राष्ट्रीय चळवळीचे मूलभूत कार्य
उदारमतवादी कालखंडात काँग्रेसच्या नेत्यांनी लोकजागृतीचे केलेले कार्य भारतीय स्वातंत्र चळवळीतील पायाभूत कार्य मानता येते. काँग्रेसने या काळात सनदशीर मार्गाचा अवलंब करून ब्रिटिश शासनाबरोबर संघर्ष न करता सहकार्य करण्याची भूमिका घेतली. या काळात राष्ट्रीय काँग्रेसने समान प्रश्नावर देशातील लोकांना एकत्र आणण्याचे काम केले.समाजातील निरनिराळ्या घटकांना संघटीत करण्याबरोबर भारतीयामध्ये राष्ट्रवादाच्या विचाराचा प्रचार करण्याच्या कार्याला काँग्रेसने चालना दिली. विविध प्रांतात कार्य करणाऱ्या राष्ट्रवादी संघटनाना एकत्रितपणे विचारविनिमय करण्याची व चळवळीचा पुढील मार्ग ठरविण्याची संधी याद्वारे प्राप्त झाली. काँग्रेसने केलेल्या या कार्यामुळे राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित झालेले अनेक तरून काँग्रेसच्या कार्यात सहभागी झाले. पुढील काळात काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीच्या गतीमान्तेला या तरुणांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले, म्हणून उदारमतवादी कालखंडातील काँग्रेसचे कार्य हे पुढील काळातील राष्ट्रवादी चळवळीचे पायाभूत कार्य होते असे मानता येते. या काळात पुष्कळदा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधी भूमिका घेतली असली , काँग्रेसच्या हालचालींना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असला तरीही अधिवेशनास येणाऱ्या सदस्यांचा संखेत दरवर्षी वाढ होत गेली. ही वाढ म्हणजे या काळात राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यात काँग्रेसला आलेल्या यशाचा पुरावाच होय.