Jump to content

राष्ट्रीय सेवा योजना

राष्ट्रीय सेवा योजना  : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने १९६९-७० मध्ये सुरू केलेली एक योजना. सुरुवातीस ही योजना सक्तीच्या राष्ट्रीय छात्रसेना योजनेचा पर्याय म्हणून सुरू झाली. राष्ट्रीय छात्रसेना दलात न जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने राष्ट्रीय सेवा योजनेत भाग घ्यावा, अशी अपेक्षा होती. पुढे या योजनेतील फार मोठी आर्थिक जबाबदारी ध्यानात घेऊन प्रत्येक राज्यातील काही निवडक महाविद्यालयांपुरतीच ही योजना लागू करण्यात आली.

राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे, हे आहे. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, गलिच्छ वस्त्यांची सफाई, प्रथमोपचार, नागरी संरक्षण इ. कार्यक्रमांचा या योजनेत समावेश आहे. १९७६-७७ पासून ग्रामीण विभागाची सुधारणा, तसेच आर्थिक व सामाजिक दृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांच्या विकासाची कामे यांवर भर देण्यात आला. या दृष्टीने ग्रामीण भागातील परिसराची सुधारणा व आरोग्य तथा कुटुंबनियोजन हे कार्यक्रम हाती घेण्यात आले. त्याचप्रमाणे उत्पादनविषयक कार्यक्रम, आणीबाणी, प्रौढ शिक्षण, मनोरंजन, बालकांसाठी उपक्रम इ. कामेही सुरू करण्यात आली. १९८५ च्या युवक वर्षामध्ये या कार्यक्रमांना विशेष उजाळा देण्यात आला.

अंमलबजावणी

केंद्र शासन व राज्य सरकारे यांच्या सहकार्याने ही योजना राबविली आहे. ह्या योजनेकरिता महाविद्यालयाची निवड करण्याचे काही निकष आहेत : ज्या संस्थेत समाजकार्य करण्याची प्रथा आहे व ज्या संस्था ग्रामीण विभागातील विकासकार्य करण्याच्या दृष्टीने ग्रामीण विभागाजवळ आहेत, अशी महाविद्यालये या योजनेसाठी निवडली जातात. प्रत्येक महाविद्यालयातून २०० पर्यंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षातून १२० तास काम करावे लागते. प्रत्येक महाविद्यालयास कार्यक्रमाची निवड करण्याचे स्वातंत्र्य असते.

या योजनेतर्फे दिल्ली, बिहार, ओरिसा, प. बंगाल, उत्तर प्रदेश इ. राज्यांत प्रशंसनीय कार्य झाले. १९७८ पासून राष्ट्रीय सेवा योजना दल सुरू करण्यात आले. भारतातील नेहरू युवक केंदाचे सहकार्यही या योजनेस लाभले. आता राष्ट्रीय सेवा संघटकाची नेमणूक करण्यात आली असून युवकांमध्ये समाजसेवाकार्याची आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने ही योजना यशस्वी होत आहे. १५ ऑगस्ट १९८६ पासून भारत सरकारने कार्यात्मक साक्षरतेसाठी जो जनआंदोलन कार्यक्रम सुरू केला आहे, त्यातील महत्त्वाची कामगिरी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांवर सोपविली आहे. या योजनेसाठी राज्यपातळीवर सल्लागार मंडळेही नेमण्यात आली आहेत. सध्या भारतातील सु. दहा लाख महाविद्यालयीन विद्यार्थी या योजनेत भाग घेत आहेत.

संदर्भ

Government of India, Ministry of Education and Social Welfare. The National Service Scheme-An Appraisal, New Delhi, 1976.