Jump to content

रोझ व्हॅली

रोझ व्हॅली ही पश्चिम बंगालमधील एक चिट फंड कंपनी होती. खातेदारांना फसवून त्यांचा पैसा हडप करणाऱ्या या कंपनीची इ.स. २०११ सालापासून चौकशी चालू होती. अखेर २०१६ सालच्या अखेरीस या कंपनीचे कामकाज बंद पाडून सरकारने संबंधितांना अटक केली.

सुरुवात

काजल कुंडू या कलकत्त्यातील उद्योजकाने इ.स. १९९७मध्ये रोझ रिझॉर्ट्‌स ॲन्ड प्लँटेशन (गुलाबशेती) नावाची कंपनी स्थापन केली. इ.स. २००३मध्ये काजल यांची पत्‍नी आणि मुलगा यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर काजल यांचे धाकटे बंधू गौतम यांनी ही कंपनी ताब्यात घेतली.

त्यानंतर कंपनीने ट्रॅक बदलला. गुंतवणूकदारांना जमिनी देण्याचे आमिष दाखविण्यात आले. मोठ्या परताव्याचे आमिष, अनेक बड्या लोकांची गुंतवणूक यामुळे असंख्य सामान्य गुंतवणूकदारांनी अक्षरशः आयुष्यभराची सारी कमाई रोझ व्हॅलीमध्ये गुंतवली. त्यांच्यामध्ये पश्चिम बंगाल, .बिहार, ओरिसा आणि आसामसहित इतर ईशान्य भारतातील गुंतवणूकदारांची संख्या मोठी होती.

कुंडूच्या साम्राज्याचा विस्तार

कुंडूने उद्योजक म्हणून अनेक क्षेत्रांत हातपाय पसरले. अनेक नामवंत दिग्दर्शकांना घेऊन काही बंगाली चित्रपट बनवले. त्याचे स्वतःचे बंगाली वृत्तपत्र, बंगाली दूरचित्रवाणी वाहिन्या, रेडिओ केंद्रे आणि केबल नेटवर्क आहे. धूम म्युझिक आणि धूम सिनेमा ह्या हिंदी वाहिन्याही त्याच्या मालकीच्या आहेत.

कलकत्ता नाईट रायडर्स ह्या आयपीएलमधील क्रिकेट संघाचा तो प्रमुख प्रायोजक होता.

गुलाबशेतीतून सुरू झालेला रोझ व्हॅलीचा व्याप इ.स. २००९-१० पर्यंत विमानवाहतूक, सूक्ष्म वित्त पुरवठा, वस्त्रोद्योग, कन्सल्टन्सी, शीतपेयेनिर्मिती, इन्फोटेक, गृहकर्ज आदी क्षेत्रांत विस्तारला. त्याच्या समूहात एकूण ३० कंपन्या होत्या.

सेबीच्या आकडेवारीनुसार इ.स. २००५मध्ये रोझ व्हॅलीची तीन कोटी रुपये असलेली उलाढाल २००९-१० साली एकदम १२७१ कोटींवर गेली, तर ३१ मार्च २०११पर्यंत ती २०१६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.

या वेळेपर्यंत गौतम कुंडू कलकत्त्यातील उच्चभ्रू वर्तुळातील बडे प्रस्थ बनले होते. कलकत्त्यातील रोल्स रॉईस मोटार बाळगणाऱ्या मोजक्या श्रीमंतांपैकी ते एक होते. त्यांनी मंदारमणी येथे एक भव्य हॉटेल उघडले; तेथेच त्यांचे विलासी जीवन सुरू झाले.

रोझ व्हॅली कंपनीने कलकत्ता, दुर्गापूर, सिलिगुडी, मिदनापूर, तारापीठ जुना दिघा, सिल्चर, हरिद्वार, गोवा, जयपूर, आणि नवी दिल्ली येथे मालमत्ता असल्याचे दावे करायला सुरुवात केली.

संशयाचे धुके, चौकशी आणि कृती

रोझ व्हॅलीच्या या आर्थिक उड्डाणांमुळे पश्चिम बंगालच्या मार्क्सवादी पक्षाच्या डाव्या सरकारने ७ डिसेंबर २००९रोजी सेबीला पत्र लिहून रोझ व्हॅलीच्या व्यवहारांची चौकशी करण्याची विनंती केली. २०११ सालच्या मार्चनंतर पश्चिम बंगालवर तृणमूल काँग्रेसची सत्ता आली. तत्पूर्वीच जानेवारी २०११मध्ये सेबीने रोझ व्हॅली रिअल इस्टेट ॲन्ड कन्स्ट्रक्शन कंपनीला, आणि २०१३ साली रोझ व्हॅली हॉटेल्स ॲन्ड एन्टरमेन्टला नवीन ठेवी गोळा करण्यास मनाई केली.

कंपनीचा तपास करताना असे आढळले की, कंपनी गुंतवणूकदारांना १२ ते १७.५ टक्के व्याज देणारी सभासदत्व योजना राबवीत होती. या योजनेत २२ लाख लोकांनी एकूण १७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी-एन्फोर्समेन्ट डिरेक्टरेटच्या) माहितीनुसार, रोझ व्हॅलीची २६३१ बँक खाती आहेत, त्यांत एकूण ८०० ते १००० कोटी रुपयांची शिल्लक होती. या पैशांपैकी फार मोठा हिस्सा राजकीय नेत्यांचा असण्याचा संशय ईडीला आला. ही सर्व बँक खाती सरकारने गोठवली. २२ डिसेंबर २०१६पर्यंत ईडीने रोझ व्हॅली चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी १२५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून, यात आठ हॉटेले आणि एका रोल्स रॉईस मोटारीचा समावेश आहे.

अटकसत्र

त्यानंतर ईडीने अटकसत्र सुरू केले. त्यांत कुणाल घोष, श्रींजय बोस हे तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार, एका प्रख्यात फुटबॉल क्लबचे वरिष्ठ पदधिकारी देवव्रत सरकार आणि पश्चिम बंगालचे क्रीडा आणि वाहतूक मंत्री मदन मित्रा यांचा समावेश आहे. रोझ व्हॅली समूहाचे अध्यक्ष गौतम कुंडू याच्यासह अन्य काही जणांवर करचुकवेगिरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंडू याला संचालनालयाने अटक केली होती.

तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांची रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने चौकशी केल्यानंतर त्यांना ३ जानेवारी २०१७ रोजी अटक करण्यात आली. याच प्रकरणात तृणमूल काँग्रेसचेच खासदार तपस पाल यांना आधीच अटक करण्यात आली होती. या अटकसत्राविरुद्ध पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कलकत्त्यात आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर गोंधळ घातला. सीबीआयने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.