रामानुज
रामानुजाचार्य : (१०१७ –११३७). आद्य शंकराचार्यांनंतर दक्षिणेत तीनशे वर्षांनी अकराव्या शतकात रामानुजाचार्य जन्मले. त्यांनी त्यांच्या आधी सु. दीड हजार वर्षे प्रचलित असलेल्या वैष्णव संप्रदायाला ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहून वेदान्ताचा आधार दिला आणि भक्तिमार्गाला ज्ञान व कर्म यांच्यापेक्षा अधिक माहात्म्य प्राप्त करून दिले. कर्म व ज्ञान यांनी चित्त शुद्ध होते आणि भक्तियोगानेच मोक्षाधिकार प्राप्त होतो, असा शंकराचार्यांपेक्षा काहीसा वेगळा सिद्धांत त्यांनी स्थापन केला. दक्षिणेत तमिळनाडूमध्ये रामानुजाचार्यांच्या आधीपासून सु. ६०० वर्षे आळवार नावाच्या वैष्णव साधुसंतांचा संप्रदाय सुरू होता. त्यांचे तमिळ भाषेतील उच्च धार्मिक आशयाचे ‘प्रबंध’ होते. त्या प्रबंधांना वेदांच्या इतकेच प्रामाण्य होते म्हणून त्यांना ‘द्राविड वेद’ अशी पदवी प्राप्त झाली होती. या आळवारांच्या संतमालिकेत नम्माळवार किंवा शठकोपमुनी यांना सर्वश्रेष्ठ स्थान दिले आहे. त्यांच्या प्रबंधाचा तिरुवायमोळि वा दिव्य प्रबंधम् असा निर्देश होतो. महाराष्ट्रात गेल्या सातशे वर्षांत ज्ञानदेव-नामदेव, एकनाथ-तुकाराम ही जशी संतमालिका प्रसिद्ध आहे तशीच रामानुजाचार्यांच्या आधी सु. ६०० वर्षांमध्ये दक्षिणेत अनेक संतकवींची मालिका निर्माण झाली. आचार्यही अनेक झाले. नाथमुनी (नववे-दहावे शतक), यामुनमुनी (सु. ९१८ – सु. १०३८) आणि त्यानंतर रामानुजाचार्य आणि वेदान्तदेशिक वा वेंकटनाथ (सु. १२६९ –सु. १३७१) झाले. यामुनमुनींचे सिद्धित्रय, आगमप्रामाण्य, गीतार्थसंग्रह, महापुरुषनिर्णय, चतुःश्लोकी व स्तोत्ररत्न हे संस्कृत ग्रंथ प्रसिद्ध आहेत. शांकर वेदान्तामध्ये ⇨गौडपादाचार्यांना जे स्थान आहे, तेच स्थान वैष्णव संप्रदायात यामुनमुनींना आहे. रामानुजांना भाष्यकार म्हणून व वैष्णव संप्रदायाचे श्रेष्ठ तत्वज्ञ म्हणून स्थान प्राप्त झाले त्यांच्या पाठीमागे यामुनमुनींची प्रेरणा होती. आळवार संतांच्या परंपरेमध्ये शूद्रातिशूद्रांचाही अंतर्भाव झालेला दिसतो. मुक्ताबाईसारख्या महिला संतही या आळवारांच्या मालिकेत चमकून गेल्या आहेत. गोदा किंवा ⇨आंडाळ हिच्या १७३ कविता तमिळ भाषेमध्ये अप्रतिम म्हणून गणल्या जातात. तिने मनाने देवालाच वरले होते.
