रानपिंगळा
रानपिंगळा किंवा वनपिंगळा (शास्त्रीय नाव: Athene blewitti अथेनी ब्लुइटी ; इंग्लिश: Forest Owlet, फॉरेस्ट औलेट;) हा पक्षी भारतातील महाराष्ट्र, व मध्य प्रदेश या राज्यात खूप मोठ्या प्रमाणात आढळत असे, पण आता विविध कारणास्तव तो दिसेनासा झाला आहे. अलीकडेच पक्षी अभ्यासकांच्या एका टीमने याचा शोध घेतला असता तो नंदुरबार जिल्ह्यात व मेळघाट अभयारण्यात केवळ २०० ते ३०० एवढ्याच संख्येने आढळला.[१]
वर्णन
रानपिंगळा हा पक्षी साधारणतः मध्यम आकाराचा असतो. त्याचे डोळे पिवळ्या रंगाचे असतात, याची चोच बाकदार, शिकार पकडण्यासाठी आणि मांस फाडण्यासाठी उपयुक्त, तर पाठीचा रंग राखाडी व पोटाचा भाग पांढऱ्या रंगाचा असतो. सर्व घुबडांप्रमाणेच रानपिंगळा सुद्धा आपली मान दोन्ही बाजूंनी १८० अंश फिरवू शकतो, यामुळे एकाच जागी बसला असतांनाही तो क्षणात त्याच्या मागे काय घडत आहे ते पाहू शकतो. अंधारात राहण्यासाठी कान आणि डोळे अनुकूल झाले असल्याने लहानात लहान आवाजाच्या दिशेनेही पिंगळा पक्षी रोखून पाहतो.नर-मादी दिसायला सारखेच असतात.[ संदर्भ हवा ]
खर्गला म्हणून संस्कृत या भाषेत ओळखला जाणारा हा पक्षी दिसायला शिंगी डुमासारखा, पण आकाराने मोठा व आखूड शेपटीचा असतो. तो पानगळीच्या आर्द्र जंगलात व ओढ्यानजीकच्या जुन्या आमरायांत आढळतो. पश्चिम खानदेश, सूरत, डांग, सातपुड्यापासून पूर्वीय मध्य प्रदेश व ओरिसातील संबलपूर जिल्ह्यात तो दिसतो अशी माहिती मारुती चितमपल्लींच्या पक्षिकोशावरून मिळते, पण आता हा पक्षी संकटात आहे. हा पक्षी पिंगळा गटातील अन्य पक्ष्यांप्रमाणे केवळ रात्रीच संचार करीत नाही, तर त्याला दिवसाही दिसते. तो निर्भयपणे इकडे तिकडे जंगलात, माळरानावर, ओढे-नद्यांकाठी फिरतो. पण त्याचा हाच गुण त्याच्या नाशाला कारण ठरत आहे. कारण इतर पिंगळ्यांना जसे अंधाराचे संरक्षण मिळते तसे ते याला मिळत नाही. दिवसाउजेडी तो एखाद्या छोट्या मोठ्या शिकाऱ्याकडून सहजी मारला जातो. तसेच या पक्ष्याच्या मांसाविषयी खवैयांमध्ये बरेच समज-अपसमज आहेत. त्यामुळे बाजारातही त्याला एकेकाळी खूप मागणी होती. आता हा पक्षीच संपत आला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या पक्षी अभ्यासकांच्या निरीक्षणात हा पक्षी सापडल्याची नोंद नाही, पण १९९७ साली प्रथमच तो दिसला.[ संदर्भ हवा ]
वास्तव्य
रानपिंगळा हा पक्षी जगात फक्त मध्य भारतातील सातपुडा पर्वत रांगातील पानगळीच्या विरळ जंगलात सापडतो. वनपिंगळा हा निशाचर पक्षी आहे. दिवसा जुन्या आमरायांमध्ये, झाडांच्या ढोलीत तसेच संधी असल्यास, जुन्या मोठाल्या घरातील छताच्या आश्रयाने राहणे पसंत करतो. घनदाट वृक्षांच्या परिसरात पिंगळा कमी आढळतो.[२]
श्रद्धा-अंधश्रद्धा
भारतामध्ये रानपिंगळाला अशुभ समजले जाते. त्यांचा कर्कश ओरडण्याने या पक्षाला अशुभ मानले जाते. पूर्व भारतात व पश्चिम बंगालमध्ये वनपिंगळाला लक्ष्मीचे वाहन समजतात.[ संदर्भ हवा ]
राज्यपक्षी म्हणून शिफारस
महाराष्ट्रातील पक्षीप्रेमींनी, पक्षी अभ्यासकांनी व मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीने रानपिंगळा किंवा ‘फॉरेस्ट आउलेट' या पक्ष्याला महाराष्ट्राचा राज्यपक्षी करावा अशी शिफारस केली आहे. याआधी राज्यपक्षी म्हणून हरियाल या पक्ष्याला मान्यता दिली गेली होती. आता या रानपिंगळ्याचे नाव पुढे आले आहे. हा पक्षी घुबड, पिंगळा गटातील आहे. रानपिंगळा दिसायला फारसा आकर्षक नसतो. हा पक्षी आता फारच दुर्मिळ होत चालला आहे. राजपक्ष्याचा याला दर्जा दिल्यास या पक्ष्याचा आणखी शोध घेणे, त्यावर अभ्यास करणे व वाचवण्यासाठी संरक्षण देणे शक्य होईल. म्हणून राजपक्ष्याच्या मान्यतेची मागणी झाली आहे.[३]
संदर्भ
- ^ "लाइकली हायब्रिड ऑफ फॉरेस्ट ॲन्ड स्पॉटेड आउलेट्स फाऊंड" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]
- ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-15-bird-caste-collapse-in-india-4447283-NOR.htmlhttps://www.loksatta.com/balmaifalya-news/birds-in-danger-vanapingla-349888/
- ^ "प्रोटेक्टिंग द फॉरेस्ट औलेट" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)