Jump to content

रूपांतरण (श्रीअरविंदप्रणित पूर्णयोग)

रूपांतरण ही श्रीअरविंदप्रणीत पूर्णयोगामधील एक महत्त्वाची संकल्पना आहे. ती एक प्रकारे पूर्णयोगाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

पारंपरिक योग आणि पूर्णयोग यांच्या उद्दिष्टांमधील भेद

पारंपरिक योगमार्गाचे उद्दिष्ट मुक्ती हे असते. परन्तु पूर्णयोगाच्या साधनेची सुरुवातच मुक्तीपासून होते. [] मुक्तदशा प्राप्त झालेल्या साधकाने स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीचे परा-प्रकृतीमध्ये आणि अज्ञानजन्य सामान्य जीवनाचे दिव्य जीवनामध्ये रूपांतरण घडविणे पूर्णयोगात अपेक्षित असते.

श्रीमाताजी म्हणतात, ''या जीवनापासून पलायन करत, दिव्य 'सद्वस्तु' मध्ये विलय, ही झाली पूर्वीची आध्यात्मिकता! त्यामध्ये या जगाला ते जसे आहे त्या स्थितीत सोडून दिले जात असे; त्याउलट, आता मात्र आपण आपल्या नव्या दृष्टिकोनातून (पूर्णयोगाच्या दृष्टिकोनातून), जीवनाचे दिव्यत्वीकरण, या जडभौतिक विश्वाचे दिव्य विश्वामध्ये रूपांतर करणे अभिप्रेत आहे.'' []

व्याख्या

झालेल्या साक्षात्काराच्या साच्यामध्ये समग्र प्रकृती ओतणे आणि सातत्यपूर्ण रीतीने केलेल्या या प्रयत्नांमुळे कनिष्ठ (अपरा) प्रकृतीचे तिचे मूळ स्वरूप असलेल्या परा-प्रकृतीमध्ये परिवर्तन होणे म्हणजे रूपांतरण होय असे म्हणता येईल. []

स्वरूप

  • अतिमानसिक सत्याचे प्रकटीकरण करण्यासाठी आपली साधने म्हणजे मन, प्राण, आणि शरीर ही सक्षम व्हावीत यासाठी रूपांतरण आवश्यक असते.
  • रूपांतरण हे आपोआप घडून येत नाही. ते कष्टसाध्य असते.
  • रूपांतरणाची प्रक्रिया ही प्रगमनशील असते. पण ती घडून येण्यापूर्वी साक्षात्कार होणे आवश्यक असते.[]
  • रूपांतरणासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते - चेतना, घडणसुलभता (plasticity) आणि हातचे काही राखून न ठेवता ईश्वराप्रत किंवा दिव्य मातेप्रत केलेले समर्पण. []
  • येथे व्यक्तिगत पातळीवर मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण तर विश्वाच्या पातळीवर जडभौतिक विश्वाचे दिव्य विश्वामध्ये रूपांतर अपेक्षित आहे. सामान्य अज्ञानांकित जीवनाचे दिव्य जीवनात रुपांतरण अपेक्षित आहे.

प्रकार

'रूपांतरण कोणत्या शक्तीद्वारे घडून येणार' या निकषावर आधारित असलेले प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

०१) आंतरात्मिक रूपांतरण (Psychic Transformation) - हृदयस्थ असणारा अंतरात्मा (चैत्य पुरुष) अग्रभागी येऊन मन, प्राण आणि शरीर या साधनांचे नियमन करू लागतो आणि प्रकृतीमध्ये रूपांतरण घडवून आणतो. यासाठी साधकाने हृदय-केंद्रावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. असे केल्याने आणि अभीप्सा, भक्ती, समर्पण यांच्या साहाय्याने, कनिष्ठ प्रकृतीस अंतरात्म्यापासून विलग करणारा पडदा दूर होतो आणि आंतरात्मिक रूपांतरण घडून येते. []

०२) आध्यात्मिक रूपांतरण (Spiritual Transformation) - आपल्या उर्ध्वस्थित असणाऱ्या आपल्या आत्म्याचा, अनंताचा साक्षात्कार आणि त्याबरोबरच त्याच्या गतिमान, सक्रिय अंगाचा साक्षात्कार झाल्यावर विश्वातीत असणारा ईश्वरी प्रकाश, ज्ञान, शक्ती, शांती, आनंद या गोष्टी व्यक्तीमध्ये अवतरीत होऊ लागतात आणि येथे आध्यात्मिक रूपांतरण घडून येते.

येथे आरोहण आणि अवरोहण अशा दोन प्रक्रिया घडून येतात. साधकाने उर्ध्वस्थित असणाऱ्या आत्म्याप्रत आणि दिव्य ईश्वरी प्रकाश, ज्ञान, शक्ती, शांती, आनंद यांच्याप्रत खुले होणे, उन्नत होणे म्हणजे आरोहण आणि त्या गोष्टी आपल्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये, आपल्या देहामध्ये अवतरित होणे म्हणजे अवरोहण. या दोन्ही प्रक्रिया झाल्याशिवाय आध्यात्मिक रूपांतरण होत नाही. []

०३) अतिमानसिक रूपांतरण (Supramental Transformation) - आध्यात्मिक रूपांतरणाच्या पलीकडे असणारे रूपांतरण. [] निम्न आणि उच्च गोलार्ध यांच्यामधील पडदा जेव्हा दूर होतो आणि अतिमानस जेव्हा आपल्या अस्तित्वाचे संचालन करू लागते तेव्हाच अतिमानासिक रूपांतरण शक्य होते. [] जेव्हा ‘अतिमानसिक’ रूपांतरण घडून येते तेव्हाच साधनभूत ‘प्रकृती’चे संपूर्ण रूपांतरण होऊ शकते. तोपर्यंत प्रकृती अनेक अपूर्णतांनी भरलेली असते. []

'रूपांतरण कोणाचे' या निकषावर आधारित असलेले प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.[]

०१) मानसिक रूपांतरण (Transformation of mind)

०२) प्राणिक रूपांतरण (Transformation of vital)

०३) शारीरिक रूपांतरण (Transformation of body)

संदर्भ

  1. ^ The Mother. Collected Works of The Mother - Vol 09. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. pp. 336–337. ISBN 81-7058-670-4.
  2. ^ The Mother (1977). Collected Works of The Mother - Vol 09. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-670-4.
  3. ^ a b A.B.Purani (1959). Evening Talks with Sri Aurobindo. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Trust. ISBN 81-7060-093-6.
  4. ^ a b M.P.Pandit (1966). Dictionary of Sri Aurobindo's Yoga. Pondicherry: Dipti Publications. pp. 281–285.
  5. ^ a b c A.S.Dalal (2002). Emergence of the Psychic (Governance of Life by the Soul). Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-688-7.
  6. ^ Sri Aurobindo. Complete works of Sri Aurobindo. 29. Pondicherry: Sri Aurobindo Ashram. p. 404.
  7. ^ Sri Aurobindo. Complete Works of Sri Aurobindo. 31 (CWSA ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram.