Jump to content

रामचंद्र भिकाजी गुंजीकर

रामचंद्र भिकाजी गुंजीकर
जन्म नाव रामचंद्र भिकाजी गुंजीकर
जन्मएप्रिल १०, १८४३
जांबोटी, बेळगाव जिल्हा, कर्नाटक, भारत
मृत्यूजून १८, १९०१
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषामराठी
साहित्य प्रकार कादंबरी
नियतकालिक
अनुवादित साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृती विविधज्ञानविस्तार (संपादन)

रामचंद्र भिकाजी गुंजीकर (एप्रिल १०, १८४३, जांबोटी, बेळगांव जिल्हा - जून १८, १९०१, मुंबई) हे मराठी लेखक व संपादक होते.

'विविधज्ञानविस्तार" मासिकाचे आद्य संपादक. मराठीतील 'मोचनगड' या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक. मराठी लघुलिपीचे आद्य उत्पादक. प्राथमिक शिक्षण जांबोटी व बेळगांव येथे. मुंबईच्या एल्फ़िन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिक(१८६४) व त्याच हायस्कूलमध्ये शिक्षक(१८६७). १८८८ साली हुबळी ॲंग्लोव्हर्नाक्युलर शाळेत हेडमास्तर व १८९२ मध्ये बेळगांव जिल्ह्याचे असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर.

कॉलेजात असताना 'मित्रोदय' या वृत्तपत्रातून(१८६६) ते लेख लिहू लागले. इंग्लंडमधील 'एडिंबरो रिव्ह्यू' व 'क्वार्टर्ली रिव्ह्यू' या नियतकालिकांच्या धर्तीवर मासिक निघावे या विचाराने १८६७ मध्ये 'विविधज्ञानविस्तारा'ची स्थापना झाली. त्याचे गुंजीकर हे पहिले संपादक. पण सरकारी नोकरीमुळे त्यांचे नाव अंकावर छापण्यात आले नव्हते. पहिल्या अंकात संपादकांनी या मासिकाचे स्वरूप पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.: "याच्या परिमाणानुसार त्यात नानाविध विषयांचा संग्रह केला जाईल. शास्त्रीय विषय, देशज्ञान, विख्यात पुरुषांची चरित्रे, नवीन पुस्तकांचे गुणावगुणविवेचन, नीतिवादाचे निबंध इत्यादी अनेक विषयांचा संग्रह करणार आहोत." गुंजीकरांना मराठी, संस्कृत, इंग्रजीबरोबरच गुजराती, कानडी व बंगाली याही भाषा अवगत होत्या. त्यामुळे या वाचनाच्या बळावर ते अनेक नावीन्यपूर्ण व विविध माहिती सांगणारी सदरे सजवू शकले. पहिली सात वर्षे(१८६७-१८७४) त्यांनी सातत्याने व परिश्रमपूर्वक संपादन केले. अनेक व्यासंगी विद्वानांचे सहकार्य मिळवून उच्च दर्जाचे ज्ञानप्रसारक नियतकालिक असा लौकिक त्यांनी 'वि.ज्ञा.वि'ला मिळवून दिला. त्यांनी त्यात लिहिलेल्या लेखातील काही निवडक लेख, संकलित लेख, प्रथम खंड (१९४२) यात आले आहेत. 'मराठी भाषा', 'मराठी भाषेचे कोश', 'देशभाषांची दुर्दशा', 'आपल्या भाषेची स्थिती', 'आपल्या भाषेचे पुढे काय होणार?', 'मराठी कविता', 'काव्यविचार', 'व्याकरणविचार' आदि त्यातले लेख पाहिले म्हणजे त्यांचे सखोल विचार व तळमळ लक्षात येते. त्यांच्या चार स्नेह्यांनी मुंबईत सुरू केलेल्या(१० ऑक्टोबर, १८७१)'दंभहादक(?)' या मासिकासाठीही त्यांनी काही लेखन केले आहे. [ संदर्भ हवा ] नियतकालिकांसाठी चालण्याऱ्या लेखनाबरोबरच त्यांचे स्वतंत्र ग्रंथलेखनही चालू असे. त्यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे: मोचनगड (ऐतिहासिक कादंबरी, १८७१), गोदावरी (अपूर्ण), अभिज्ञान शाकुंतल (भाषांतर, १८७०), रोमकेतुविजया (शेक्सपिअरच्या 'रोमियो व ज्युलिएट'चे भाषांतर, १८७२), विद्यावृद्धीच्या कामी आमची अनास्था (व्याख्यान, १८८७), सरस्वती मंडळ (१८८४), भ्रमनिरास (१८८४), सौभाग्यरत्नमाला (१८८६), कौमुदीमहोत्साह, भाग-१ (भट्टोजी दीक्षित यांच्या 'सिद्धान्तकौमुदी' या व्याकरणग्रंथाचे भाषांतर, खंड १, २ ,३ --१८७७; ४, ५ --१८७८; भाग ६--१८७९), सुबोधचंद्रिका (भगवद्गीतेवरील मराठी टीका, १८८४), 'रामचंद्रिका', कन्नडपरिज्ञान (१८९५)लाघवी लिपी किंवा अतित्वरेने लिहिण्याची युक्ती (१८७८). [ संदर्भ हवा ]

त्यांचे भाषा, लिपी आदिसंबंधी लेख 'रामचंद्र भिकाजी गुंजीकर : संकलित लेख' संपादक अ.का.प्रियोळकर या ग्रंथात आले आहेत. भाषा, व्याकरण व लेखनशुद्धी हे गुंजीकरांच्या चिंतनाचे विषय होते. वाङ्‌मयक्षेत्रात वावरणाऱ्या अनेक समकालीनांना व उत्तरकालीनांना त्यांच्या लेखांनी विचारप्रवृत्त व कार्यप्रवृत्त केले. मोचनगडच्या रूपाने गुंजीकरांनी ऐतिहासिक कादंबरीचा एक उत्कृष्ट आदर्श निर्माण केला आहे. शिवाजीच्या उदयकालातील मराठ्यांचे जीवन व तत्कालीन वातावरण यांचे जिवंत चित्रण या कादंबरीत आढळते. गोदावरी पोर्तुगीजांच्या इतिहासाशी संबंधित अशी कादंबरी, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. [ संदर्भ हवा ]

रामचंद्र भिकाजी गुंजीकर हे तत्कालीन उल्लेखनीय साहित्यिक होते. विशेषतः मूळचे गोव्याचे असल्यामुळे त्यांनी गोव्यातील मराठी साहित्यात घातलेली भर फार मोलाची आहे.(?)