रामदास कामत
रामदास शांताराम कामत ( १८ फेब्रुवारी, १९३१, मृत्यू: ८ जानेवारी २०२२, विलेपार्ले [१]) हे संगीत नाटकांत काम करणारे एक मराठी गायक नाट्यअभिनेते आणि संगीत शिक्षक होते. नाट्यगीतांखेरीज त्यांनी अनेक भक्तिगीते, स्तोत्रे आणि भावगीतेही गायली आहेत. इ.स. २००९ साली बीड येथे भरलेल्या ८९व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद रामदास कामत यांनी भूषविले होते.
रामदास कामत मूळचे गोव्यातील साखळी गावातले. १९३८ साली पुराचा फटका गावाला बसला, तेव्हा मदतनिधीसाठी गोवेकरांनी 'बेबंदशाही' नाटक करावयाचे ठरवले. त्यात कामतांनी आपल्या आयुष्यातली पहिली भूमिका करताना दोन पदेही सादर केली. पुढे कामत मुंबईला येऊन अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. पण त्यांच्या मनात गाणे कायम रुंजी घालत होते. तरी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही. नोकरी सांभाळूनच ते आकाशवाणीवर गात आणि जमेल तेव्हा संगीत नाटकांत कामे करीत.
कारकीर्द
१९६४मध्ये आलेल्या 'मत्स्यगंधा' नाटकाने रामदास कामत यांचे नाव घराघरांत पोहोचले आणि पुढे ते गायक अभिनेते म्हणूनच प्रसिद्धीस आले. पाठोपाठ नाटक 'ययाती देवयानी' आले आणि 'सर्वात्मका सर्वेश्वरा...' ही त्यांची प्रार्थना अजरामर झाली. पुढे 'धन्य ते गायनी कळा', 'मीरामधुरा', 'हे बंध रेशमाचे' अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका व पदे गाजली. पण 'मुंबईचा जावई' चित्रपटातील 'प्रथम तुज पाहता...' या त्यांच्या गीताने मात्र लोकप्रियतेचा कळस गाठला.
१९६० च्या दशकात वसंत कानेटकर यांचे 'मत्स्यगंधा' नाटक आले आणि त्या पाठोपाठ वि. वा. शिरवाडकरांचे 'ययाती देवयानी'. या दोन नाटकांत कामत यांनी महत्त्वाच्या भूमिका तर केल्याच; 'नको विसरू संकेत मीलनाचा', 'देवाघरचे ज्ञात कुणाला', 'साद देती हिमशिखरे' व 'गुंतता हृदय हे...' ही त्यांची नाट्यगीते आकाशवाणीच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली. पण त्याचवेळी श्रीमती वीणा चिटको यांनी संगीतबद्ध केलेली 'पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव', 'अंबरातल्या निळ्या घनाची' आणि 'सखी सांज उगवली' अशी भावगीते गाऊन त्यांनी आपण केवळ शास्त्रीय संगीताची बैठक असलेली नाट्यगीतेच गाऊ शकतो, हा समज पुसून टाकला.
वयोपरत्वे १९९७ मध्ये त्यांनी रंगभूमीवरून 'निवृत्ती घेतली.
रामदास कामत यांची नाटके आणि त्यांत त्यांनी वठविलेल्या भूमिका
- एकच प्याला (रामलाल)
- कान्होपात्रा (विलासराव
- धन्य ते गायनी कळा (तानसेन)
- सं. मत्स्यगंधा (पराशर)
- मदनाची मंजिरी (सारंगधर)
- सं. मानापमान (धैर्यधर)
- मीरा मधुरा (भोज)
- मृच्छकटिक (चारुदत्त)
- ययाती आणि देवयानी (कच)
- सं. शारदा (कोदंड)
- संन्याशाचा संसार (डेव्हिड)
- संशयकल्लोळ (अश्विनशेठ, साधू)
- सं. सौभद्र (अर्जुन, कृष्ण, नारद)
- स्वरसम्राज्ञी (गंगाधर)
- होनाजी बाळा (होनाजी)
रामदास यांच्या आवाजातली भावगीते, चित्रपटगीते आणि नाट्यगीते
- अशी सखी सहचरी (कवी - वसंत कानेटकर; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - मीरा मधुरा; राग - मालकंस)
- आकाशी फुलला चांदण्याचा (कवी - वामन देशपांडे; संगीत - श्रीनिवास खळे; भावगीत)
- आनंद सुधा बरसे (कवी - कुसुमाग्रज; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - मीरा मधुरा; राग - नंद)
- आली प्रणय-चंद्रिका करी (कवी - विद्याधर गोखले; संगीत -राम मराठे, प्रभाकर भालेकर; नाटक - मदनाची मंजिरी
- अंबरातल्या निळ्या घनांची(कवयित्री - वीणा चिटको; संगीत - वीणा चिटको; भावगीत)
- काय वधिन मी ती सुमती (कवी - गोविंद बल्लाळ देवल; संगीत - गोविंद बल्लाळ देवल; नाटक - मृच्छकटिक; राग - आसावरी)
- गुंतता हृदय हे (कवी - वसंत कानेटकर; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - मत्स्यगंधा; राग - खमाज)
- चिरंजीव राहो जगी नाम (कवी - गोपाळकृष्ण भोबे; संगीत - भीमसेन जोशी; नाटक - धन्य ते गायनी कळा)
- चंद्र हवा घनविहीन (कवी - कुसुमाग्रज; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - मीरा मधुरा; राग - नायकी कानडा)
- जन विजन झालें आम्हां (कवी - संत तुकाराम; संगीत - यशवंत देव; राग - चंद्रकंस)
- ज्यावरिं मीं विश्वास ठेविला (कवी अण्णासाहेब किर्लोस्कर; संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर; नाटक सौभद्र)
- तम निशेचा सरला (कवी - कुसुमाग्रज; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - ययाती आणि देवयानी; राग - भैरवी)
- देवाघरचे ज्ञात कुणाला
- नको विसरू संकेत मीलनाचा
- ना साहवे विराणी (कवी - गंगाधर महांबरे; संगीत - वीणा चिटको; भावगीत)
- निर्गुणाचे भेटी
- पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव (कवी - गंगाधर महांबरे; संगीत - वीणा चिटको; भावगीत)
- प्रथम तुज पाहता
- प्रेमवरदान (कवी - कुसुमाग्रज; संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी; नाटक - ययाति आणि देवयानी; राग - गावती)
- प्रेम हे वंचिता
- बहुत दिन नच भेटलों
- मंगल ते प्रियधाम
- मजला कुठे न थारा
- मन माझे भुलले (कवयित्री - वीणा चिटको; संगीत - वीणा चिटको; भावगीत)
- मयूरा रे
- मी मानापमाना नच
- म्यां लोटिली संकटीं
- यतिमन मम मानित त्या
- या विराट गगनाखाली मी
- युवतिमना दारुण रण
- म्यां लोटिली संकटीं
- यतिमन मम मानित त्या
- या विराट गगनाखाली मी
- युवतिमना दारुण रण
- वाटे भल्या पहाटे यावे (कवी - गंगाधर महांबरे; संगीत - वीणा चिटको; भावगीत)
- वायुसंगे येई श्रावणा (कवी - गंगाधर महांबरे; संगीत - वीणा चिटको; भावगीत)
- विनायका हो सिद्धगणेशा
- विश्वनाट्य सूत्रधार
- शर लागला तुझा गे
- श्रीरंगा कमलाकांता
- सखी सांज उगवली (कवयित्री - वीणा चिटको; संगीत - वीणा चिटको; भावगीत)
- साद देती हिमशिखरे
- संगीतरस सुरस
- सांग प्रिये सांग प्रिये (कवयित्री - वीणा चिटको; संगीत - वीणा चिटको; भावगीत)
- स्वकर शपथ वचनिं
- स्वप्नात पाहिले जे ते राहू
- स्वार्थी जी प्रीति मनुजाची
- हरि ॐ प्रणव ओंकार
- हे आदिमा हे अंतिमा
- हे करुणाकरा ईश्वरा
- हे गणनायक सिद्धीविनायक (कवी - मा.दा. देवकाते; संगीत - बाळ पळसुले; चित्रपट - पटलं तर व्हय म्हणा)
- हे शिवशंकर गिरिजा तनया (कवी - मा.दा. देवकाते; संगीत - बाळ पळसुले;
चित्रपट - थापाड्या)
पुरस्कार आणि सन्मान
- रामदास कामत यांना २००८ सालच्या ’विष्णूदास भावे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- इ.स. २००९ साली बीड येथे भरलेल्या ८९व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद रामदास कामत यांनी भूषविले होते.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचे निधन". Loksatta. 2022-01-09 रोजी पाहिले.
(अपूर्ण)