - रंजना पंडित); गायक - वसंत आजगावकर)
- पाषाणातुनी वेड्या का तू बघसी रे श्रीराम, अंतरी आहे आत्माराम (कवी - मधुकर जोशी; संगीत - वसंत आजगावकर; गायिका - माणिक वर्मा)
- भुलविलेस साजणी (कवी - सुधांशु; गायक/संगीतकार - वसंत आजगावकर)
- या पाण्याची ओढ भयानक (कवी - वसंत बापट; गायक/संगीतकार - वसंत आजगावकर)
- स्मरा स्मरा हो (कवी - सुधांशु; गायक/संगीतकार - वसंत आजगावकर)
- हात दिला ग हाती (कवी - गुरुनाथ शेणई; संगीतकार - रंजना पंडित; गायक - वसंत आजगावकर)
- हात धरी रे हरी पहा पण, करांत माझ्या वाजे कंकण (कवी - मधुकर जोशी; संगीत - वसंत आजगावकर; गायिका - माणिक वर्मा)
- हिरवे-पिवळे तुरे उन्हाचे (कवी - इंदिरा संत; गायक/संगीतकार - वसंत आजगावकर)
सन्मान आणि पुरस्कार
- डोंबिवलीच्या टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला गेलेला 'डोंबिवली सेवा‘ पुरस्कार (१-२-२०१२)
- वसंत आजगावकरांचे संगीत, मधुकर जोशी यांची रचना आणि माणिक वर्मांचे गायन असे संगीतप्रेमींसाठी त्रिवेणी संगम असलेली पहिली ध्वनिमुद्रिका इ.स. १९६२ साली निघाली होती. यातील हात धरी रे हरी पहा पण, करात माझ्या वाजे कंकण, आणि आहे आत्माराम अंतरी या गाण्यांनी लोकप्रियतेचे शिखरही गाठले होते. या घटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डोंबिवलीच्या स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समितीतर्फे २९ जुलै २०१२ रोजी 'करात माझ्या वाजे कंकण' या सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कवी मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते वसंत आजगावकर आणि मधुकर जोशी यांना सुलश्री पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला गेला.
- २०१६ सालचा चतुरंग प्रतिष्ठानचा चतुरंग चैत्रपालवी संगीत सन्मान पुरस्कार जाहीर
कौटुंबिक माहिती
वसंत आजगावकरांचे सुपुत्र निनाद आजगावकर हेही गायक आहेत.