वराहमिहिर
ज्योतिष शास्त्रावर ग्रंथ लिहिणारे दोन वराहमिहिर झाले आहेत
पहिला वराहमिहिर हा ज्योतिष विषयक ग्रंथ लेखक होता. त्याने इ.स पूर्व पहिल्या शतकात पंचसिद्धिका या राशिगणितात्मक ग्रंथाचे लेखन केले. दुसरा वराहमिहिर हा उज्जैन येथे वास्तव्यास होता. त्याने इ.स. ५०५ मध्ये अभ्यासाची सुरुवात केली. तो इ.स. ५८७ला वारला.[१] त्याने बृहत्संहिता या ग्रंथाचे लेखन केले. वराहमिहिर दुसरा हा एक प्रख्यात गणिती व ज्योतिषी होता. शके ४१२ किंवा ४९० मध्ये त्याचा जन्म झाला असावा असे ज्येष्ठ इतिहासकार व ज्योतिषी श्री. शं. बा. दीक्षित म्हणतात. शके ५०९ मध्ये तो मृत्यू पावला. म्हणजे इ.स.च्या सहाव्या शतकात तो होऊन गेला. त्याने गणित, जातक, संहिता या ज्योतिषाच्या तीनही शाखांवर ग्रंथरचना केली आहे. त्याच्या पंचसिद्धांतिका या ग्रंथाच्या १४ व्या अध्यायात काही यंत्रे व काही रीतींची माहिती दिली आहे. बृहत्संहिता हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा खजिनाच आहे. याच्या १४ व्या कूर्माध्यायात पर्जन्य गर्भलक्षण, गर्भधारण व वर्षण हे विषय आहेत.त्यात मार्गशीर्षदि मासात पर्जन्यवृष्टी कशी होईल ते सांगितले आहे. तसेच पर्जन्यमापनाची रीतही दिली आहे. उदकार्गल प्रकरणात पाण्याचा शोध घेण्याविषयी ठोकताळे सांगितले आहेत. श्री. शं. बा. दीक्षित म्हणतात, ‘सृष्टिज्ञानाच्या ज्योति:शास्त्र या एका शाखेवर ग्रंथ करणारे पुष्कळ झाले, परंतु त्याच्या अनेक शाखांवर विचार करणारा ज्योतिषी दुसरा झाला नाही. नानाप्रकारचे सृष्टिचमत्कार, पदार्थाचे गुणधर्म, त्यांचा व्यवहारातील उपयोग याकडे त्यांचे बारीक लक्ष होते. त्याने पूर्वसूरींची ऋणेही लपवून ठेवली नाहीत. जागोजागी गर्ग, पराशर, असित, देवल इ. ऋषींची नावे देऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे अमुक विषय सांगतो, असे वराहमिहिर स्पष्टपणे म्हणतो.
संदर्भ
- ^ १ संस्कृत वाङमयाचा इतिहास, इ.स. १९२२ चिंतामण विनायक वैद्य, वरदा प्रकाशन, पुणे.