Jump to content

लोकगीतातील स्त्री मन

भारतात प्राचिन काळापासून लोकगीतांची परंपरा अतिशय समृद्ध आणि विविधतापूर्ण असलेली दिसून येते. लोकगीत ही संज्ञा व्यापक असून यामधून येथील लोकजीवनाचा, लोकमनाचा,स्थल-काल-प्रदेशाचा आणि लोकसंस्कृतीचाही अभ्यास करता येतो. लोकसाहित्याचा शास्त्रीय अभ्यास करणारे डॉ.प्रभाकर मांडे यांनी लोकगीतांची शास्त्रीय चिकित्सा करून लोकगीतांच्या स्वरूप विशेष यावर प्रकाश टाकताना असे म्हणतात की, “ लोकगीतांची मौखिक परंपरा, लोक समूहाची निर्मिती, लोकगीतांची परिवर्तनशीलता, त्यांचे नित्यनूतनपण, लोकजीवनाचा आविष्कार, परंपरा सातत्य टिकविण्याची लोकगीतांची क्षमता आणि लोकगीतांचे रचना-विशेष, इत्यादी पैलू लक्षात घेऊन लोकगीतांचे स्वरूप स्पष्ट केले आहे.” १( मांडे प्रभाकर, लोकसाहित्याचे अंतःप्रवाह,पृष्ठ ३९.) तसेच डॉ.विश्वनाथ शिंदे यांच्या मते "आपल्या गतकालीन संस्कृतीचे वैभव म्हणून केवळ लोकगीताचे जतन, अध्ययन करायचे असे नाही तर आजही साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांच्या दृष्टीने लोकगीतांचा अभ्यास महत्त्वाचा आहे,या लोकगीतातून मनावर संस्कार करण्याचा प्रयत्न केलेला असतो. सुसंस्कृत मनाची घडण करण्याचा प्रयत्न लोकगीते करीत असतात."२(डॉ.शिंदे विश्वनाथ, लोकसाहित्य मिमांसा भाग-१,पृष्ठ.५९-६०) यावरून आपणास असे लक्षात येते की, लोकसाहित्य अभ्यासात लोकगीतांना महत्त्वाचे स्थान आहे., लोकगीतांचे संकलन, संपादन, प्रकाशन हे पूर्वीपासून  ते आजपर्यंत अखंडितपणे चालू आहे. परंतु आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात हे संकलन केवळ हे संकलन केवळ संकलित स्वरूपात विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित न राहता ते शास्त्रीय दृष्टीने , वैश्विक  पातळीवर मांडले जावे, त्यास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी. तेव्हा आजच्या विज्ञाननिष्ठ तरुण पिढी मध्ये लोकगीतांचे महत्त्व वाढेल. यासाठी लोकसाहित्य अभ्यासकांनी लोकगीतांचे केवळ संकलन न करता मधील नानाविध दृष्टीकोण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात लक्षात आणून दिले तर हे साहित्य 'अक्षर वाड्मय' ठरेल.लोकगीतांचे प्रामुख्याने स्त्रीगीते, पुरूषांची गीते आणि स्त्री -पुरूषांची एकत्रित गीते असे वर्गीकरण केले जाते. तरीही सामान्यतः स्त्रीगीतांचे प्रमाण जास्त असल्याने लोकगीते म्हणजेच स्त्रीगीते अशी संकल्पना रूढ झालेली दिसून येते. लोकगीते ही स्त्री मनाचा उत्स्फूर्त आविष्कार,व्यक्ती मनाची  निर्मिती असली तरी ती समूह निर्मिती कधी होते ते लक्षात येत नाही. यामुळेच ते एका स्त्री मनासोबतच समग्र मानवी मनाचे भावपूर्ण दर्शन घडवते . हेच या लोकगीताचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागते. मानवी मन हे एक अजब गुढ आहे,मन हे सुख-दुःख जाणणारे इंद्रिय आहे. ज्याचा अचूक अंदाज मानसशास्त्रीय प्रयोग शाळेतील  मानसशास्त्रज्ञांना  करता आलेला नाही, त्या मानवी मनाला  नेमके आणि अचूकपणे टिपण्याचे काम भारतीय स्त्रियांनी लोकगीतातून केलेले दिसते. यामधून आपल्या जीवनातील नातेसंबंध, सुख-दुःख, आनंद,प्रेम,विरह, गरिबी, श्रीमंती  याबरोबरच स्त्रीजीवनातील विविध पैलूचे दर्शन घडते. म्हणून अशा लोकमनाचा अभ्यास आजच्या यंत्र, तंत्र,विज्ञानाच्या युगातही उपयुक्त व महत्त्वपूर्ण वाटतो.

