रामगड
सांगली जिल्ह्यामध्ये रामगड (रामदुर्ग) नावाचा एक अतिशय छोटा किल्ला आहे. किल्ल्याची उंची जेमेतेम १५० फूट आहे.
जत हा सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुका. याच तालुक्यात [[जत-कवठे महांकाळ रस्त्यावर जतपासून अवघ्या ५ किमी अंतरावर रामपूर नावाचे गाव आहे. या गावात एक छोटा, देखणा व अप्रसिद्ध किल्ला लपला आहे त्याचे नाव रामगड. रामपूर गावाच्या मागच्याच टेकडीवर हा छोटेखानी किल्ला आहे. ही टेकडी इतकी छोटी आहेत की टेकडी चढायला सुरुवात करेपर्यंत माणूस किल्ल्याच्या महादरवाज्यात येऊन पोहोचतो.
रामपूर गावाच्या मागे एक पाण्याची टाकी आहे तेथून अगदी पाचच मिनिटात रामगडाच्या ढासळलेल्या तटबंदीवरून किंवा प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करता येतो. येथील स्थानिकांना या किल्ल्याबद्दल कोणतीही आस्था दिसत नाही हे किल्याच्या दुरवस्थेवरूनच लक्षात येते. किल्ल्यामध्ये बाभळीचे भयंकर रान माजले आहे त्यामुळे येथे चालताना खूप काळजी घ्यावी लागते.
रामगड किल्ल्याचे प्रवेशद्वार सुस्थितीत असून तटबंदी मात्र बरीचशी ढासळली आहे. तटबंदीमधेच एक दरवाजा अगदी साधेपणाने बांधलेला आहे ज्याची कमान अजून तरी टिकून आहे. दरवाज्याच्या आतील पहारेकऱ्यांच्या देवड्या व पायऱ्या पूर्णपणे उद्धस्त झाल्या आहेत. गडाच्या डाव्या बाजूला तटबंदीमधून वेगळा असलेला एक उंच टेहळणी बुरूज आहे; त्यावर भगवे निशाण लावलेले आहे. या टेहाळणी बुरुजाव्यतिरिक्त या रामगड किल्ल्याला दुसरा कोणताही बुरूज नाही.
रामगडाच्या मागच्या बाजूस एक तलाव आहे. गडाची तटबंदी अगदी त्या तलावापर्यंत खाली बांधत नेलेली आढळते. याच ठिकाणी एक चोर दरवाजा व तलावापर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या दिसतात. मात्र बाभळीच्या प्रचंड झाडीमुळे खाली उतरता येत नाही.
रामगड किल्ल्यामध्ये वाड्याचे अथवा सदरेचे वाटावे असे काही अवशेष दिसतात. किल्ल्याच्या मध्यभागी एक सुंदर हेमाडपंती शिवमंदिर आहे. मंदिराला अर्धमंडप व गाभारा असून मंडपातील खांब घडीव दगडाचे आणि गोलाकार आहेत. मंदिराशेजारच्या बाभळीच्या झुडपात एक उखळ दडलेला आहे. गडाची तटबंदी ठिकठिकाणी ढासळली असली तरी या गडाचे अवशेष अजूनही पाहण्यासाखे आहेत.
रामगडाचा इतिहास
गडाचा इतिहास फारसा ज्ञात नाही पण शिवाजी महाराज इथे येऊन गेल्याचे स्थानिक आवर्जून सांगतात. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी आदिलशाहीवर केलेल्या अनेक बेधडक आणि धाडसी मोहिमांचा इतिहास पाहता या गडाला त्यांचेही वास्तव्य लाभले असण्याची शक्यता आहे. किल्ल्यावरील हेमाडपंती शिवमंदिर मात्र या टेकडीच्या किंवा या किल्ल्याच्या प्राचीनतेची साक्ष देते.
पहा : महाराष्ट्रातील किल्ले