रामदेव
राम किसन यादव ( १९६५), हे एक भारतीय योगगुरू आणि उद्योगपती आहेत. अनुयायांमध्ये बाबा रामदेव म्हणूनही ओळखले जातात.[१][२] ते प्रामुख्याने योग आणि आयुर्वेद भारतात लोकप्रिय करण्यासाठी ओळखले जातात. रामदेव 2002 पासून मोठ्या योग शिबिरांचे आयोजन आणि आयोजन करत आहेत. विविध टीव्ही चॅनेलवर त्यांचे योग वर्ग प्रसारित करत आहेत. त्यांनी त्यांचे सहकारी बाळकृष्ण यांच्यासोबत पतंजली आयुर्वेद लिमिटेडची सह-स्थापना केली.
2010 मध्ये, त्यांनी 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. परंतु, अलीकडे ते भाजप या सत्ताधारी पक्षाचे समर्थक बनले आहेत. आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून ते नेहमी भाजप सरकारची बाजू मांडून समर्थन करत असतात.[३][४] त्यासाठी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते.
राजकारण आणि चालू घडामोडींवर ते भाष्य करत असतात. अलीकडे त्यांनी कोरोना विषाणूवर औषध शोधल्याचा दावा केला होता.[५][६] पण नंतर ते पूर्णपणे बदलले. त्यांच्या या खोट्या दाव्यासाठी प्रचंड टीका झाली.
त्यांनी नवीन वैद्यकीय शास्त्र (ऍलोपथी) हे "बावळट विज्ञान" आहे असे वक्तव्य केले होते.[७] (त्यांचे मूळ शब्द: "Stupid Science" होते). यावरही त्यांच्यावर देशभर टीका झाली. तसेच आय.एम्.ए कडून रामदेववर कडक कारवाई करण्याची मागणी केली गेली. नंतर उत्तर देताना रामदेव म्हणाले, "त्यांचा बाप पण मला अटक करु शकत नाही."[८] अनेक डॉक्टरांनी तीव्र निषेध केला. एकूण प्रकरणावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.[९]
कार्य
आपले कार्य पार पाडण्यासाठी यांनी चार विश्वस्त संस्था स्थापन केल्या आहेत.
- दिव्य योग मंदिर ट्रस्ट
- पतंजली योग विद्यापीठाची स्थापना (पतंजली योग पीठ ट्रस्ट)
- भारत स्वाभिमान या संघटनेची स्थापना (भारत स्वाभिमान ट्रस्ट)
- आचार्यकुल शिक्षा संस्थान
सत्याग्रह
भारतातील भ्रष्टाचार आणि काळ्या संपत्तीच्या विरोधात योगगुरू स्वामी रामदेव यांनी दिल्ली येथे ४ जून २०११ रोजी सत्याग्रह केला. त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे होत्या.
- 'टॅक्स हेवन' देशांमध्ये ठेवलेल्या भारतीयांचा काळा पैसा परत आणून त्याचा समावेश राष्ट्रीय संपत्तीमध्ये करावा.
- काळा पैसा परकीय बँकांमध्ये साठवणाऱ्यांना राजद्रोही म्हणून जाहीर करावे आणि तो राष्ट्रीय गुन्हा मानण्यात यावा.
- भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्यांना फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी.
- देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल विधेयक.
- भ्रष्टाचाराचे खटले चालवण्यासाठी सर्व राज्यांमध्ये जलद न्यायालये सुरू करण्यात यावीत. तरच कोट्यवधी खटले मार्गी लागू शकतील
- मोठ्या रकमेच्या चलनी नोटा अर्थव्यवहारातून काढून टाकण्यात याव्यात. कारण १०० लाख कोटी रुपयांचा काळा पैसा देशात आहे तो केवळ एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांमुळे. देशातील ८० कोटी लोकांचे रोजचे उत्पन्न जेमतेम २० रुपये असताना अशा नोटांची गरजच काय?
- इंजिनिअरिंग, वैद्यकशास्त्र आणि शेतकी या विषयांचा अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये असावा.
- भूसंपादनाचा कायदा रद्द करावा. गरीब शेतकऱ्यांची लुट करणारा ब्रिटीशांनी आणलेला हा कायदा बदलून शेतकऱ्यांच्या हिताचा व्हावा.
- देशाच्या पंतप्रधानांची निवड थेट लोकांमधून करण्यात यावी. त्यामुळे देशहिताचे प्रश्न मार्गी लागून पक्षीय राजकारणाला चाप बसेल.
- जनतेला सरकारी सेवा मिळणे हा त्यांच हक्क आहे. एखाद्या व्यक्तीला सरकारी अधिकाऱ्याने विशिष्ट काळात आवश्यक ती सेवा दिली नाही, तर संबंधित अधिकारी दंडास पात्र ठरावा.
रामदेवाबाबांचे आधुनिक हिंदुत्व
‘भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे, पण काही लोकांनी तिला बदनाम केले. ज्यांना धर्माचे काही माहीत नाही असे लोक धर्माचा प्रचार करतात. मी धर्म मानतो, पण पाखंड मानत नाही. अनेक लोक राशीभविष्य आणि हस्तरेखांना फार महत्त्व देतात. मी आजवर कधीही मुहूर्त पाहिला नाही. जे केले तोच शुभमुहूर्त होता,’ असे ते म्हणतात.
