लक्झेंबर्ग शहर (लक्झेंबर्गिश: Stad Lëtzebuerg, फ्रेंच: Ville de Luxembourg, जर्मन: Luxemburg Stadt) ही पश्चिम युरोपातीललक्झेंबर्ग देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्रँक लोकांनी मध्य युगात वसवलेले हे शहर लक्झेंबर्गच्या दक्षिण भागात आल्झेट व पेट्र्युस नद्यांच्या संगमावर स्थित आहे. हे शहर पश्चिम युरोपामध्ये मध्यवर्ती स्थानावर असून ते ब्रसेल्सपासून २१३ किमी (१३२ मैल), पॅरिसपासून ३७२ किमी (२३१ मैल), क्योल्नपासून २०९ किमी (१३० मैल) तर फ्रान्सच्यामेसपासून ६५ किमी (४० मैल) अंतरावर स्थित आहे.[१]
२०१० साली लक्झेंबर्ग शहराची लोकसंख्या सुमारे १ लाख होती. एक सुबत्त व प्रगत शहर असलेल्या लक्झेंबर्ग शहराचा २००९ साली जगात वार्षिक दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तिसरा क्रमांक होता.[२] बँकिंग व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग आहेत. येथील ऐतिहासिक तटबंदीमुळे ह्या शहराला युनेस्कोच्याजागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले आहे.