वसंत अनंत माळी
वसंत अनंत माळी | |
---|---|
कार्यकाळ | १९३४–२०११ |
वसंत अनंत माळी (जन्म २२ ऑगस्ट १९११ - मृत्यू ८ ऑक्टोबर २०११) हे महाराष्ट्रातील ख्यातनाम चित्रकार होते.[१] पटावर कुचंल्याचा विशिष्ट तऱ्हेने वापराने रंगलेपन करण्याची आणि त्याद्वारे रंगछटा साधण्याची त्यांनी स्वतःची शेली विकसित केली होती. ह्या शैलीतील त्यांची कडकलक्ष्मी, मोरवाली, वसईवाले, बैरागी ही चित्रे प्रसिद्ध आहेत.[२] ते व्यक्तिचित्र रंगवण्यात निष्णात होते. त्यांनी अनेक व्यक्तिचित्रे रंगवलेली आहेत.
बालपण
वसंत अनंत माळी यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्याचे वडील अनंत आणि आजोबा मल्हार हे देखिल चित्रकार होते. त्यांच्या आईचे नाव मुक्ताबाई. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले होते.[३]
शिक्षण
वसंतराव केवळ दहा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे मित्र कोलवालकर यांनी वसंत माळी यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली व त्यांना मुंबईला बोलावले. मुंबईच्या इंपिरिअल शाळेमध्ये त्यांचे पुढील शिक्षण सुरू झाल्यावर तेथे कलाशिक्षक असणाऱ्या गाडगीळ मास्तरांनी या मुलाची चित्रकलेतील प्रगती पाहून त्यांना गिरगावातील चित्रकर केतकरांच्या वर्गाला घालण्याचा सल्ला दिला. या वर्गांचा माळींना फायदा झाला. तेथवरची त्यांची चित्रकलेतील प्रगती पाहून त्यांना सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये थेट तिसऱ्या वर्षात प्रवेश मिळाला.[३]
चित्रकलेतील शिक्षण
सर जे.जे. आर्ट स्कूलमधील धुरंधर, तासकर, आगासकर, चुडेकर, नगरकर इ. नामवंत कलाशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे वसंतरावांची चित्रकला बहरली. व्यक्तिचित्रणावर त्यांनी भरपूर मेहनत केली. खास करून चुडेकर मास्तरांच्या विरोधी रंगछटांच्या व धाडसी फटकारे असणाऱ्या चित्रांचा प्रभाव त्यांच्यावर अधिक पडला.[३] पुढे त्यांनी स्वतः विकसित केलेल्या त्यांच्या वैशिष्टपूर्ण शैलीवरही चुडेकर मास्तरांच्या ह्या शैलीचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. १९३४ साली अतिशय कडक निकाल लागला. त्यावर्षी असणाऱ्या अठरा विद्यार्थ्यापैकी अवघे पाचच विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले, त्यात वसंतरावांचे नाव होते. ते डिप्लोमा पास झाले.[२]
कार्य
वसंतरावांनी रंगलेपनाची आणि रंगछटा साधण्याची स्वतंत्र अशी शैली विकसीत केली होती. या शैलीत ते मोठ्या आकाराच्या रंगपटावर (कॅनव्हासवर) कुंचल्याच्या अचूक आणि लयबद्ध फटकाऱ्यांनी चित्रे काढीत असतं. यासाठी ते चुपटे आणि मोठ्याआकाराचे कुचंले वापरीत असतं. कुचंल्याच्या दोन फटकाऱ्यात काही जागा मोकळी सोडत असतं. यास कुचंल्यावरचे प्रभुत्व आणि आकर्षक रंगसंगती यांची जोड मिळाल्याने पहाणाऱ्याला मोहवून टाकील अशा चित्रांची निर्मिती होत असे. या शैलीत त्यांनी साकारलेली कडकलक्ष्मी, मोरवाली, वसईवाले, बैरागी ही चित्रे प्रसिद्ध आहेत.[२]
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी व्यक्तिचित्रणाच्याच क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्याच्या मामांनी स्वत-च्या गुरुदास फोटो स्टुडीओतील स्वतंत्र खोलीत व्यक्तिचित्रणाच्या स्टुडिओ सुरू करायला जागा दिली.[४] वसंतरावांच्या दिनचर्येप्रमाणे ते सकाळी फिरून नाष्टा करून प्रिन्सेस वरच्या या गुरुदास स्टुडीओत कामाला जायचे ते संध्याकाळपर्यंत काम करून रात्री ८ वाजल्यानंतरच घरी परतायचे.[५]
काळात मुंबई मध्ये कर्याविस्तार आणि लोकसेवा करण्याच्या उद्दिष्टाने सद्गुरू दादा भागवत (दत्तात्रय भास्कर भागवत) वास्तव्याला होते. त्यांना योगायोगाने वसंत माळी यांजकडून प. पू. साई बाबांचे चित्र बनवून मिळाले. त्यांच्या कार्यात बाबांच्या या फोटोचा मोठ्या आदराने, आजदेखील सर्वच केंद्र की जे आजही कार्यरत आहेत, उपयोग पूजनात केला जातो.
त्यांची सही फोटोच्या डाव्या बाजूस खालच्या कोपऱ्यात आहे.
संदर्भ
- ^ नलिनी भागवत; माळी, वसंत अनंत ; समाविष्ट : विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश; खंड ०६; दृश्यकला; संपा. बहुळकर, सुहास आणि घारे, दीपक; साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था); २०१३; मुंबई (पृ. ४०९-४११)
- ^ a b c ग.आ.गांगल, चित्रकार वसंतरावांचे शब्दचित्र, समाविष्टः व्हि. ए. माळी, प्रकाशन- गांगल पब्लिकेशन्स्, पहिली आवृत्ती, २८ एप्रिल २००६, पृष्ठ- १५
- ^ a b c नलिनी भागवत; माळी, वसंत अनंत ; समाविष्ट : विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश; खंड ०६; दृश्यकला; संपा. बहुळकर, सुहास आणि घारे, दीपक; साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था); २०१३; मुंबई (पृ. ४०९)
- ^ सौ. प्रफुल्ला डहाणूकर, अजातशत्रू श्री. माळी समाविष्टः व्हि. ए. माळी, प्रकाशन- गांगल पब्लिकेशन्स्, पहिली आवृत्ती, २८ एप्रिल २००६, पृष्ठ- १३
- ^ सौ. इंदिरा वसंतराव माळी, माझे पति-श्री. वसंतराव माळी, समाविष्टः व्हि. ए. माळी, प्रकाशन- गांगल पब्लिकेशन्स्, पहिली आवृत्ती, २८ एप्रिल २००६, पृष्ठ- १८