तिरुप्पाण आळवार हा पंचम जातीत म्हणजे दलितात जन्मलेला चोखामेळ्यासारखा संत होता. हा सतत वीणाधारी आणि भजनात निरंतर दंग असलेला संत होता. तिरुप्पाण आळवाराची एक मोठी सूचक गोष्ट सांगण्यात येते, ती अशी : श्रीरंगम् येथे तिरुप्पाण आळवार कावेरी नदीच्या घाटावर बसून वीणेवर भक्तांच्या कविता गात बसे. एकदा तो श्रीरंगनाथस्वामींच्या मंदिरासमोर द्वारमार्गावर वीणेच्या तारा छेडीत भजनात दंग झाला होता येणाऱ्या जाणाऱ्यांचे भान राहिले नाही तेव्हा मंदिराचा लोकसारंगमुनी हा पुजारी मंदिराकडे जाऊ लागला असताना, मंदिराच्या दरवाज्यात बेभान होऊन गाणाऱ्या तिरुप्पाण आळवाराला बाजूला होण्यास त्याने सांगितले कारण तो अस्पृश्य असावा असे लक्षात आले. तो भजनात दंग असल्याने त्याला हे ऐकू आले नाही. लोकसारंगमुनीने त्याला दगड हाणला आणि जोराची शिवीगाळ केली. तो बिचारा काही न बोलता अधिक मार बसू नये म्हणून भिऊन पळाला. हे घडत असताना मंदिराचे दरवाजे आपोआप बंद झाले. ही वेळ देवपूजेची होती. यावेळी दरवाजे सताड उघडे रहावयाचे. लोकसारंगमुनीने दरवाजे जोरात हलवले. आतून कोणी बंद केले असतील म्हणून बाहेरून हाका मारल्या. आतून उत्तर आले नाही आणि दरवाजेही उघडले नाहीत. लोक जमले, सर्वांनी प्रयत्न केला. दरवाजे उघडेनात. आतून आकाशवाणी ऐकू आली, ‘मी रंगनाथस्वामी मला दगड मारला, शिवी दिली. म्हणून मी दरवाजा बंद केला आहे. कावेरीच्या घाटावर एक महापुरुष माझ्या नामस्मरणात तल्लीन झाला आहे. त्याला खांद्यावर घ्या, मंदिराची प्रदक्षिणा करा, तर हे दरवाजे उघडतील, नाहीतर दरवाजे उघडणे शक्य नाही’. लोकसारंगमुनी घाटावर धावत गेला आणि तिरुप्पाण आळवाराला खांद्यावर बसण्याची त्याने विनंती केली. त्याने उत्तर दिले, ‘मी अस्पृश्य, अतिशूद्र आहे. मी त्या द्वारमार्गावर भजन करीत बसलो, हा माझा अपराध आहे. मी तुमच्या देहाला दूषित करू इच्छित नाही’. तिरुप्पाण आळवाराचे हे बोलणे न मानता क्षमा मागून लोकसारंगमुनीने तिरुप्पाणला खांद्यावर घेतले, प्रदक्षिणा केली रंगनाथस्वामीचे दरवाजे आपोआप उघडले गेले. तेव्हापासून तिरुप्पाणला ‘मुनिवाहन’ अशी पदवी प्राप्त झाली.
आळवार संत महाराष्ट्रातील वारकरी संतांप्रमाणेच वरपासून खालपर्यंतच्या सगळ्या जातिजमातींमध्ये जन्मून प्रसिद्धीस आले. त्यांच्यात संतकवी आणि संतपंडित वा आचार्य निर्माण झाले. यामुनाचार्य आळवार संतांच्या मालिकेतीलच संतपंडित होत. यामुनाचार्यांचे शिष्य महापूर्ण (नम्बी) यांच्या दोन बहिणी कांतिमती व द्युतिमती वडील बहीण कांतिमती ही रामानुजांची माता होय आणि आसुरीकेशवाचार्य हे पिता होत. मद्रास शहरापासून सु. ४५ किमी. अंतरावर नैर्ऋत्य दिशेस श्रीपेरुंबूदूर (भूतपुरी) या छोट्या गावात रामानुजांचा जन्म झाला. महापूर्णांच्या धाकट्या बहिणीने-द्युतिमतीने-कमलनयनभट्ट यांच्याशी विवाह केला. तिला गोविंद नावाचा मुलगा झाला.
रामानुजांच्या जन्मापूर्वीची हकीकत अशी : आसुरीकेशवाचार्यांना दीर्घकालपर्यंत संतती झाली नाही. त्यांनी अनेक यज्ञ केले याचे निदर्शक म्हणून त्यांना ‘सर्वक्रतु’ अशी पदवी प्राप्त झाली. सागरतीरावर वृंदारण्यात श्रीपार्थसारथी म्हणजे श्रीकृष्ण याची आराधना करण्याकरता त्यांनी अनेक यज्ञ केले. या स्थानाला हल्ली ट्रिप्लिकेन म्हणतात. त्यांना स्वप्नात पार्थसारथी श्रीकृष्णाचे दर्शन झाले. ‘तुझी पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होईल’, असे आश्वासन पार्थसारथीने त्यांना दिले.
चैत्र शुद्ध पंचमी शके ९३९ रोजी रामानुजांचा जन्म झाला. त्याच सुमारास द्युतिमतीलाही पुत्र झाला. महापूर्ण किंवा शैलपूर्ण हे संन्यासी झाले होते परंतु त्यांनी जवळ जाऊन आपल्या बहिणींच्या पुत्रांचे अवलोकन केले. लहान बालक रामानुज याच्या शरीरावरील दिव्य चिन्हे पाहून वैष्णव पंथाचा पुरस्कर्ता महापुरुष जन्मला, हे त्यांच्या लक्षात आले. असा महापुरुष जन्मेल असे नम्माळवार शठकोपमुनी यांनी भविष्य वर्तविले होते, ते त्यांना आठवले.
रामानुजांचे उपनयन झाल्यावर शिक्षण सुरू झाले. त्यांचे वडील वेदशास्त्रसंपन्न होते. तरी रामानुजांचे शिक्षण दुसऱ्या एका विद्वान गृहस्थांकडे झाले. कांचीपुरीमध्ये कांचीपूर्णनामक वैष्णव संत राहत होते. पूनुमुलाई या जवळच्या गावातील लक्ष्मीनारायणाचे दर्शन घेण्याची त्यांची परिपाठी होती. श्रीपेरुंबूदूर या गावातून त्या मंदिराकडे वाट होती. ती वाट रामानुजांच्या घरावरून जात होती. कांचीपूर्ण हे सिद्धपुरुष होते. विद्वान ब्राह्मणही त्यांना साधुपुरुष म्हणून वंदन करीत. एके दिवशी रामानुजांना पाठशाळेतून परत येत असताना कांचीपूर्णांचे दर्शन झाले. रामानुजांनी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु कांचीपूर्णांनी तो नमस्कार नाकारला आणि म्हणले, ‘मी खालच्या जातीतला आहे, मी शूद्र आहे. तू ब्राह्मण आहेस, तू असा नमस्कार मला करू नकोस’. रामानुज उत्तरले, ‘मी हे दुर्दैव समजतो, की मला तुमच्या चरणांचा स्पर्श तुम्ही होऊ देत नाही. मी यज्ञोपवीत धारण केले, म्हणून मी ब्राह्मण आहे हे खरे नाही. तिरुप्पाण आळवार अंत्यज होते परंतु ब्राह्मणांनाही वंदनीय होते’. त्या दिवसापासून कांचीपूर्ण व रामानुज यांचे चांगले सख्य झाले.
वयाच्या सोळाव्या वर्षी रामानुजांचे रक्षकांबाळ या मुलीशी लग्न झाले. त्याच वर्षी त्यांचे वडील आसुरीकेशवाचार्य वारले. रामानुज सहकुटुंब कांचीपुरीला राहण्यास आले कारण कांचीपूर्ण हे वैष्णव संत कांचीपुरीतच राहत होते. कांचीपुरीला तेथील सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ, विद्वान, अद्वैतवादी यादवप्रकाश (अकरावे शतक) यांच्यापाशी रामानुजांच्या अध्ययनास सुरुवात झाली. यादवप्रकाश मायावादी नव्हते. त्यांच्या सिद्धांताला ⇨शुद्धाद्वैतवाद अशी संज्ञा देता येते. ह्या शुद्धाद्वैतवादाप्रमाणे परब्रह्माची नित्य परिवर्तन पावणारे आणि परिवर्तन न पावणारे अशी दोन रूपे. नित्य बदलणारे विश्व हे परब्रह्माचे एक स्वरूप आणि सच्चिदानंद केवलब्रह्म हे परिवर्तन न पावणारे दुसरे स्वरूप आहे. रामानुजांना यादवप्रकाशांचा हा शुद्धाद्वैतवाद मान्य झाला नाही परंतु रामानुजांनी यादवप्रकाशांपाशी आपले अध्ययन सुरू ठेवले. गुरु-शिष्यांचे मतभेद होत. कित्येक वेळा ते मतभेद पराकाष्ठेचे असत. रामानुज आपली बाजू मांडत असताना गुरूंची मती कुंठित करीत. कांची येथील एका सरदाराच्या मुलीला भूतबाधा झाली होती. यादवप्रकाशांकडे आपल्या कन्येला घेऊन सरदार आले. परंतु यादव-प्रकाशांचे मंत्रतंत्र विफल झाले. अत्यंत तेजस्वी शिष्य म्हणून रामानुजांची प्रसिद्धी झाली होती. त्यांच्याकडे कन्येला घेऊन ते सरदार आले. रामानुजांच्या चरणस्पर्शाबरोबर त्या कन्येची भुताटकी झटक्यासरशी उतरली.
