रोहिणी खाडिलकर
रोहिणी नीलकंठ खाडिलकर (जन्म : मुंबई, १ एप्रिल १९६३; - ) या महिला आंतरराष्ट्रीय मास्टर (वूमन इंटरनॅशनल मास्टर - WIM) किताब असलेल्या भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहेत. त्यांनी बुद्धिबळातील भारतीय महिला अजिंक्यपद पाच वेळा, तर आशियाई महिला अजिंक्यपद दोन वेळा जिंकले आहे. [१]त्यांना १९८० मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू ठरल्या.
पार्श्वभूमी
बुद्धिबळपटू म्हणून प्राविण्य मिळवलेल्या 'खाडिलकर भगिनी' त्रिकुटापैकी रोहिणी खाडिलकर एक आहेत. त्यांच्या मोठ्या बहिणी वासंती आणि जयश्री यांनीसुद्धा राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद मिळवले होते.
त्यांचे वडील नीलकंठ खाडिलकर हे 'नवा काळ' या वृत्तपत्राचे संपादक होते.
कारकीर्द
महिलांच्या स्पर्धा
१९७६ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी खाडिलकर राष्ट्रीय महिला बुद्धिबळ विजेत्या बनल्या. ही स्पर्धा सलग तीन वेळा जिंकणाऱ्या त्या पहिल्या खेळाडू होत. त्यांना हे अजिंक्यपद एकूण पाच वेळा मिळाले.
- नोव्हेंबर १९७६, कोट्टायम, केरळ
- डिसेंबर १९७७, हैद्राबाद
- मार्च १९७९, चेन्नई
- फेब्रुवारी १९८१, नवी दिल्ली
- डिसेंबर १९८३, नवी दिल्ली
रोहिणी खाडिलकर १९८१मध्ये हैद्राबाद येथे झालेल्या आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अजिंक्य राहिल्या आणि त्यांनी १२ पैकी ११.५ गुण मिळवले. त्याच वर्षी त्यांना महिला आंतरराष्ट्रीय मास्टर हा किताब मिळाला. नोव्हेंबर १९८३ मध्ये कोलालम्पूर, मलेशिया येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी पुन्हा आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
पुरुषांच्या स्पर्धा
१९७६ मध्ये भारतीय बुद्धिबळ पुरुष अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. पुरुषांच्या स्पर्धेतील त्यांच्या सहभागामुळे खळबळ माजली.[२] उच्च न्यायालयात या सहभागाला आव्हान देण्यात आले. जागतिक बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष, मॅक्स उवे यांना महिलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रतिबंध करता येणार नाही, असा आदेश द्यावा लागला. या स्पर्धेत खाडिलकरांनी गुजरातचे गौरांग मेहता, महाराष्ट्राचे अब्दुल जब्बार आणि पश्चिम बंगालचे ए.के. घोष यांचा पराभव केला.
इतर स्पर्धा
रोहिणी खाडिलकर यांनी ब्युनॉस आयर्स (१९७८), व्हॅलेटा (१९८०), ल्युसर्न (१९८२), थेसालोनिकी (१९८४) आणि दुबई (१९८६) येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यांनी विभागीय अजिंक्यपद दोनदा जिंकले- एकदा दुबई येथे आणि एकदा मलेशिया येथे. आणि त्या जगातील आठव्या क्रमांकाच्या खेळाडू झाल्या. १९८९ मध्ये लंडन येथील संगणकाला हरवणाऱ्या त्या पहिल्याच आशियाई खेळाडू आहेत.
बुद्धिबळ राजदूत
भारताच्या प्रतिनिधी म्हणून रोहिणी यांनी ५६ वेळा विविध देशांना भेटी दिल्या. भारताच्या बुद्धिबळ राजदूत म्हणून सरकारने त्यांना पुरस्कृत केले होते. त्यांनी तेव्हा साम्यवादी असलेल्या युगोस्लाव्हिया, पोलंड आणि सोव्हिएत रशियालासुद्धा भेटी दिल्या.
वृत्तपत्रातील कारकीर्द
१९९३ मध्ये बुद्धिबळाच्या खेळातून निवृत्ती घेतल्यावर त्या महाराष्ट्रातील 'सायंकाळ' या सायंदैनिकाच्या पहिल्या महिला संपादक बनल्या. त्या नवा काळ या वृत्तपत्राच्या सहाय्यक संपादक आहेत. तसेच १६ डिसेंबर १९९८ पासून सायंकाळच्या संपादक आहेत.
पुरस्कार
- १९७७ मध्ये, बुद्धिबळातील उल्लेखनीय कामगिरीसाठी रोहिणी खाडिलकर यांना शिवछत्रपती पुरस्कार प्रदान झाला.
- तसेच १९८० मध्ये, त्यांना अर्जुन पुरस्कारसुद्धा देण्यात आला.
संदर्भ
- ^ "Anand's win fires former chess whiz from Girgaon - Hindustan Times". web.archive.org. 2014-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-10-16 रोजी पाहिले.
- ^ November 27, Amarnath K. Menon; February 15, 2013 ISSUE DATE:; September 24, 1981UPDATED:; Ist, 2014 13:05. "Rohini Khadilkar becomes an International Woman Master with her Accumax Asian Women's Championship win". India Today (इंग्रजी भाषेत). 2019-10-16 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)