वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडी | |
---|---|
पक्षाध्यक्ष | प्रकाश आंबेडकर |
स्थापना | २४ मार्च २०१९ |
राजकीय तत्त्वे | संविधानवाद, आंबेडकरवाद, सामाजिक न्याय, सामाजिक समता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, पुरोगामित्व |
संकेतस्थळ | [१] |
वंचित बहुजन आघाडी (संक्षिप्त: वंबआ, व्हीबीए) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे, ज्यांची स्थापना प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे. २४ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीची भारतातील 'राजकीय पक्ष' म्हणून नोंदणी झाली.[१] प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत.
२०१९ मध्ये, या पक्षाने एआयएमआयएम पक्षासह १७व्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवल्या, ज्यात एका जागेवर एआयएमआयएम उमेदवार उभा होता तर इतर ४७ जागांवर वंबआचे उमेदवार उभे होते.[२][३] या युतीतील, इम्तियाज जलील हा एकमेव एआयएमआयएमचा उमेदवार विजयी झाला तर वंबआचे संपूर्ण ४७ उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीमध्ये वंबआने ३७ लाख (७.६४%) मते मिळवली. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पक्षाने २८८ पैकी २३४ जागांवर आपले उमेदवार उभे केले, मात्र हे सर्वजण पराभूत झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीने २५ लाख मतदान (४.६%) मिळाले. १२ लाख मतांनी वंचितचे मताधिक्य घटले.
इतिहास व पार्श्वभूमी
इ.स. १९९४ पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. त्यांनी ४ जुलै १९९४ रोजी भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली.[४] हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक गट होता.[५] आंबेडकरांनी पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून 'अकोला पॅटर्न' राबविला आणि जिल्हा परिषदसारख्या स्थानिक स्वराज राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्यानंतर १९९५ च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेतले. १९९९ ते २०१४ पर्यंतच्या सर्व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत.[६]
२०१४ मध्ये झालेल्या १६व्या लोकसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या ति किटावर राज्यात २३ उमेदवार उभे केले होते, मात्र सर्वांचा पराभव झाला. त्यांना एकत्रित ३,६०,८५४ (०.७%) मते मिळाली होती.[७] २०१४ मध्ये झालेल्या १३व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या ति किटावर ७० उमेदवार उभे केले होते, मात्र त्यापैकी केवळ एकच उमेदवार विजयी झाला. सर्व उमेदवारांना एकत्रित ४,७२,९२५ (०.९%) मते मिळाली होती.[८]
२० मे २०१८ रोजी पंढरपूर येथे झालेल्या धनगर समाज मेळाव्यात "वंचित बहुजन आघाडी" हे नाव सर्वप्रथम वापरले गेले. या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते. यानंतर अनेक शोषित, वंचित असलेल्या आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अश्या समाजांच्या संघटना यात सहभागी होत गेल्या.
जून २०१८ मध्ये, लक्ष्मण माने, हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. "या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली. त्यानंतर २० मे २०१८ रोजी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. २४ मार्च २०१९ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीस नोंदणीकृत 'राजकीय पक्ष' म्हणून मान्यता दिली, आणि पुढे यात भारिप बहुजन महासंघ पक्ष विलीन करणार असल्याचेही आंबेडकरांनी म्हणले होते.[९] वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन किंवा सभा २८ सप्टेंबर २०१८ रोजी सोलापुरात झाले होती, ज्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एआयएमआयएमला या आघाडीत सहभागी करण्यासाठी एआयएमआयएम पक्षाचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली, त्यानंतर ओवैसी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या औरंगाबादमधील वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहीर केले आणि एआयएमआयएम पक्ष आघाडीमध्ये सहभागी झाला.[१०] आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा-मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरुवातीला शेतकरी, कामगार, युवक, आरक्षण अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात सत्ता संपादन मेळावे घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.[११]
२३ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथील शिवाजी पार्कवर वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण परिषद झाली होती. ह्या सभेचे अध्यक्ष आगरी-कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील होते तसेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवैसी यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या परिषदेत ओबीसींच्या हक्काबद्दलचे प्रश्न मांडण्यात आले तसेच मुंबईत आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी यांची २०० गावठाणे आहेत. त्यांचे सीमांकन करून भुमिपूत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा. याचप्रमाने झोपड़पट्टयांचा विकासही गावठाण हक्क कायद्याने व्हावा ह्या मागण्या करण्यात आल्या. शिवाजी पार्कवरील या सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता, तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापेक्षाही अधिक जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित होता.[१२] या आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीसुद्धा भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे, यासाठी प्रयत्न झाले होते. वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी धनगर, माळी, भटके, ओबीसी, छोटे ओबीसी व मुसलमान अशा सहा घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा अशा एकूण १२ जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवला. यावर काँग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंबेकडरांनी एआयएमआयएमची साथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या.[१३] "आम्ही काँग्रेससमोर [सुरुवातीला] १२ जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर [आता] २२ जागांबाबतही चर्चा होती. पण तीदेखील बारगळली आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट ४८ जागांची तयारी करून ठेवली असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.[१४]
१४ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ या पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की, "भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा 'अकोला पॅटर्न'ला यश मिळाले असले तरी भारिप या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात." त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असल्याने २०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.[१५][१६][१७][१८][१९]
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठीच्या जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यात मतभेद झाला आणि सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांची युती तुटली.[२०][२१]
उमेदवारी
१७वी लोकसभा निवडणूक, २०१९
मार्च २०१९ मध्ये, वंचित बहुजन आघाडीने आपल्या ३७ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यामध्ये उमेदवारांच्या नावासमोर त्यांच्या जातीचा किंवा धर्मांचा उल्लेख करण्यात आलेला होता. धनगर, कुणबी, भिल्ल, बौद्ध, कोळी, वडार, लोहार, वारली, बंजारा, मुस्लिम, माळी, कैकाडी, धिवर, मातंग, आगरी, शिंपी, लिंगायत आणि मराठा अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवाराच्या नावापुढे जातीचा/धर्माचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणले की, "या आधी मराठ्यांशिवाय इतर कुणाला उमेदवारी दिलीच जायची नाही. म्हणून ते जाहीर करण्याची वेळच येत नसे. हे गृहीतच धरले जायचे की उमेदवार मराठाच आहे परंतु ती नंतर मराठ्यांची सत्ता न राहता कुटुंबाची घराणेशाही झाली." आंबेडकर पुढे म्हणतात, "आज आम्ही जात जाहीर केली कारण ही पद्धत कोणताच पक्ष स्वीकारत नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षांत मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली." ज्या वंचित समाजातील लोकांना कधीही कुठल्या पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्या जातीचा/धर्माचा उल्लेख करणे आंबेडकरांना आवश्यक वाटला.[२][२२] प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु ते दोन्ही ठिकाणी पराभूत झाले. यापूर्वी ते अकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले आहेत.[२३] महाराष्ट्रातील २०१९ मधील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी औरंगाबाद मतदारसंघाच्या एका जागेवर एआयएमआयएम तर बाकीच्या ४७ जागांवर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवार उभे होते.[२४] त्यापैकी एआयएमआयएमचा एकमेव उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाला तर वंबआचा कोणताही उमेदवार जिंकू शकला नाही. राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ८० हजारांहून अधिक मते घेतली आहेत.[२५]
भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, २०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकीत, वंबआ व एआयएमआयएमच्या उमेदवारांना ४१,३२,२४२ (७.६४%) एवढी मते मिळाली होती. वंबआच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या ४७ उमेदवारांना ३७,४३,२०० एवढी मते मिळाली, हे महाराष्ट्रातील एकूण मतांच्या ६.९२% व वंबआ ने उमेदवार लढलेल्या ४७ मतदार संघातील (औरंगाबाद वगळून) मतांच्या ७.०८% होते. महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात ५,४०,५४,२४५ एवढे एकूण मतदान झाले होते, त्यामध्ये औरगांबाद मतदार संघात ११,९८,२२१ मतदान झाले होते. सर्वाधिक मते मिळवण्यात औरंगाबाद या एका लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी समर्थित एआयएमआयएम पहिल्या स्थानी होती, अकोला या एका मतदार संघात वंबआ दुसऱ्या स्थानी होती तर ४१ मतदार संघात वंबआ तिसऱ्या स्थानी होती.[२६]
लोकनिती-सीएसडीएस संस्थेच्या सर्व्हेक्षणानुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बौद्ध धर्मीयांचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला तर मुस्लिम धर्मीयांचा पाठिंबा काँग्रेसला होता. महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम मते ८७% काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला, १२% भाजप-शिवसेना युतीला व १% वंबआ-एआयएमआयएम युतीसह इतर पक्षांना मिळाली. बौद्ध मते ८१% वंचित बहुजन आघाडीला, १२% काँग्रेस आघाडीला, व ७% भाजप-सेना युतीला मिळाली.[२७]
उमेदवारांची यादी
अ.क्र. | मतदारसंघ | उमेदवार | निकाल | मिळालेली मते |
---|---|---|---|---|
१ | अकोला | प्रकाश आंबेडकर | पराभूत | २,७८,८४८ |
२ | सोलापूर | प्रकाश आंबेडकर | पराभूत | १,७०,००७ |
३ | नांदेड | यशपाल भिंगे | पराभूत | १,६६,१९६ |
४ | धुळे | नबी अहमद अहमदुल्ला | पराभूत | ३९,४४९ |
५ | अमरावती | गुणवंत देवपारे | पराभूत | ६५,१३५ |
६ | सांगली | गोपीचंद पडळकर | पराभूत | ३,००,२३४ |
७ | बुलढाणा | बळीराम सिरस्कार | पराभूत | १,७२,६२७ |
८ | लातूर | राम गारकर | पराभूत | १,१२,२५५ |
९ | बीड | विष्णू जाधव | पराभूत | ९२,१३९ |
१० | परभणी | आलमगीर खान | पराभूत | १,४९,९४६ |