रामानुजाचार्य : आदिकेशव-पेरुमाळ मंदिर, श्रीपेरुंबूदूर(तमिळनाडू).
यादवप्रकाशांनी एके दिवशी आपले पाय दाबण्याकरिता रामानुजांना बोलावून घेतले. रामानुज सेवा करीत असताना गुरूंशी शास्त्रचर्चाही करीत. छांदोग्यउपनिषदात ‘तस्य यथा कप्यासं पुण्डरीकमेवमक्षिणी’ असे देवाच्या डोळ्यांचे वर्णन आले आहे. ‘कपीच्या कमरेखालच्या भागाप्रमाणे असलेल्या कमळाप्रमाणे शोभणारे डोळे’, असा अर्थ यादवप्रकाशांनी सांगितला. रामानुजांनी ही कमरेखालच्या भागाची उपमा देवाच्या डोळ्यांना शोभत नाही म्हणून निराळा अर्थ सांगितला. ‘कपि’ म्हणजे सूर्य ‘कप्यासं’ म्हणजे सूर्याप्रमाणे विकसित आणि त्या विकसित कमळाप्रमाणे डोळे, असा अर्थ केला. ‘कपि’ शब्दाचा ‘क’ म्हणजे जल, त्याचे पान करणारा म्हणजे सूर्य असाही अर्थ त्यांनी केला. यादवप्रकाशांना रामानुजांच्या विचारकुशलतेचा हेवा वाटला. असे पदोपदी मतभेद व्हायचे. तैत्तिरीय उपनिषदातील ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’ याचा सरळ अर्थ विशिष्टाद्वैत सिद्धांताशी जमणारा नाही. त्याचा सरळ अर्थ – ‘सत्य, ज्ञान आणि अनंत ब्रह्म’ यात ‘ब्रह्मच ज्ञान आहे’ हे विधान विशिष्टाद्वैताशी जुळत नाही. कारण ब्रह्माचा म्हणजे परमेश्वराचा ज्ञान हा गुण आहे, असे विशिष्टाद्वैतमताने म्हणावे लागते. यादवप्रकाशांच्या हे लक्षात आले, की हा आपला प्रखर बुद्धिमान विद्यार्थी अद्वैतवेदान्ताचे खंडन करणारा विजयी पंडित होणार आहे. हे मोठे संकटच आहे. म्हणून या जगातून त्याला कायम रजा द्यावी. प्रयाग यात्रेला शिष्यगणांसह त्यांनी प्रस्थान मांडले. त्यात रामानुजाला आणि त्याचा मावसभाऊ गोविंद याला बरोबर घेतले. काही शिष्यांशी गुप्त खलबत करून प्रयागला त्रिवेणीच्या संगमात रामानुजांना जलसमाधी द्यावी, असे ठरविले परंतु हे खलबत गुप्त राहिले नाही. ते गोविंदाला कळले. गोविंदाने अत्यंत प्रिय मित्र असलेल्या आपल्या मावसभावाला म्हणजे रामानुजांना, कोणालाही न कळू देता हे संकट सांगून पळ काढावयास लावले. रामानुजांनी पळ काढला. बऱ्याच वेळाने रामानुज दिसेनात म्हणून यादवप्रकाशांनी शोध सुरू केला, पत्ता लागला नाही. रामानुज आडवाटेने जंगलांमधून दक्षिणेकडे निघाले. फार हाल झाले नशिबाने पारध्याचे कुटुंब जंगलात भेटले. त्या कुटुंबाने कांचीपुरीपर्यंत मार्गदर्शन करीत त्यांना सोबत केली. या संकटातून रामानुज उत्तीर्ण झाले. कांचीपुरीत कांचीपूर्ण या संतांना भेटले. कांचीपूर्णांनी सांगितले, की यादवप्रकाशांबद्दलचा राग मनातून काढून टाक. ही घटना सुचवते, की तुझ्यावर देवाची कृपा आहे. कालांतराने यादवप्रकाशही यात्रा संपवून सुखरूप परतले.
शिक्षण चालू असतानाच रामानुजांची एक प्रज्ञावंत, प्रतिभाशाली तत्त्वज्ञ म्हणून कांचीपुरीमध्ये ख्याती झाली. ही कीर्ती श्रीरंगम् येथील वैष्णव भक्त यामुनाचार्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांना हेही कळले, की अद्वैतसिद्धांतापेक्षा द्वैतसिद्धांतच म्हणजे जीव आणि ईश्वर हे एक नव्हेत हा सिद्धांत, उपनिषदांद्वारे रामानुज सिद्ध करतात त्यामुळे यादवप्रकाशांपासून त्यांना दूर व्हावे लागले. रामानुज हे विष्णुकथा आणि कीर्तन यांच्यामध्ये पूर्ण रममाण होतात, वैष्णव भक्तांचे भाव भजनरंगी रंगत असताना त्यांच्यात स्पष्ट दिसतात, गहिवरून येतात, रोमांचित होऊन अश्रुपात होतो, भोवतालच्या जगाचे भान नाहीसे होते आणि सर्व जग त्यांना विष्णुमय दिसते. ही सगळी हकीकत कांचीपूर्णांनी यामुनाचार्यांना निवेदन केली. आचार्य यामुनांनी यादवप्रकाशांच्या शिष्यांच्या मेळाव्यात रामानुजांना पाहिले होते. भेट घेतली नाही पण आशीर्वाद देऊन ते श्रीरंगम्ला परतले.
यादवप्रकाशांशी उपनिषदांच्या अर्थासंबंधी पदोपदी मतभेद व्हायला लागल्यामुळे यादवप्रकाशांनी रामानुजांना आपली पाठशाळा बंद केली. तेव्हापासून कांची येथे हस्तिशैलावरील नारायणाच्या पूजेमध्ये ते रममाण झाले. तेथे नारायण मंदिरातच यामुनाचार्यांचे शिष्य, रामानुजांचे मामा, महापूर्ण यांच्या मुखातून यामुनांचे स्तोत्ररत्न रामानुजांच्या श्रवणपथावर आले. वैष्णव संप्रदायाचे म्हणजे आळवारांचे भक्तियोग आणि प्रपत्ती यांसंबंधांचे विचार सतत ऐकावयास मिळू लागले. म्हणून यामुनांचे दर्शन घेण्याकरता त्यांना उत्कंठा लागली. रामानुज महापूर्णांबरोबर श्रीरंगम् येथे यामुनाचार्यांचे दर्शन घेण्याकरिता त्यांच्या निवासस्थानी गेले परंतु त्यावेळी नेमकी यामुनाचार्यांची जीवनज्योती मालवली होती. अंत्येष्टी व्हावयाची होती. देहाचे दर्शन झाले. रामानुजांना देहाचे दर्शन घेत असताना उजव्या हाताची तीन अंगुले मिटलेली दिसली. त्याचा गूढार्थ उमगला. ती मिटलेली तीन बोटे तीन अपेक्षा सूचित करीत होती : (१) जनतेला आळवार संतांचा वैष्णव मार्ग शिकविण्याकरिता द्राविड वेद म्हणजे आळवारांचे दिव्य प्रबंधम् शिकवायचे आणि प्रपत्तीचा सिद्धांत जनमनावर बिंबवायचा (२) वैष्णव संप्रदायाप्रमाणे विशिष्टाद्वैतवादी भाष्य ब्रह्मसूत्रावर लिहावयाचे आणि (३) वैष्णव संप्रदायाच्या स्पष्टीकरणाचे अनेक ‘प्रबंध’ स्वतः व पराशरादी शिष्यांच्या द्वारे निर्माण करावयाचे. या तिन्ही अपेक्षा पूर्ण करीन, असे रामानुजांनी यामुनाचार्यांच्या शवापुढे जाहीर केल्याबरोबर मिटलेली तिन्ही बोटे सरळ झाली. रामानुज कांचीला परतले. तेथे यामुनांचे शिष्य कांचीपूर्ण यांच्या सहवासात काळ घालवू लागले. कांचीपूर्ण शूद्र होते. तरी त्यांच्यापाशी वैष्णव दीक्षेची रामानुजांनी मागणी केली. कांचीपूर्णांनी ‘मी शूद्र आहे, मी ब्राह्मणाला दीक्षा देऊन त्याचा गुरू बनू शकत नाही’ असे सांगितले. रामानुजांना हे केव्हाच पटले नाही. कांचीपूर्णांना ते गुरू मानून त्यांच्या संगतीत राहू लागले. नंतर श्रीरंगम्ला जाऊन तेथे वैष्णव संप्रदायाची दीक्षा महापूर्णांपासून प्राप्त करून घेतली. या दीक्षाविधीचे पाच भाग म्हणजे पाच संस्कार आहेत. ताप, पुण्ड्र, नाम, मंत्र आणि याग हे ते पाच संस्कार होत. कपाळ आणि बाहू यांच्यावर तप्तमुद्रा, मस्तकावर आणि बाहूंवर चंदनाचा उभा लेप, नवे नामधारण, मंत्रग्रहण आणि याग म्हणजे हवन करावयाचे. पंचसंस्कार झाल्यावर महापूर्ण आणि रामानुज हे दोघेही सहकुटुंब एकत्र राहू लागले. रामानुजांची पत्नी सुंदर पण घमेंडखोर होती. ती महापूर्णांच्या पत्नीशी भांडायला लागली. कुणी दारात भिक्षुक आला, तर ती त्याचा कित्येक वेळ सत्कार न करता तिरस्कार करीत असे. ती सोवळेओवळे व जातिभेद कडक रीतीने पाळत होती पण रामानुजांना ते सर्व अमान्य होते. रामानुजांच्या लक्षात आले, की या पत्नीबरोबर आदर्शरूपात गृहस्थाश्रम चालवता येणार नाही म्हणून ऐन उमेदीतच सुमारे ३२ व्या वर्षी, पत्नीला युक्तिप्रयुक्तीने त्यांनी माहेरी कायम पाठविले आणि संन्यास घेतला. यादवप्रकाशांच्या कानावर ही संन्यासाची वार्ता गेल्यावर तेच रामानुजांचे शिष्य बनले. पंचसंस्कारांमध्ये ‘गोविंददास’ असे अभिधान यादवप्रकाशांना दीक्षेच्या वेळी रामानुजांनी दिले. गोष्ठीपूर्णनामक एक वैष्णव संत होते. रामानुज त्यांच्याही चरणाशी बसून काही गूढ आध्यात्मिक सिद्धांत आणि मंत्र शिकले. ‘नमो भगवते वासुदेवाय’ इ. मंत्र कोणाला ऐकू जाऊ नयेत, असा मंत्रोपदेश करणाऱ्या गुरूंचा निर्बंध होता. हा निर्बंध रामानुजांना पूर्ण अमान्य होता. ते मोठ्या मंदिरांच्या गच्चीवरून उच्च तारस्वराने मंत्रोच्चार करीत भजन करू लागले. त्या भजनात जातपात न मानता जनता सामील होऊ लागली. योगमार्गातील ही गुप्ततेची प्रथा रामानुजांनी मोडली. तेव्हापासून भक्तिसंप्रदायातील भजनांमध्ये उच्च स्वराने मंत्रजप होऊ लागला. शंकराचार्यांप्रमाणेच रामानुज अद्वैती पंडितांशी वादसभा करून विजय मिळवू लागले. यज्ञमूर्ती नावाच्या अद्वैती विद्वानाशी त्यांनी अनेक दिवस वाद करून त्याला विशिष्टाद्वैती वैष्णव संप्रदायाचा अंगिकार करावयास लावला.
