Jump to content

लोणी बुद्रुक सखाराम महाराज

जन्म

 जिल्ह्यात परतूर तालुक्‍यातील तळणी या लहानशा खेड्यात सखाराम महाराजांचा जन्म झाला.

शके 1709 चैत्र शुद्ध नवमी (रामनवमी) शुक्रवार सूर्योदयी. 9 एप्रिल 1786 नक्षत्र पुष्य पराभवनाम संवत्सर. आईचं नाव अहिल्या व वडिलांचं बाळकृष्ण. बालपणापासूनच सखारामाची ईश्‍वरभक्तीकडे ओढ होती.

बालपण

हिशेबलेखन यावं म्हणून पित्याने वडील बंधू सीतारामासोबत दुकानात पाठवलं, तर बाल सखारामनं दुकानातील सर्व वस्तू गोरगरिबांना वाटून टाकल्या. वेदाध्ययन झाल्यानंतर आई-वडिलांना वाटलं की लग्न लावल्यावर सख्या प्रपंचात अडकून योग्य मार्गावर येईल. मग सख्याच्या इच्छेविरुद्ध मातापित्यांनी त्याचं लग्न तळणीच्याच अप्पा रायकरांच्या सरस्वतीशी लावून दिलं.

गृहत्याग व तपःसाधना

पण गृहत्याग करून सखाराम तपःसाधनेसाठी निघून गेला. प्रथम पद्मतीर्थ (वाशीम) पिंगलाक्षीदेवी (रिसोड), कमलजादेवी (लोणार) येथे तपःसाधना केल्यावर सखाराम श्रीक्षेत्र काशी आला. तिथं भागीरथीच्या पवित्र जलात "जलस्तंभ‘ योगाद्वारा 14 वर्षे कठोर योगसाधना केली. आता सखाराम मोठा योगी झाला होता.

तीर्थयात्रा करून पुन्हा लोणी

अनेक तीर्थक्षेत्रांचं दर्शन करून व समकालीन साधुसंतांच्या भेटी घेऊन महाराज एप्रिल-मे 1857च्या सुमारास लोणीला आले. तेजस्वी मुखकमल, आकर्षक प्रभा, बलदंड बाहू व हातात रुद्राक्षमाळ. गणपतीची सुंदरशी मूर्ती ते जवळ बाळगीत. मूर्तिपूजा भल्या पहाटेच होई. धुनी तर पेटलेलीच राही. अंगाला भस्मविलेपन. तीन दगड मांडून चूल करीत. त्यावर तांब्याच्या गोल भांड्यात डाळ, तांदूळ व इतर धान्य एकत्र करून ठेवीत. लाकडे सरकवीत. अग्नी त्यांच्या सेवेला नित्य सिद्ध असे. अन्न अर्धवट शिजल्यावर त्यातील काही भाग पशुपक्षी, गाय, श्‍वान यांना टाकीत व उरलासुरला अल्प आहार आपण घेत. नाममात्र उदरपूर्ती. पण आलेल्या भक्तांना मात्र रोज मिष्टान्नाचा प्रसाद मिळे. महाराज मितभाषी होते. त्यांनी कोणालाही गुरुमंत्र दिला नाही. ते कोणालाही स्वतःच्या पाया पडू देत नसत. सर्वच ईश्‍वराची लेकरं. समान. त्यांच्याजवळ उच्चनीच, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव नव्हता.