लोकगीतातील स्त्री जीवनाचा आढावा घेत असताना आपणास ती सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने उपेक्षित राहिलेली दिसून येते. एक उपभोग्य वस्तू म्हणूनच तिच्याकडे पाहिले जात असे. तिच्या मनाची फारशी दखल तत्कालीन समाजव्यवस्थेने घेतलेली दिसून येत नाही.  तिचे मन हे अतिशय हळवे, प्रेमळ व संवेदनशील असलेले दिसून येते. तिने एक आई, पत्नी, बहीण, मुलगी,

सासू-सून ,

नणंद-भावजय ,

सखी(प्रियसी) म्हणून जे जीवन जगले अनुभवले त्याचा अविष्कार लोकगीतांच्या द्वारे करून तीने आपले मन हलके केले. यामुळे ती 'सोशिक' असूनही रसिक व समाज जीवनाला पोषक अशी वातावरण निर्मिती करताना दिसते. यासाठी तिचा एक आदर्श नारी म्हणून उल्लेख करणे महत्त्वपूर्ण वाटते.कारण तिचा आपले मन आणि मनगट यावर प्रबळ विश्वास असलेला दिसून येतो. एवढेच नव्हे तर वेळ प्रसंगी कठोर निर्णय भूमिका घेण्याचे सामर्थ्य असलेली नारीशक्ती ही तिच्यामधून जागृत झालेली दिसते.

परंतु आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना शैक्षणिक,आर्थिक, राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या सबलीकरण झाले असले असे म्हणत असलो तरी त्यांच्या मनाची मनोदुर्बलता जास्त प्रमाणात दिसून येत आहे , त्यासाठी आजच्या महिलांनीही अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा,स्त्री-पुरूष समानता, पर्यावरण रक्षण, याच बरोबर समाजातील दुजाभाव  करणाऱ्या घटना-प्रसंगाना सामर्थ्याने तोंड दिले पाहिजे. तसेच एक आई, बहीण, पत्नी, सासू-सून, नणंद-भावजय, मुलगी, प्रियसी अशा विविध भूमिकेत उभी राहत असताना आपल्या नवविचारांची आणि मनाची उंची ही वाढवली पाहिजे. जुन्याचा बोध व नव्याचा शोध घेतला पाहिजे. यासाठी तीने 'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगा उद्धारी' असे पारंपरिक जीवन न जगता 'जिच्या हाती इंटरनेट तीच भिडेल आकाशाला थेट ' अशा प्रकारच्या नव विचारांची पेरणी या लोकगीतांच्या प्रेमळ संदेशातून व्हावी. म्हणजेच तिने प्रेमाचा जिव्हाळा जपणारी पानमळा झाली पाहिजे .

तेव्हाच खऱ्या अर्थाने भारतीय 'नारी' जगात  इतरांच्या तुलनेत 'भारी' दिसेल. हाच स्त्री मनाचा मोठेपणा आपणास महिला दिनाच्या निमित्ताने सांगता येईल.


संदर्भ :

१. मांडे प्रभाकर, लोकसाहित्याचे अंतःप्रवाह,पृष्ठ ३९.

२. डॉ.शिंदे विश्वनाथ, लोकसाहित्य मिमांसा भाग-१,पृष्ठ.५९-६०


~~~~