ब्रह्मसूत्रावरची शंकराचार्य पूर्वकालीन मायावादी नसलेली भाष्ये वा टीका यांचे अध्ययन करून नवे भाष्य लिहावे, असा विचार करून रामानुज बोधायनवृत्ति नावाचे ब्रह्मसूत्रभाष्य मिळवण्याकरता काश्मीरला गेले. तेथील शारदा मठात बोधायनवृत्ति आहे, असे कळले होते. आपल्या बरोबर त्यांनी कुरेश वा कूरनाथ या शिष्याला घेतले. कारण त्याची स्मरणशक्ती उत्कृष्ट एकपाठी होती. ग्रंथ मिळाला नाही, तरी ग्रंथ वाचून तेथल्या तेथे परत करावयाचा, असे मनाशी ठरविले होते. कुरेशालाच श्रीवत्सांकमिश्रही म्हणत. अनेक रात्री जागून कुरेशाने बोधायनवृत्तीचे अध्ययन केले. शारदा मठाचे ग्रंथपाल बोधायनवृत्तीची पोथी देण्यास तयार नव्हते. त्यांनी ती परत मागून घेतली. रामानुजांनी त्या बोधायनवृत्तीचे सार ध्यानात धरून श्रीभाष्यास प्रारंभ केला. कुरेशाला ते तोंडाने सांगत आणि कुरेश लिहीत असे. कुरेशाच्या स्मरणशक्तीचा प्रत्यय भाष्य सांगत असताना रामानुजांना पदोपदी येऊ लागला आणि त्यांनी श्रीभाष्य पूर्ण केले. वेदान्तदीप आणि वेदान्तसार या ब्रह्मसूत्रभाष्यावरील संक्षिप्त टीकासुद्धा रामानुजांनी लिहिल्या. वेदार्थसंग्रह, ‘गद्यत्रय’ (शरणागति-गद्य, श्रीरंग-गद्य आणि श्रीवैकुंठ-गद्य) व भगवद्आराधनाकर्मावर नित्यग्रंथ हे स्वतंत्र निबंध आणि गीताभाष्य त्यांनी लिहिले. रामानुजांनी उपनिषदांवर भाष्य लिहिले नाही. त्यांच्या संप्रदायातील रंगरामानुज या पंडिताने विशिष्टाद्वैतमताप्रमाणे उपनिषदांवर टीका लिहिल्या.
वैष्णव संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे आणि भक्तियोगाचे तर्कशुद्ध विवेचन केल्यानंतर प्रथम दक्षिणेच्या आणि त्यानंतर उत्तरेच्या विजययात्रा रामानुजांनी केल्या. नंतर श्रीरंगम् येथे ते परतले. त्या वेळी तेथे पहिला कुलोत्तुंग किंवा कृमिकंठ (कार. १०७० – ११२०) हा चोल राजा राज्य करीत होता. तो कट्टर शैवपंथी आणि वैष्णवांचा द्वेष्टा होता. त्याने महापूर्ण आणि कुरेश यांच्या डोळ्यांना इजा करून अंध केले. श्रीरंगम्हून संन्यासवेष टाकून साध्या वेषात रामानुज बाहेर पडले. त्यांनी होयसळवंशी बिट्टिदेव या जैन राजाला वैष्णव दीक्षा दिली आणि विष्णुवर्धनदेव असे त्याचे नवे नामकरण केले. या राजाच्या मदतीने मेलकोटे येथे मंदिर बांधून तेथे बारा वर्षे वसती केली. श्रीरंगम्चा चोल राजा पहिला कुलोत्तुंग निवर्तल्यावर रामानुजाचार्य श्रीरंगम्ला परत आले. तेथेच ११३७ मध्ये (माघ शुद्ध दशमी शके १०५९) त्यांनी अखेरची समाधी घेतली. रामानुजांचा जीवनकाल १२० वर्षांचा आहे.
या दीर्घ जीवनकालात शेकडो शिष्य त्यांना मिळाले. त्यांनी वैष्णव भक्तिमार्गाचा संप्रदाय देशभर प्रसृत केला पिढ्यानपिढ्या आतापर्यंत तो चालू राहिला. जैन व बौद्ध जनांना संप्रदायात त्यांनी समाविष्ट केले. ते स्वतः शूद्र गुरूंचे शिष्य बनले. ते अस्पृश्य मित्रांच्या झोपडीमध्येही दीर्घकालपर्यंत परमार्थचर्चेत काळ घालवीत होते. ७४ मठांच्या पीठांवर त्यांचे पूजोत्सव, अभिषेक झाले. ७०० गोसावी, १२,००० संन्यासी, ३०० संन्यासिनी त्यांच्या अनुयायांमध्ये होत्या. अनेक राजे व धनिक यांच्या शिष्यगणांमध्ये समाविष्ट झाले होते. कुरेश, दाशरथी, नडाडूर अम्माळ आणि पराशर भट्ट हे त्यांचे पंडित शिष्य शास्त्रार्थचर्चेत पुढाकार घेऊन शंकासमाधान करीत. धार्मिक कर्मकांड एका शिष्याकडे, दुसऱ्या शिष्याकडे मुदपाकखाना, तिसऱ्याकडे द्रव्यनिधी, चवथ्याकडे भोजनालय अशा प्रकारे या श्रेष्ठ पारमार्थिक आचार्यांचे धर्मपीठ मोठ्या इतमामाने या दीर्घ जीवनात चालू राहिले.[१]
संदर्भ
- ^ "रामानुजाचार्य". ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.