लुई ब्रेल
लुई ब्रेल | |
जन्म | जानेवारी ४ १८०९ कुपव्रे |
मृत्यू | जानेवारी ६ १८५२ |
नागरिकत्व | फ्रान्स |
वडील | सायमन-रेने ब्रेल |
आई | मोनीक बॅरन |
लुई ब्रेल (जानेवारी ४ १८०९ - जानेवारी ६ १८५२) हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहय्याने वाचनाची पद्धत / लिपी विकसीत केली. लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपव्रे नामक एका खेड्यात, गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सायमन-रेने ब्रेल हे एक जिनगर (घोड्याचे खोगीर, इ. कातडी माल तयार करणारे कारागीर) होते. तर आई मोनीक बॅरन ही एका शेतकऱ्याची मुलगी होती. दोन बहिणी आणि एका भावाच्या पाठीवर जन्मलेला लुई सगळ्यांचा लाडका होता. लुईच्या वडिलांची स्वतःची कार्यशाळा होती आणि ते दिवसभर आपल्या कार्यशाळेत कार्यमग्न असत.
बालपण
चालायला लागल्यापासूनच लुई आपल्या वडिलांसह त्यांच्या कार्यशाळेत जात असे आणि वडिलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असे. वडिलांचे छोट्या लुईकडे सतत लक्ष राहत असे आणि ते त्याला आपल्या हत्यारांपासून दूर ठेवत. लुई तीन वर्षांचा असतांना एक दिवस त्याचे वडील कोणाशीतरी बोलत आपल्या कार्यशाळेबाहेर गेले, तेवढ्यात लुईने वडिलांचे अनुकरण करण्याच्या नादत त्यांची एक आरी उचलली आणि अनावधानाने ती त्याच्या एका डोळ्यात घुसली. लुई जागेवरच बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या डोळ्यावर आधी काही स्थानिक उपचार करण्यात आले आणि नंतर जवळच्या खेड्यातील एका नेत्रतज्ज्ञाने त्याच्यावर उपचार केले. काही वेळाने लुईला आराम पडला पण त्याच्या डोळ्याला संसर्ग झाला होता. एका डोळ्याला झालेला संसर्ग वाढत दुसऱ्या डोळ्यापर्यंत गेला आणि एका वर्षात लुईचे दोन्ही डोळे पूर्णपणे खराब झाले, लुई दोन्ही डोळ्यांनी आंधळा झाला.
शिक्षण
लहानपणापासून लुई स्वावलंबी होता. त्याला पालकांकडून नेहमी प्रोत्साहन मिळत असे. स्पर्श आणि वासाच्या सहाय्याने छोटा लुई अनेक वस्तु सहज ओळखत असे आणि स्वतःची कामे स्वतःच करीत असे. १८१६ च्या सुमारास लुईच्या गावात ऍबे जाक पॅलुय नामक एक पाद्री आले. त्यांच्या मदतीने लुईचे शिक्षण सुरू झाले. सुरुवातीला त्यांनी लुईला वासाच्या आणि स्पर्शाच्या सहाय्याने वस्तु परिचय करून दिला, तसेच संगीत आणि बायबलचे शिक्षणही सुरू झाले. पुढे सुमारे एक वर्षाने लुईला त्याच्या गावातीलच सामान्य मुलांच्या शाळेत पाठविण्यात आले. अभ्यासात लुई हुशार होता, केवळ श्रवणाच्या जोरावर त्याने केलेली प्रगती पाहून अनेकांना आश्चर्य वाटे. या शाळेत लुई दोन वर्षे शिकला आणि त्यामुळे लुईला अनेक विषयात आवड निर्माण झाली.
पुढे पाद्री पॅलुय यांनी अनेक प्रयत्न करून पॅरीस येथील अंध मुलांच्या शाळेत (इन्स्टिट्युशन रोयाल्स देस जून्स ऍव्युग्लेस) लुईला प्रवेश मिळवून दिला. अंध मुलांसाठीच्या या जगातील पहिल्या शाळेत प्रवेश घेणारा लुई सगळ्यात लहान वयाचा विद्यार्थी होता. इतिहास, भूगोल, गणित, फ्रेंच, ग्रीक, संगीत असे अनेक विषय लुई या शाळेत सहजपणे शिकला, त्याने अनेक बक्षिसेही मिळविली. सहा वर्षात लुईने शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तो त्याच शाळेत स्वयंसेवक, शिक्षक म्हणून काम करू लागला.
लुई अत्यंत शांत स्वभावाचे होते त्यांनी सर्वच विषय विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू ठेवले आयुष्यभर शिक्षण देण्याचे कार्य करत अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी प्रती त्यांचे हात मी त्याचे नाते जडले मरणोत्तर काळात देखील त्यांनी आपल्या सर्व वस्तू विद्यार्थ्यांना भेट देऊन जगाचा निरोप घेतला.