‘राम आणि रावण, कृष्ण आणि कंस यांच्या राशी एक होत्या. तसेच रामदेव आणि राहुल गांधी यांचीही राशी एक आहे. माझ्या हातावर भाग्यरेखा नसूनही मी अनेकांचे भाग्य बदलले आहे. भूत-प्रेत, शनी, राहू, केतू हे फक्त आपल्यालाच का, आणि चीन, अमेरिका, पाकिस्तान यांना ते का नाहीत? ते असतीलच तर सीमा सुरक्षा दलाऐवजी भुताखेतांचाच वापर करायला हवा. आपण फार अंधविश्वासी असतो. धर्माच्या नावावर याचा धंदा केला जातो. पृथ्वी, सूर्य, चंद्र देवाने बनवले आहे मग त्यांच्यामुळेच बनलेला काळ हा अशुभ कसा असेल! भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे, पण काही बाबा कृपा करण्याचा धंदा चालवतात. धर्मात कधीही अवैज्ञानिकता नव्हती.’ संपूर्ण जीवन हाच योग असून आपण एकाग्रतापूर्वक जे करू तो योग’, असेही रामदेव बाबांनी एका भाषणात सांगितले.
रामदेवबाबांचे भारत-पाकिस्तान संबंधांवर विचार
‘पाकिस्तानमध्ये गरिबी आहे. ही गरिबी दूर झाली तर भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्वही नष्ट होईल,’ असे मत रामदेव बाबा यांचे मत आहे. पाकिस्तानमध्ये योग शिकवण्यासाठी जाणाण्याचा त्यांचा विचार आहे. त्याचप्रमाणे ‘यापुढे पाकिस्तानबरोबरच नेपाळ, बांगलादेश आणि आफ्रिका या देशांमध्येही पतंजलीची उत्पादने उपलब्ध होतील,’ अशी घोषणाही त्यांनी केली. रामदेवबाबा म्हणाले, ‘पतंजलीची जीन्स देखील येणार का असा प्रश्न हल्ली मला विचारला जातो. पतंजलीची जीन्स का नसावी? विदेशी कंपन्या भारतात येऊन १ रुपया गुंतवतात आणि शंभर रुपये घेऊन जातात. परदेशी कंपन्या त्यांच्याकडे तंत्रज्ञान असल्याचे सांगून आपल्याला मूर्ख बनवतात. तेल, शाम्पू, साबण तयार करण्यासाठी असे काय तंत्रज्ञान लागते? त्यांच्याकडे तंत्रज्ञान असेलच तर ते घेऊ पण उत्पादन भारतातच करू. पतंजलीने आतापर्यंत १ लाख तरुणांना रोजगार दिला असून पुढील पाच वर्षांत १ लाख कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे.’
पतंजली उद्योग
सुरुवातीला फक्त आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या पतंजली उद्योगाने आता घरोघरी वापररल्या जाणाऱ्या साबण, दंतमंजन यांसारख्या सर्वच वस्तूंचे उत्पादन करायला सुरुवात केली. इ.स. २०१२ ते २०१६ या ४ वर्षांमध्ये पतंजली उद्योगसमूहाने सतत वार्षिक १०० टक्क्यांची वाढ केली आहे. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये हे उत्पादन ५० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढून २०२० सालापर्यंत ते एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
पतंजली उद्योगसमूह
पतंजली आयुर्वेद या उद्योग समूहाने जवळपास १०० हुन अधिक गृहोपयोगी वस्तू बाजारात आणल्या.
संदर्भ
- ^ "How Baba Ramdev became the guru of yoga programming on Indian TV-Living News , Firstpost". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2017-07-31. 2022-01-02 रोजी पाहिले.
- ^ "HT Editorial: Not Ayurveda vs allopathy". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-05-25. 2022-01-02 रोजी पाहिले.
- ^ Worth, Robert F. (2018-07-26). "The Billionaire Yogi Behind Modi's Rise" (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331.
- ^ "Politics and religion: As BJP government rises, so does yoga tycoon Baba Ramdev". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-05-24. 2022-01-02 रोजी पाहिले.
- ^ Kumar, Ravi Prakash (2020-06-23). "Coronavirus treatment: Ramdev's Patanjali launches Coronil kit for ₹545". mint (इंग्रजी भाषेत). 2022-01-02 रोजी पाहिले.
- ^ "Ramdev's First Corona Treatment Medicine Launched". Media Today Chronicle (इंग्रजी भाषेत). 2020-06-26. 2022-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-02 रोजी पाहिले.
- ^ "DMA demands FIR against Ramdev". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-05-23. 2022-01-02 रोजी पाहिले.
- ^ "Even their father cannot arrest me: Ramdev in another video" (इंग्रजी भाषेत). PTI. Dehradun:. 2021-05-27. ISSN 0971-751X.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: others (link)
- ^ "Yoga guru Ramdev withdraws comments on allopathic medicine after furore". Business Standard (इंग्रजी भाषेत). 2022-01-02 रोजी पाहिले.
- बाबांच्या मागण्या.. Archived 2011-06-08 at the Wayback Machine.