Jump to content

लंबाडी नृत्य

लंबाडी नृत्य ऊर्फ बंजारी ह्या भटक्या आदिवासी जमातीचे लोकनृत्य आहे. ते लमाणी नृत्य म्हणूनही ओळखले जाते.


प्रामुख्याने ही भटकी जमात असल्याने विविध प्रांतांचे संस्कार ह्या नृत्यावर झाल्याने त्याचे स्वरूप प्रदेशपरत्वे वेगवेगळे आढळते. त्यामुळे आंध्र, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र इ. प्रदेशांत त्याची भिन्नभिन्न रुपे दिसून येतात. विवाहादी मंगलप्रसंगी किंवा दसरा, होळी इ. सणांच्या प्रसंगी ही नृत्ये करण्याचा प्रघात आहे. ही नृत्ये स्त्री-पुरुषांची संमिश्र असली, तरी स्त्रियांची संख्या साधारणपणे अधिक असते. हे नृत्य गोलाकार उभे राहून केले जाते. मध्यभागी अग्नी प्रज्वलित केलेला असतो. कित्येकदा ह्या वर्तुळात रती व मदन यांच्या मृत्तिकेच्या प्रतिमांची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते.

लंबाडी नृत्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ह्यात स्त्रियांची वेषभूषा अत्यंत वैचित्र्यपूर्ण असते. घागरा, चोळी, ओढणी असा वेष त्या परिधान करतात. या वस्त्रांचे रंग तांबडे, पिवळे असे भडक असतात. त्यांवर काचांची, आरशांच्या भिंगांची नाजुक कलाकुसर केलेली असते. नर्तकींच्या गळ्यांत चित्रविचित्र मण्यांच्या माळा असतात. नृत्यातील हालचालींत विविधता कमी असली, तरी त्या नाजुक व आकर्षक असतात. संथ लयीत नृत्य केले जात असल्याने त्यात जोषापेक्षा मार्दव अधिक आढळते. पितळी घडा घेऊन व त्यावर विशिष्ट आघात करून त्या तालावर आकर्षक नृत्य केले जाते. नृत्यात आकृतिबंधांचे वैविध्य फारसे नसते. गोलाकार नृत्यरचनाच बहुधा कायम रहाते. त्यामुळे वैचित्र्यपूर्ण वेषभूषा व सोप्या पण मोहक हालचाली हेच ह्या नृत्याचे लक्षणीय वैशिष्ट्य मानता येईल. ढोलकाच्या तालावर नर्तकी टाळ्या वाजवून साथ देत, कधी कर्कश सुरात चित्कारत, डावी-उजवीकडे झुलत गोलाकार फेर धरून नृत्ये करतात. नृत्यांसमवेत गायिल्या जाणाऱ्या लमाणी गाण्यांमध्ये जीवनातील सुखदुःखे परिणामकारक रीत्या चित्रित केलेली असतात. हलगी, ढोलक, ताशा व झांज ही या नृत्याची साथीची प्रमुख वाद्ये होत.

संदर्भ

[]

  1. ^ "https://vishwakosh.marathi.gov.in/31690/". External link in |title= (सहाय्य)