Jump to content

लाल पूर्णिया गाय

लाल पूर्णिया गाय किंवा पूर्णिया गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हे मुख्यतः बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यात आणि बिहारच्या लगतच्या अरारिया आणि कटिहार मधेपुरा, पूर्णिया, किशनगंज आणि सुपौल जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. या गोवंशात उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असते.[]

प्राण्यांचा रंग प्रामुख्याने राखाडी आणि त्यानंतर लाल आणि काळा असतो. या गोवंशाची संख्या सुमारे अडीच लाख असल्याचे मानले जाते.[]

हा गोवंश लहान ते मध्यम आकाराचा असून याची दुग्धोत्पादन क्षमता देखील कमी आहे. परंतु याचे बैल शेतीच्या कामकाजात आणि भार खेचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त आहेत. बैल सरासरी दिवसाचे ७ ते ८ तास काम करतात आणि एक बैलजोडी अंदाजे सहा तासांत एक एकर जमीन नांगरते. गुरांची ही जात प्रामुख्याने दूध, मशागत आणि खतासाठी वापरली जाते आणि त्यात दुष्काळ आणि उष्णता सहन करण्याची क्षमता देखील चांगली आहे. जवळपास ७०% गुरांना स्थानिक पातळीवर लागवड केलेल्या भात, गहू आणि मका यांच्या पेंढ्या खायला दिल्या जातात. क्वचितच हिरवा चारा किंवा कोणत्याही प्रकारचे पशुखाद्य दिले जाते. बहुतेक जनावरे ही कळपाने चराईसाठी फिरवली जातात.[]

वैशिष्ट्ये

  • हा गोवंश बांधेसूद संतुलित, लहान ते मध्यम आकाराचा असतो.
  • या गोवंशाच्या कातडीचा रंग लाल आणि हलका ते गडद राखाडी असा दोन प्रकारात आढळून येतो. लाल गोवंशाचे संपूर्ण शरीर लाल रंगाचे असते. तर राखाडी गोवंशाचे डोके, मान आणि खांद्याच्या भागात गडद राखाडी ते काळा रंग असतो आणि उर्वरित भागात हलका राखाडी रंग असतो.
  • या गोवंशाची शिंगे आकाराने लहान ते मध्यम असून दोन्ही बाजूने बाहेर असतात.
  • या गोवंशाच्या शरीराची लांबी कमी असून पाय शरीराशी घट्ट असतात.
  • या गोवंशाचे कपाळ किंचित फुगीर असून जबडा, पापण्या आणि खुर काळे असतात. नाकाजवळचा भाग थोडा सपाट असून डोके मध्यम ते लांब आहे.
  • गायींचे गळकंबळ किंवा गळपोल लहान तर बैलाचे मध्यम आकाराचे असते.
  • गायीच्या पाठीवरील वशिंडाचा आकार लहान तर बैलांचे वशिंड मध्यम ते मोठ्या आकाराचे असते.
  • शेपूट लांब असून शेपूट गोंडा काळा आहे.
  • कासेचा आकार लहान आणि गोल असतो. स्तनाग्रे लहान आणि नळीच्या आकाराचे असतात.
  • गायी प्रतिदिन सरासरी २.९ लिटर पर्यंत दूध देतात. या गोवंशात दूध देण्याचे प्रमाण कमी-जास्त आढळून येते. काळजी घेतली असता दूध वाढते.
  • या गोवंशाच्या बैलाची सरासरी उंची १३० सेमी. तर गायीची उंची १०८ सें.मी. पर्यंत आढळून येते.
  • या गोवंशाच्या बैलाच्या शरीराची लांबी सरासरी ११८ सेमी तर गायीची लांबी १०२ सें.मी. पर्यंत असते.
  • बैलाचे वजन सरासरी २४७ किलो तर गायीचे १८० किग्रॅ. पर्यंत असते.
  • बैलाच्या छातीचा सरासरी घेर १५४ सेमी, तर गायीचा १४० सें.मी. आढळून येतो.
  • पहिली वीत सुमारे ४२ महिने आणि दोन वासरातील अंतर सुमारे १५ महिने असते.
  • दैनंदिन दुधाचे उत्पादन सुमारे २ लीटर असून दूध देण्याचा कालावधी सुमारे ८ महिने असतो.[][]

गाईचे दैनंदिन दूध उत्पादन १ ते ५ किलो आणि सरासरी दुग्धजन्य उत्पादन ६०९ किलो आहे (४५२ ते ७८५ किलो पर्यंत) सरासरी दुधाचे फॅट ४.२२% आहे (४ ते ४.५% पर्यंत). या जनावरांची संख्या अंदाजे २,१९,००० आहे.[][]

'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[][]

भारतीय गायीच्या इतर जाती

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ a b "Breeds of cattle & buffalo" (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "Red Purnia cattle - an unexplored indigenous germplasm" (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b "Red Purnea" (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ https://www.dairyknowledge.in/article/purnea
  5. ^ https://nbagr.icar.gov.in/en/purnea-cattle/
  6. ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे