Jump to content

रुईधानोरा

समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेल्या मंदिरात, गेवराई तालुक्यातील रुईधानोरा येथे चारशे वर्षांपासून रामजन्मसोहळा साजरा होतो. मंदिरात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या संगमरवरी चार फुटी मूर्ती असून उत्सवाच्या काळात राम व सीता यांच्या दुसऱ्या दोन उत्सवमूर्ती सजविलेल्या असतात. रुई गावातील श्रीराम नवसाला पावणारा रूचा राम म्हणून प्रसिद्ध आहे. भक्तांचे मनोरथ पूर्ण करतो अशी गावांतील भाविकांची श्रद्धा आहे.

गुढीपाडव्यापासून गावात सुरू होणारा श्रीराम जन्मोत्सव दशमीपर्यंत चालतो. नवमीच्या दिवशी रामजन्म आणि दशमीला या ठिकाणी श्रीरामाचा लग्न सोहळा होतो. नवमीला दुपारी जन्मसोहळा झाल्यानंतर रात्री रामाचा नामकरण सोहळा होतो. फुलांनी सजविलेल्या पाळण्यात रामाचे नामकरण होते. दशमीच्या दिवशी गावातून दिंडी काढली जाते. टाळमृदंगाच्या गजरात फुगड्या खेळल्या जातात. दिंडी गावातून मठात आल्यानंतर भट, वासुदेव, बोबड्या ही सोंगे ग्रामस्थ सादर करतात. राम मंदिरात दशमीच्या उत्तररात्री श्रीरामाचा सीतेबरोबर ‘विवाह’ लावला जातो. विवाहापूर्वी मंदिरात येणाऱ्या व‍ऱ्हाडींना (भाविकांना) अक्षता वाटप करतात. अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हटली जातात. रामजन्मसोहळ्याचा समारोप मंगल सोहळ्यानेच म्हणजेच रामाच्या लग्नाने व्हावा असा समर्थांचा दंडक होता, तो आजही पारंपरिक पद्धतीने पाळला जातो.

उत्सवाच्या काळात पंचयुक्त पवमान, नवसाच्या पंगती, नित्योपासना, दासबोध, पारायण, संगीत रामायण कथा आदी कार्यक्रम चालतात. अकरा दिवसांच्या काळात परिसरातील पंधरा गावांतील ग्रामस्थ सहभागी होतात. या उत्सवातून चारशे वर्षांपासूनची ग्रामीण लोकसंस्कृती व परंपरा जोपासली जात आहे. पारंपरिक सोंगे आणि भारुडांनी गावकऱ्यांनी उत्सवाच्या माध्यमातून लोकसंस्कृती जपली आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्सवाच्या काळात नवसाच्या पंगती घातल्या जातात. संपूर्ण गाव या उत्सवात सहभागी होते. येथील मंदिराला जगद्गुरू शंकराचार्य, संत भगवानबाबा, ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांनी भेटी दिल्या आहेत.

संदर्भ आणि नोंदी