Jump to content

लाल महाल

लाल महाल

लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानात आहे. मातोश्री जिजाबाई साहेब यांच्यासह शिवराय यांचे बालपण या वास्तूत व्यतीत झाले असल्याने या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे.[]

भौगोलिक स्थान

ही वास्तू पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवार वाडा आणि कसबा गणपतीचे मंदिर आहे.

ऐतिहासिक घटना

जिजाबाई आणि शिवाजी महाराज प्रतिकृती
  • या ठिकाणी राहण्यासाठी आल्यानंतर मोगलांच्या त्रासाने वस्ती सोडून गेलेल्या स्थानिक नागरिकांना परत बोलवण्यात आले. जिजाबाई यांनी या नागरिकांना आश्वासन दिले आणि अनेक वर्षे शत्रूच्या भीतीने ओसाड पडलेल्या जमिनीवर सोन्याच्या फाळाने नांगर फिरवून येथे शेती करायला पुन्हा सुरुवात झाली.
  • शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता. त्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. " सिवाजी तो चूहा है, खाविंद मै ऐसे पकडके लाऊंगा सिवाजी को..!" असे शाहिस्तेखान औरंगजेबास म्हणाला होता. शाहिस्तेखान दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लालमहाल. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळाच्या वेढ्यातून सुखरूप सुटून राजगडावर पोहचले आणि त्यांना बातमी कळाली की शाहिस्तेखान पुण्यात उच्छाद मांडत आहे. दरम्यान शाहिस्तेखानाने पुण्यात स्वैराचार माजवण्यास सुरुवात केली होती. त्याने अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते. तीन वर्षे शाहिस्तेखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना चेतावणी देत होता. त्याने ओळखले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण हे त्यांच्या प्रजेत असून ते त्यांच्या प्रजेला त्रास दिल्याशिवाय सापडायचे नाहीत. दरम्यान शिवरायानी शाहिस्तेखानास धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली आणि ते अवघ्या निवडक ४०० विश्वासू मावळ्यांना घेऊन लालमहालात अतिशय शिताफीने शिरले आणि शाहिस्तेखानची धांदल उडाली. या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली. तसेच या लढाईत शाहिस्तेखानाचा मुलगा मारला गेला. याचा शाहिस्तेखानाला जबर हादरा बसला आणि तो अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे व लालमहाल मुक्त केला. आज या घटनेला ३५० वर्षे होत आहेत. इतिहासातील अतिशय दुर्मिळ असा हा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी या लालमहालात केला याची साक्ष होऊन ही वास्तू अभिमानाने उभी आहे. या लढाईचे वर्णन जागतिक इतिहासात अग्रक्रमाने येते कारण एक लाख सैन्य असताना अवघ्या ४०० मावळ्यांना घेऊन विजय संपादन करणे हे अजून तरी कोणाला शक्य झालेले नाही. या प्रकाराने औरंगजेबाला आश्चर्यमिश्रित धक्का बसला. राजमाता जिजाऊसाहेब यांनी बांधलेला लालमहाल. सध्या अस्तित्वात नाही.

सध्याचा लाल महाल

सध्याची लाल महाल ही वास्तू पुणे महानगर पालिकेनी १९८८ साली फक्त स्त्रिया आणि लहान मुलांसाठी असलेल्या 'जिजामाता' उद्यानात उभारली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लाल महाल सध्या अस्तित्वात नाही.[]




संदर्भ

  1. ^ "पुणे परिसर दर्शन : शिवरायांचे बालपण अनुभवलेला लाल महाल". eSakal - Marathi Newspaper. 2023-10-18 रोजी पाहिले.
  2. ^ Pawar), चंदन पवार (Chandan (2022-01-18). शिवछत्रपती (Shivchatrapati). StoryMirror Infotech Pvt Ltd. ISBN 978-93-91116-99-6.