समाधी

महाराज 92 वर्षांचे असतांना त्यांनी समाधी घेण्याचं ठरवलं. दिवस निश्‍चित केला. कार्तिक वद्य 14 शके 1800, वार शनिवार. बहुधान्यनाम संवत्सर. ता. 23 नोव्हेंबर 1878. पण शास्त्राप्रमाणे प्रथम संन्यास घ्यायचं ठरविलं. कारण लौकिकार्थाने विवाहित होते. शास्त्राज्ञा प्रमाण मानून संन्यासदीक्षा घेतली. महाराजांचं नाव "योगानंद‘ ठेवण्यात आलं. लोणी गावाच्या दक्षिणेकडील देवीसम्मुख गेले. महाराजांनी आपली मंगल अमृतमय दृष्टी एकवार सर्व भक्तलोकांवर टाकली व हातांनी संकेत केला. मग त्यांनी पद्मासन घातलं. आत्मा ब्रह्मांडी नेला. भक्तांनी महाराजांना सजवलेल्या पालखीत बसवून टाळ-मृदंगाच्या गजरात सिद्ध केलेल्या स्थळी नेऊन समाधी दिली. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी समाधीचं स्थळ दाखवलं होतं. ते लोभेश्‍वरासमोरील एका वटवृक्षाखाली होतं. वटवृक्ष तोडून तिथंच समाधिस्थळ तयार करण्यात आलं. त्यावर लिंगप्रतिष्ठा झाली. तेथेच भव्य समाधिमंदिर उभारण्यात आलं. उगवत्या सूर्यनारायणाचा पहिला मंगलकिरण शिवलिंगावरच्या महाराजांच्या मंगल मुखवट्यावर पडतो. मंदिर जवळजवळ 90 फूट उंच असून, त्यावर 7 फूट उंच सुवर्णकळस बसविण्यात आला आहे. मंदिराचे बांधकाम दगडी असून, त्यावर दशावताराच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. समोर भव्य सभामंडप असून, सभोवताली घडवलेल्या चिरेबंदी दगडाचा परकोट बांधण्यात आला. मंदिराला तीन भव्य महाद्वारे असून उत्तर व दक्षिण महाद्वारावरील भव्य दगडी नगारखाने शिवकालीन वास्तूची आठवण करू देतात. समाधिमंदिर, महाद्वार व नगारखान्याचे कोरीव काम अतिशय प्रेक्षणीय आहे. मंदिरात नंदादीप तेवत असून, त्रिकाल चौघडा वाजतो. मुक्त अन्नदान हे लोणी संस्थानचं व्रत आहे. 

संस्थांचे कार्य

दर्शनार्थ आलेल्या सर्व भक्तांची निवास व जेवण्याची विनामूल्य व्यवस्था संस्थानतर्फे केली आहे. निवासासाठी सर्व सोयींनी सुसज्ज अशा दोन भक्तनिवासांचं काम पूर्ण झालेलं आहे. गोरगरिबांच्या लग्नजावळादी कार्यक्रमाला संस्थानतर्फे विनामूल्य भांडी-बिछायत- खोल्या इत्यादी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. भक्त व आर्तांना आलेले अनुभव हे सर्व संतांच्या चरित्राचं अभिन्न अंग आहे. महाराजांनी कुणालाही शिष्यत्व दिलं नाही, पण त्यांचे भक्त त्यांना सद्‌गुरुस्थानीच मानतात. उपासनेच्या दृष्टीनं महाराज कुठल्याही संप्रदायविशेषाचे नसले तरी सर्व संप्रदायाचे उपासक भक्त त्यांच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं येतात. विभिन्न संप्रदायांचा पावन संगमच लोणी क्षेत्री पाहावयास मिळतो. सखाराम महाराजांची साधी राहणी, सर्वधर्मसमभाव व सर्व भक्तांना समानतेच्या भावनेतून पाहण्याची दृष्टी. त्यांनी कधी पैशाला हातही लावला नाही. भक्तांनी अर्पण केलेलं धनधान्य गोरगरिबांमध्ये वाटून टाकत. महाराजांची तीच परंपरा लोणी संस्थानने आजतागायत चालू ठेवली आहे.

"लोणीयात्रा‘

ज्या लोणी क्षेत्रात संत सखाराम समाधिस्थ झाले तेथे गेल्या 134 वर्षांपासून भव्य महोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्त लोणी येथे भव्य यात्रा भरते. ती विदर्भातील सर्वांत मोठी यात्रा असून, "लोणीयात्रा‘ म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. कार्तिक वद्य आमावास्येला पुण्यतिथीनिमित्त महापंगत असते. समाधी मंदिरासमोरील पूर्व व दक्षिण दिशेकडील भव्य पटांगणात विभिन्न जाती-धर्मांचे हजारो लोक "बहू भुकेला झाले। तुमच्या उष्ट्यासाठी आलो‘ या निस्सीम श्रद्धाभावाने महाप्रसादाची वाट पाहत बसलेले असतात. स्वयंसेवक व भक्त शिरा, पुरी व भाजीचा प्रसाद वाढतात. महापंगतीचा स्वयंपाक महाराज जिथं तांब्याच्या भांड्यात स्वतःसाठी धुनीवर अन्न शिजवीत असत तिथंच करण्यात येतो. ही जागा समाधी मंदिराच्या ईशान्य दिशेला विहिरीजवळ आहे.