११ | नाशिक | पवन पवार | पराभूत | १,०९,९८१ |
१२ | मावळ | राजाराम पाटील | पराभूत | ७५,९०४ |
१३ | उस्मानाबाद | अर्जुन सलगर | पराभूत | ९८,५७९ |
१४ | हिंगोली | मोहन राठोड | पराभूत | १,७४,०५१ |
१५ | माढा | विजय मोरे | पराभूत | ५१,५३२ |
१६ | कोल्हापूर | अरुणा माळी | पराभूत | ६३,४३९ |
१७ | नंदुरबार | दाजमल गजमल मोरे | पराभूत | २५,७०२ |
१८ | रामटेक | किरण रोडगे | पराभूत | ३६,३४० |
१९ | नागपूर | सागर डबरासे | पराभूत | २६,१२८ |
२० | रत्नागिरी-सिंधुदुर्ग | मारुती रामचंद्र जोशी | पराभूत | ३०,८८२ |
२१ | यवतमाळ-वाशिम | प्रवीण पवार | पराभूत | ९४,२२८ |
२२ | जालना | शरदचंद्र वानखेडे | पराभूत | ७७,१५८ |
२३ | दिंडोरी | बापू केळू बरडे | पराभूत | ५८,८४७ |
२४ | पुणे | अनिल जाधव | पराभूत | ६४,७९३ |
२५ | बारामती | नवनाथ पडळकर | पराभूत | ४४,१३४ |
२६ | शिर्डी | संजय सुखदान | पराभूत | ६३,२८७ |
२७ | अहमदनगर | सुधाकर आव्हाड | पराभूत | ३१,८०७ |
२८ | सातारा | सहदेव एवळे | पराभूत | ४०,६७३ |
२९ | हातकणंगले | असलम बादशाहजी सय्यद | पराभूत | १,२३,४१९ |
३० | शिरूर | राहुल ओव्हाळ | पराभूत | ३८,०७० |
३१ | चंद्रपूर | राजेंद्र महाडोळे | पराभूत | १,१२,०७९ |
३२ | गडचिरोली-चिमूर | रमेश गजबे | पराभूत | १,११,४६८ |
३३ | जळगाव | अंजली बाविस्कर | पराभूत | ३७,३६६ |
३४ | रावेर | नितीन कांडेलकर | पराभूत | ८८,३६५ |
३५ | वर्धा | धनराज वंजारी | पराभूत | ३६,३४० |
३६ | भंडारा-गोंदिया | एन.के. नान्ह | पराभूत | ४५,८४२ |
३७ | पालघर | सुरेश अर्जुन पडवी | पराभूत | १३,७२८ |
३८ | भिवंडी | ए.डी. सावंत | पराभूत | ५१,४५५ |
३९ | कल्याण | संजय हेडावू | पराभूत | ६५,५७२ |
४० | ठाणे | मल्लिकार्जुन पुजारी | पराभूत | ४७,४३२ |
४१ | उत्तर मुंबई | सुनील उत्तम थोरात | पराभूत | १५,६५१ |
४२ | वायव्य मुंबई | संभाजी शिवाजी काशीद | पराभूत | २३,३६७ |
४३ | ईशान्य मुंबई | नीहारिका खोंडले | पराभूत | ६८,२३९ |
४४ | उत्तर मध्य मुंबई | अब्दुल रहमान | पराभूत | ३३,७०३ |
४५ | दक्षिण मध्य मुंबई | संजय सुशील भोसले | पराभूत | ६३,४१२ |
४६ | दक्षिण मुंबई | अनिल कुमार | पराभूत | ३०,३४८ |
४७ | रायगड | सुमन कोळी | पराभूत | २३,१९६ |
१४वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, २०१९
वंचित बहुजन आघाडीने विधानसभेची उमेदवारी देताना ओबीसी, भटके-विमुक्त, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुस्लिम व अल्पसंख्य अशा सर्व समाजाला उमेदवारी दिली होती. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी बऱ्याच मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केले होते. या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जाहिर केलेल्या यादीनुसार, पक्षाने मराठा समाजाचे १८ उमेदवार दिले होते. १८ टक्के उमेदवार भटके-विमुक्त (एनटी) जात गटातील दिले असून त्यात बंजारा, वंजारी आणि धनगर या जातींना सर्वाधिक प्राधान्य दिले होते. अनुसूचित जातीचे (एससी) ५० उमेदवार (१७ टक्के) दिले होते; यापैकी ४२ उमेदवार बौद्ध व ८ उमेदवार चांभार, मोची, मांग आणि ढोर अश्या जातींचे होते. इतर मागास गट (ओबीसी) या समाजाचे ३२ उमेदवार (११ टक्के) दिले होते, ज्यात हलबा कोष्टी, माळी, सोनार, कुणबी, लेवा पाटील या छोट्या जातींच्या बहुसंख्य उमेदवारांचा समावेश होता. पक्षाने २५ उमेदवार (९%) मुस्लिमधर्मीय दिले होते. त्यातही मुस्लिमांतील शिकलगार, धोबी, पटवे अशा मागासवर्गीय जातगटातील उमेदवारांना वंचितने प्राधान्य दिले होते. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राज्यात असलेल्या २५ राखीव मतदारसंघांत वंचितने उमेदवार (९ टक्के) दिले होते. आदिवासींतील माना, गोंड, गोवारी या लहान जमातींना वंचितने उमेदवारीत प्रतिनिधित्व दिलेले होते. पक्षाने २५ उमेदवार (९%) धनगर समाजाचे दिले होते. वंचितने दोन ख्रिस्ती (एक ईस्ट इंडियन), एक शीख, आणि एक मारवाडी (जैन) उमेदवार दिला होता. तसेच वंचितने १२ उमेदवार (४ टक्के) या महिला दिलेल्या होत्या.[२८] वंचित बहुजन आघाडीने काही मतदारसंघात अपक्ष व एआयएमआयएमच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवलेला होता, ज्यात औरंगाबाद पूर्व, भायखळा, व कुर्ला मतदारसंघांचा समावेश होता.
वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २३४ जागांवर उमेदवार उभे केले होते, परंतु एकाही जागेवर विजय मिळाला नाही.[२९] पक्षाने २३ इतर उमेदवारांना सुद्धा पाठिंबा दर्शवला होता. बहुजन समाज पक्षानंतर (२६२ जागांवर लढले) सर्वाधिक जागा वंचित बहुजन आघाडीने लढल्या होत्या. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना २४ लाखांपेक्षा अधिक मते (४.६%) मिळाली.[३०] दहा मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना क्रमांक दोनची मते मिळाली होती, तर अनेक मतदारसंघांत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.[३१][३२][३३][३४][३५]
निवडणूक चिन्हे
२०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीच्या बहुतेक उमेदवारांना "कपबशी" हे निवडणूक चिन्ह दिले होते, तर काही उमेदवारांना किल्ली, शिट्टी व पतंग ही चिन्हे दिली होती. महाराष्ट्र विधानसभा २०१९ निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळाले होते.[३६][३७]
ध्वज
३१ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ध्वजाचे अनावरण केले. या ध्वजात अशोकचक्रासह निळा भीम ध्वज, केशरी, पिवळा व हिरवा रंग घेतलेला आहे.
जाहीरनामा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ६ एप्रिल २०१९ रोजी, वंचित बहुजन आघाडीने भारतीय संविधानाचा सरनामा हाच त्यांचा जाहीरनामा असल्याचे सांगितले. या जाहीरनाम्यात वेगवेगळ्या २७ मुद्द्यांवर भर देण्यात आला होता. त्यामध्ये केजी ते पीजी मोफत शिक्षण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आणणे, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणे, तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणे अशी अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आलेली होती.[३८][३९] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ऑक्टोबर २०१९ मध्ये, वंचित बहुजन आघाडीने आपला डिजीटल जाहिरनामा प्रसिद्ध केला, ज्यात "भारतीय संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा" असल्याचे सांगितले.[४०]
निवडणुका
लोकसभा निवडणुका
लोकसभा क्रमांक | निवडणूक वर्ष | लढवलेल्या जागा | जिंकलेल्या जागा | मिळालेली मते | राज्यातील मतांचे शेकडा प्रमाण | लढवलेल्या जागांवरील मतांचे शेकडा प्रमाण | राज्य (जागा) |
---|---|---|---|---|---|---|---|
१७वी लोकसभा | २०१९ | ४७ | ०० | ३७,४३,२०० | ६.९२ | ७.०८ | महाराष्ट्र (०) |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका
विधानसभा क्रमांक | निवडणूक वर्ष | लढवलेल्या जागा | जिंकलेल्या जागा | मिळालेली मते | राज्यातील मतांचे शेकडा प्रमाण | लढवलेल्या जागांवरील मतांचे शेकडा प्रमाण |
---|---|---|---|---|---|---|
१४वी विधानसभा | २०१९ | २३४ | ०० | २४,००,०००+ | ४.६% | — |
पक्षाचे पदाधिकारी
वंचित बहुजन आघाडी कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
- अध्यक्ष तथा सर्वेसर्वा - प्रकाश आंबेडकर
- उपाध्यक्ष - अरुण सावंत
- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष – रेखा ठाकूर
हे सुद्धा पहा
- सुजात आंबेडकर
- आंबेडकरवाद
- महाराष्ट्रातील राजकारण
- भारतीय रिपब्लिकन पक्ष
- भारिप बहुजन महासंघ
- सतरावी लोकसभा
- २०१९ लोकसभा निवडणुका
संदर्भ
- ^ author/lokmat-news-network. "वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात बदलाचे वारे!". Lokmat. 2019-03-12 रोजी पाहिले.
