Jump to content

राबिया बसरी

बसराची संत राबिया

इस्लामी लघुचित्रात चितारलेली राबिया
मूळ नावराबिया अल-बसरी
जन्मख्रिस्तपूर्व ७१३-७१७[काळ सुसंगतता?]
बसरा
निर्वाणख्रिस्तपूर्व ८०१[काळ सुसंगतता?]
माऊंट ऑफ ऑलिव्ज
संप्रदायसुफी संप्रदाय
गुरूहजरत हसन बसरी
भाषाअरबी

राबिया अल-बसरी (अरबी : رابعة البصري) (इ.स. ७१७ - इ.स. ८०१) ही मुस्लिम महिला संत आणि सुफी गूढवादी होती.

जीवन

राबियाचा जन्म हिजरी सन ९५ ते ९९ च्या दरम्यान झाला होता. तिच्या प्रारंभीच्या आयुष्याविषयीची माहिती फरिद अल-दिन अत्तार या नंतरच्या सुफी संत व कवीकडून मिळते. राबियाचे कोणतेही लिखित साहित्य उपलब्ध नाही. तिच्या कुटुंबातील ती चौथी कन्या असल्याने "चौथी" या अर्थाने तिला राबिया हे नाव मिळाले होते. तिचे कुटुंब गरीब असले तरी समाजात त्याला मान होता. अत्तारच्या वर्णनानुसार राबियाचे पालक इतके गरीब होते की दिवा लावण्यासाठी त्यांच्याकडे तेल नव्हते आणि राबियाला गुंडाळण्यासाठी त्यांच्याकडे कापडही नव्हते. राबियाच्या आईने आपल्या पतीस शेजाऱ्यांकडून तेल आणण्यास सांगितले पण त्याने निर्मात्याशिवाय इतर कुणाकडेही काहीही न मागण्याचा निश्चय केलेला होता. त्याने शेजाऱ्याच्या घरी जाण्याचे नाटक केले आणि रिकाम्या हाताने परत आला.

त्या रात्री प्रेषित मोहम्मद राबियाच्या वडिलांच्या स्वप्नात आला आणि प्रेषिताने सांगितले की, "तुझी नवजात कन्या ईश्वराची लाडकी आहे आणि अनेक मुस्लिमांना ती योग्य मार्ग दाखवील. तू बसराच्या अमिराकडे जावेस आणि पुढील संदेश लिहिलेले पत्र त्याला द्यावेस : 'तू पवित्र प्रेषितास रोज रात्री शंभर वेळा आणि गुरुवारी रात्री चारशे वेळा दुरूद अर्पितोस. मात्र, तुझा हा नियम मागच्या गुरुवारी चुकल्याने शिक्षा म्हणून पत्रधारकास तू चारशे दिनार द्यावेस.'"

राबियाचे वडील अमिराकडे गेले. आपल्यावर प्रेषिताचे लक्ष आहे, असे कळाल्याने खूष झालेल्या अमिराने गरिबांना १००० दिनार वाटले आणि राबियाच्या वडिलांना ४०० दिनार दिले. कशाचीही गरज भासल्यास आपल्याकडे यावे असेही अमिराने त्यांना सांगितले.

राबियाच्या वडलांच्या मृत्यूनंतर बसरात दुष्काळ पडला आणि राबिया बहिणींपासून दूर झाली. आख्यायिकेनुसार राबिया ज्या काफिल्यासोबत होती तो काफिला लुटारूंच्या हाती लागला. लुटारूंच्या प्रमुखाने राबियाला पकडून गुलाम म्हणून विकले. राबियाच्या नव्या मालकाने तिला राबवून घेण्यास सुरुवात केली. घरातील कामे संपल्यावर रात्रभर ती प्रार्थना करी. एका मध्यरात्री प्रार्थना करणाऱ्या राबियाचा आवाज मालकाने ऐकला : "ईश्वरा! तुला ठाऊकच आहे की तुझ्या आज्ञा पाळण्याची माझी तीव्र इच्छा आहे. मोकळीक असती तर दिवसरात्र मी तुझी प्रार्थना केली असती. तू मला एका मनुष्याची दासी बनविले आहेस तर मी काय करू?"

यानंतर मालकाने राबियाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि सकाळी तिला तसे सांगितले. एकांतवासात पूजा करण्यासाठी राबियाने घर सोडले. प्रार्थनेसाठी वाळवंटात जाऊन राबिया वैरागी बनली. हजरत हसन बसरी हे तिचे मुर्शिद (सुफी गुरू) होते. एक तुटका जग, जुनी चटई आणि उशी म्हणून वापरात असलेली वीट याव्यतिरिक्त राबियाकडे काहीही नव्हते. वाढत्या प्रसिद्धीबरोबर राबियाला शिष्य मिळाले. तत्कालीन अनेक धार्मिक प्रमुखांशी तिच्या चर्चा झाल्या. तिला विवाहाचे अनेक प्रस्ताव आले पण तिने ते मान्य केले नाहीत.

दैवी प्रेम ही संकल्पना प्रत्यक्ष सर्वप्रथम राबियानेच मांडली. ईश्वरावर प्रेम ईश्वराखातरच केले पाहिजे, आधीच्या सुफींप्रमाणे भीतीखातर नव्हे अशी नवी कल्पना राबियाने मांडली. पश्चात्ताप ही ईश्वराने दिलेली देणगी आहे असे तिचे मत होते.

राबियाची एक प्रार्थना अशी आहे :

"ईश्वरा! नरकाच्या भयाने मी तुला पूजिले तर मला नरकात जाळ,

स्वर्गाच्या आशेने मी तुला पूजिले, तर मला स्वर्गातून काढून टाक,
पण तुझ्याच खातर मी तुझी पूजा केली तर

तुझे शाश्वत लावण्य देण्यास कुरकूर करू नकोस."

तत्त्वज्ञान

दैवी प्रेमाचे तत्त्व सर्वप्रथम मांडण्याचा मान राबियाला जातो. तिचे मानले जाणारे बरेचसे काव्य अज्ञात उगमाचे आहे. कष्टमय आयुष्यानंतर अकस्मात तिला आत्म-साक्षात्कार झाला. शेख हसन अल-बसरीने तिला असा प्रश्न केला की, तिला हे गुपित कसे कळाले; तेव्हा ती म्हणाली : "कसेचे ज्ञान तुम्हाला आहे पण मला न-कसेचे ज्ञान आहे."

चातुर्याच्या गोष्टी

  • एके दिवशी बसराच्या रस्त्यांवरून एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात पाण्याची बादली घेऊन राबिया धावत होती. ती काय करीत आहे, असे विचारल्यावर तिने सांगितले : "मला नरकाच्या आगी विझवायच्या आहेत आणि स्वर्गाची बक्षिसे जाळायची आहेत. या दोहोंमुळे ईश्वराचा रस्ता अडतो."
  • राबिया प्रवचनाला न आल्यास हसन बसरी प्रवचनच देत नसत. यामागचे कारण देताना ते म्हणतात, "हत्तींसाठी ज्या पात्रांमध्ये औषध ठेवलेले आहे त्याच पात्रांमध्ये मुंग्यांसाठीचे औषध असू शकत नाही."

संदर्भ

इंग्रजी विकिपिडियावरील लेख [१]