रथोत्सव

रथोत्सव मार्गशीर्षात असतो. रथयात्रेचा सोहळा शके 1847 (इ.स. 1925) पासून सुरू झाला. हा प्रचंड तीन मजली लाकडी रथ परभणी येथील कारागिरानं तयार केला व त्याचे सुटे भाग पंचवीस बैलगाड्यांतून लोणीस नेले. समाधी दिन व लोणीयात्रेव्यतिरिक्त "श्रीं‘चा जन्मोत्सव व प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव रामनवमीला मोठ्या प्रमाणावर केला जातो.

लोणी संस्थानचा धार्मिक कार्याबरोबरच अनेक सामाजिक कार्यांत सहभाग असतो. स्वातंत्र्य चळवळ व विशेषतः हैदराबाद मुक्ती संग्रामाला संस्थानने सहकार्य केले. हैदराबाद संस्थानातील निजामाची राजवट उलथून टाकण्यासाठी हैदराबाद काँग्रेसच्या झेंड्याखाली मोठं आंदोलन झालं. सत्याग्रह, असहकार व कायदेभंगाच्या चळवळीबरोबरच सशस्त्र आंदोलनं झाली. सशस्त्र आंदोलकांचे भूमिगत कँप मोगलाईबाहेर स्वतंत्र भारतात स्थापन झाले. त्यात जिंतूर तालुक्‍याचा कँप लोणी येथे स्थापन झाला. त्याला तत्कालीन पीठाधीश कै. प्रल्हाद महाराजांनी मोठा आधार दिला. आर्थिक मदतीबरोबरच आंदोलकांच्या राहण्या-जेवण्याची व्यवस्था केली. सुरुवातीला कँपची संख्या 45 ते 50 होती. पुढे जवळपास 1200 ते 1500 आंदोलक व निर्वासित लोणीला आले. सर्वांना लोणी संस्थानने आश्रय दिला. याच आंदोलकांनी बामणी, तळणी, दुधा, मंठा इत्यादी पोलीस स्टेशन व केंद्रावर हल्ले करून रजाकारांना मानोहरम केले. 

1930 मध्ये लोणी संस्थानने "श्री सखाराम महाराज संस्कृत पाठशाळे‘ची स्थापना केली. या शाळेत संस्कृत, न्याय, व्याकरण इत्यादी विषय शिकवीत. संस्कृतबरोबरच इंग्लिश व मराठी शिकण्याची सोय होती. अध्ययनासोबतच कुस्ती, मल्लखांब, डबलबार, सिंगलबार, बोथाटी, गदगा, लाठी, पुरीद वगैरे सर्व प्रकारचं व्यायामाचं शिक्षण दिलं जाई. कालानुरूप इ. स. 1966 मध्ये विद्यालय व पुढे कनिष्ठ महाविद्यालय स्थापन केलं. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्थापना केली. ग्रामीण भागातील जनतेसाठी दर वर्षी विविध वैद्यकीय शिबिरांचं आयोजन केलं जातं. हृदयरोग निदान, नेत्रतपासणी, स्त्रीरोग, रक्तदान इत्यादी शिबिरांत पुणे, नागपुरातील तज्ज्ञ डॉक्‍टरांनी आपली सेवा दिली आहे. रोग्यांना पुढील उपचारासाठीही यथाशक्ति मदत केली जाते. श्री सखाराम महाराज गोरक्षण प्रतिष्ठानतर्फे 125 गाईंचं संगोपन केलं जातं. रासायनिक खतं व कीटकनाशकांपासून होणारी शेती व पर्यावरणाची हानी थांबावी म्हणून शेतकऱ्यांसाठी उद्‌बोधन वर्ग आयोजित केले जातात. प्रतिष्ठानच्या आवारातच गांडूळ व शेणखताचं उत्पादन करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिलं जातं. पर्यावरणाच्या दृष्टीनं वृक्षारोपण करून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे उपक्रमही राबविले जातात.