- ^ a b "प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीचे ३७ उमेदवार जाहीर" (इंग्रजी भाषेत). 2019-03-15. 2019-03-15 रोजी पाहिले.
- ^ "प्रकाश आंबेडकर के अकेले चुनाव लड़ने से बीजेपी-शिवसेना को होगा फायदा– News18 हिंदी". News18 India. 2019-03-12 रोजी पाहिले.
- ^ The Bharipa Bahujan Mahasangh founded on 4 July 1994 — The constitution of the BBM, page no. 1; Available to the Election Commission of India.
- ^ अकोला, उमेश अलोणे, एबीपी माझा. "भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा". ABP Majha. 2019-04-22 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ Sat, सुधीर महाजन on; March 30; 2019 9:22pm. "Lok Sabha Election 2019 : वंचित बहुजन आघाडी : नवी राजकीय शक्ती". Lokmat. 2019-04-22 रोजी पाहिले.
- ^ "IndiaVotes PC: Party peformance over elections - Bharipa Bahujan Mahasangh Maharashtra". IndiaVotes. 2019-05-25 रोजी पाहिले.
- ^ "IndiaVotes AC: Party peformance over elections - Bharipa Bahujan Mahasangh". IndiaVotes. 2019-04-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-05-25 रोजी पाहिले. Unknown parameter
|dead-url=
ignored (सहाय्य) - ^ "आता आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी". Maharashtra Times. 2019-03-12 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "महाराष्ट्र: प्रकाश आम्बेडकर और ओवैसी का गठबंधन, कांग्रेस का नुकसान?". The Quint Hindi (इंग्रजी भाषेत). 2019-03-12 रोजी पाहिले.
- ^ "प्रकाश आंबेडकरांचे शनिवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन". Loksatta. 2019-03-15 रोजी पाहिले.
- ^ "शिवाजी पार्कवर प्रकाश आंबेडकरांची सभा, उमेदवारांची घोषणा करणार?". News18 Lokmat. 2019-03-15 रोजी पाहिले.
- ^ "वंचित बहुजन आघाडीला चार जागा". Loksatta. 2019-03-12 रोजी पाहिले.
- ^ "लोकसभा चुनाव 2019: प्रकाश आंबेडकर बोले- महाराष्ट्र में कांग्रेस के साथ नहीं करेंगे गठबंधन– News18 हिंदी". News18 India. 2019-03-12 रोजी पाहिले.
- ^ "भारिप बहुजन महासंघ निवडणुकीनंतर वंचित आघाडीत विलीन होणार: प्रकाश आंबेडकर". Loksatta. 2019-05-03 रोजी पाहिले.
- ^ अकोला, उमेश अलोणे, एबीपी माझा. "भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा". ABP Majha. 2019-05-03 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ author/online-lokmat. "भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय". Lokmat. 2019-05-03 रोजी पाहिले.
- ^ "प्रकाश आंबेडकरांचा Big Decision..भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार". divyamarathi. 2019-05-03 रोजी पाहिले.
- ^ टिल्लू, रोहन (2019-03-10). "लोकसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्राचं राजकीय चित्र कसं आहे?" (इंग्रजी भाषेत). 2019-03-12 रोजी पाहिले.
- ^ "वंचित-एमआयएम युती तुटली". Maharashtra Times. 7 सप्टें, 2019. 2019-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-10-23 रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "वंचित आघाडीत काडीमोडावर शिक्कामोर्तब, जलील वक्तव्याला ओवैसींचा पाठिंबा". www.timesnowmarathi.com. 2021-10-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-13 रोजी पाहिले.
