बूडिका, बुड्डुग (वेल्श) तथा बूडिसिआ (लॅटिन) ही प्राचीन ब्रिटिश आयसेनी जमातीची राणी होती. हिने इ.स. ६०/६१ मध्ये ब्रिटन जिंकलेल्या रोमन साम्राज्याविरुद्ध अयशस्वी उठावाचे नेतृत्त्व केले. तिला ब्रिटिश राष्ट्रीय नायिका आणि न्याय आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रतीक मानले जाते.
बूडिका ही आयसेनींचा राजा प्रासुटागस याची पत्नी होते. त्यांना दोन मुली होत्या. रोमनांनी ब्रिटन जिंकल्यावर आयसेनी जमातीने त्यांच्याशी तह करून नाममात्र स्वातंत्र्य टिकवून ठेवले होते. प्रासुटागसने त्याच्या मृत्यूपत्रात आपले राज्य संयुक्तपणे आपल्या मुलींना आणि रोमन सम्राटाला दिले. प्रासुटागसच्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्याने त्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष केले गेले आणि राज्य खालसा केले तसेच त्याची मालमत्ता लुटून घेतली. रोमन इतिहासकार टॅसिटसच्या मते याचवेळी बूडिकाला चाबकाने फटके मारण्यात आले आणि तिच्या मुलींवर बलात्कार झाला . [१] इतिहासकार कॅसियस डिओने लिहिले आहे की रोमन साम्राज्याने आयसेनींना देण्यात येणाऱ्या वार्षिक देणग्या बंद केल्या आणि रोमन सावकार आणि तत्वज्ञानी सेनेका याने आयसेनींना जबरदस्तीने दिलेले कर्ज टाकोटाक परत वसूल करणे सुरू केले.
या अनेक कारणांमुळे ६०-६१ दरम्यान बूडिकाने आयसेनी आणि आसपासच्या ब्रिटिश जमातींना एकत्र करून रोमन साम्राज्याविरुद्ध बंड पुकारले. त्यांनी कॅम्युलोडुनम (आताचे कोल्चेस्टर शहर) जाळले. ट्रिनोव्हेंट जमातीच्या राजधानीला त्यावेळी रोम साम्राज्याने आपल्या सैन्यातून हाकलेल्या सैनिकांना राहण्याचे ठिकाण केले होते.
बूडिकाच्या कारवायांबद्दल ऐकल्यावर रोमन सरदार गैयस सुएटोनियस पॉलिनसने मोना (आधुनिक अँगलसे) बेटावरून लंडिनियमकडे धाव घेतली. लंडनियम (आताचे लंडन) वसाहत जेमतेम २० वर्षांपूर्वी उभी राहिली होती आणि स्वतःचे रक्षण करण्यास असमर्थ होती. पॉलिनसने लंडन तत्काळ रिकामे करवले आणि तेथून पलायन केले. मागे राहिलेल्या लेजियो ९ इस्पाना तुकडीचा पराभव करून लंडन बेचिराख केले. यावेळी ७००००-८०,००० रोमन आणि रोमनधार्जिण्या ब्रिटिश लोकांना बूडिकाच्या सैन्याने ठार मारले.
माघार घेतलेल्या सुएटोनियसने वेस्ट मिडलँड्सच्या आसपास आपले सैन्य पुन्हा एकत्र केले आणि १०,००० प्रशिक्षित आणि सुसज्ज सैनिकांसह अंदाजे २,००,००० विद्रोह्यांचा पराभव केला. यानंतर रोमनांनी आयसेनी आणि इतर जमातींची कत्लेआम केली.
बूडिकाने या युद्धाच्या शेवटी आत्महत्या केली किंवा तिचा आजारपणात मृत्यू झाला.[२]
रोमन साम्राज्याच्या या विजयानंतर सम्राट नीरोने ब्रिटनमधून माघार घेण्याचा विचार सोडून दिला आणि रोमन साम्राज्य कायमचे ब्रिटनमध्ये राहिले.