- ^ कोण्णूर, तुषार कुलकर्णी आणि मयुरेश (2019-03-15). "'लढाई जातीअंतासाठी आहे तर उमेदवारांच्या नावासमोर जात कशासाठी?'" (इंग्रजी भाषेत). 2019-03-15 रोजी पाहिले.
- ^ author/lokmat-news-network. "वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात काका-पुतणे दंग". Lokmat. 2019-04-20 रोजी पाहिले.
- ^ Khushbu. "महाराष्ट्र में BJP-शिवसेना के लिए कितनी गंभीर है अंबेडकर-ओवैसी की चुनौती?". India TV Hindi (hindi भाषेत). 2019-04-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-05-03 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ कदम, अमृता (2019-05-24). "या 7 मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीमुळे झाला काँग्रेसचा पराभव?" (इंग्रजी भाषेत). 2019-05-28 रोजी पाहिले.
- ^ "General Election 2019 - Election Commission of India". results.eci.gov.in. 2019-05-28 रोजी पाहिले.
- ^ "MahaElection: ८७% मुस्लिम काँग्रेसमागे; आघाडी तुटल्याचा 'एमआयएम'ला फटका?". Divya Marathi.
- ^ "बौद्ध, धनगर, मुस्लिम उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीकडून पसंती". Divya Marathi.
- ^ "अतिउत्साही नेतृत्वाला लगाम, संयमींना दाद; कायम लढण्याची जिद्द बाळगणारे शरद पवार, संयमी बाळासाहेब थाेरात, प्रकाश आंबेडकर, ओवेसी, राज ठाकरे यांच्या कामगिरीचा लेखाजाेखा..." Divya Marathi.
- ^ https://m.lokmat.com/maharashtra/exception-deprived-mim-sp-there-has-been-drop-votes-major-political-parties-year/
- ^ "VBA Dents Cong-NCP in 25 Seats Where BJP-Sena Ended Up Winning". The Quint. 25 ऑक्टो, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Election Commission of India". results.eci.gov.in.
- ^ "महाराष्ट्र निवडणूक 2019: वंचित, एमआयएमने पाडल्या आघाडीच्या एवढ्या जागा; युतीला बहुमतच मिळाले नसते". Lokmat. 25 ऑक्टो, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ बंगाळे, श्रीकांत (27 ऑक्टो, 2019). "वंचित बहुजन आघाडीनं विधानसभा निवडणुकीत काय केलं?" – www.bbc.com द्वारे.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "वंचितवर पराभवाचे खापर फोडणारे आघाडीचे नेते आंबेडकरांच्या 'या' प्रश्नांची उत्तरं देतील का ?". 31 ऑक्टो, 2019. 2019-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-01 रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "EC allots gas cylinder as election symbol to VBA". The Asian Age. 14 ऑग, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Deshpande, Alok (15 ऑक्टो, 2019). "BSP throws most hats into the ring" – www.thehindu.com द्वारे.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "LokSabha2019 : केजी टू पीजी शिक्षण मोफत वंचित बहुजन आघाडीचे आश्वासन ; जाहीरनामा प्रसिद्ध". www.esakal.com. 2019-04-08 रोजी पाहिले.
- ^ author/online-lokmat. "संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा : वंचित बहुजन आघाडी". Lokmat. 2019-04-08 रोजी पाहिले.
- ^ "जाहीरनामा वंचित बहुजन आघाडी". www.jahirnama.vanchitbahujanaaghadi.org. 2019-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-10-23 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं नुकसान झालं नाही, कारण... (तुषार कुलकर्णी, बीबीसी मराठी, 28 मे 2019)
- भारिप – एआयएमआयएमच्या मैत्रीतून राजकीय चित्र बदलणार?
- Lok Sabha Election 2019 : वंचित बहुजन आघाडी : नवी राजकीय शक्ती, By सुधीर महाजन on Sat, March 30, 2019
- 'वंचित बहुजन आघाडी'चे राजकीय यश भलेही मर्यादित असेल, पण ती उद्याच्या महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलू शकते!