Jump to content

राणी दुर्गावती

राणी दुर्गावती

गोंडची राणी दुर्गावती
जन्म: ऑक्टोबर ५ , १५२४,
कालंजर किल्ला, बांदा, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यू: जून २४ , १५६४,
एलिचपूर, महाराष्ट्र, भारत
धर्म: गाेंडी धर्म आदिवासीं प्रकुरती धर्म
पती: दलपत शाह
अपत्ये: वीर नारायण

आदिवासी गोंड राणी दुर्गावती (ऑक्टोबर ५, १५२४ - जून २४, १५६४) यांचा जन्म प्रसिद्ध राजा चंडेल सम्राट किरत राय यांच्या कुटुंबात झाला. कालंजर किल्ला (बांदा, उत्तर प्रदेश,भारत) हे त्यांचे जन्मस्थान होय. महंमद गझनी याला पळता भुई थोडी करणाऱ्या राणा विद्याधर यांचा बचाव करण्यामुळे चंदेल राजघराणे इतिहासात प्रसिद्ध झाले. राणा विद्याधर यांच्या शिल्पकलेवरील प्रेमाची प्रचिती जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर व कालंजर किल्ल्याकडे पाहून येते. राणी दुर्गावती यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या वंशपरंपरगात धैर्य व कलाभक्तीच्या परंपरेला आणखी प्रतिष्ठा लाभली.

१५४२

१५४२ साली, राणी दुर्गावती यांचा विवाह, गोंड राजघराण्यातील राजा संग्राम शाह यांचे सुपुत्र दलपत शाह यांचेशी बऱ्याच संघर्षानंतर झाला. या विवाहामुळे चंडेल व गोंड राजघराणी एकत्र आली. याच कारणामुळे शेर शाह सुरीचा पाडाव करते समयी राणा किरत सिंह यांना आपले जावई दलपत शाह यांचेकडून मदत मिळाली.

१५४५

इ.स. १५४५ साली राणी दुर्गावती यांनी एका मुलास जन्म दिला. त्यांनी मुलाचे नाव वीर नारायण ठेवले. इ.स. १५५० च्या सुमारास दुर्गावतींचे पति दलपत शाह यांचे निधन झाले. वीर नारायण त्या वेळेस वयाने खूपच लहान असल्याने गोंड राज्याची सूत्रे राणी दुर्गावतींनी आपल्या हाती घेतली. दिवाण किंवा प्रधान मंत्री व मंत्री मान ठाकूर यांनी राणी दुर्गावती यांना यशस्वी व प्रभावी राज्यकारभारासाठी मदत केली. नंतर राणीने आपली राजधानी सिंगौरगडावरून हलवून चौरंगगडावर नेली. सातपुडा पर्वतरांगांमधील या किल्ल्याला राजकीय महत्त्व होते.

१५५६

शेर शाहच्या मृत्यूनंतर सुजात खान याने माळवा प्रांतावर कब्जा केला. त्याच्यानंतर इ.स. १५५६ मधे त्याचा मुलगा बाज बहादूर गादीवर आला. राज्यकारभाराची धुरा सांभाळताच त्याने राणी दुर्गावतीवर हल्ला केला पण या युद्धात त्याचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर बाज बहादूरला गप्प बसण्याशिवाय पर्याय उरला नाही व राणी दुर्गावतीचे नाव अतिशय प्रसिद्ध झाले.

१५६२

१५६२ मधे अकबर राजाने माळवा प्रांताचा राजा बाज बहादूर याचा पराभव केला व माळवा प्रांत मुघल साम्राज्याखाली आणला. यामुळे आपसूकच राणी दुर्गावतीच्या साम्राज्याची हद्द, मुघल साम्राज्याच्या हद्दीला स्पर्श करू लागली.

रेवा साम्राज्याच्या रामचंद्र राजाचा पराभव करणारा, राणीचा एक समकालिन मुघल सेनापती, ख्वाजा अब्दुल माजिद असफ खान हा अतिश्य महत्त्वाकांक्षी मनुष्य होता. राणीच्या साम्राज्यातील समृद्धीने हा प्रदेश आपल्या अंकित करण्याची त्याची लालसा बळावली आणि अकबर राजाच्या परवानगीने त्याने राणीच्या राज्यावर हल्ला केला.

राणीला जेव्हा असफ खानच्या आक्रमणाविषयी कळलं, तेव्हा त्यांचे दिवाण ब्योहर आधार सिंह यांनी मुघल सैन्यबलाविषयी पूर्ण कल्पना दिली. मात्र राणीने आपल्या सर्वशक्तीनीशी असफ खानला तोंड द्यायचं ठरवलं. अपमानित जगण्यापेक्षा सन्मानाने मृत्यूला कवटाळणं त्यांना जास्त पसंत होतं.

बचावात्मक लढा देता यावा म्हणून त्या नराईला गेल्या. या प्रदेशाच्या एका बाजूस गौर व नर्मदा नदी आणि एका बाजूस पर्वतांची रांग होती. हे एक असमान युद्ध होतं. एका बाजूला आधुनिक शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या सैनिकांचे अफाट सैन्यदळ व दुसऱ्या बाजूला जुनी हत्यारे चालवणारे अपुरे अप्रशिक्षित सैनिक. राणीचा फौजदार अर्जुन दास युद्धात कामी आला व मग राणीने बचावाच्या या लढाईमधे आघाडी घेतली. शत्रूच्या सैन्याने घाटात प्रवेश केल्यावर राणीच्या सैन्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. दोन्ही बाजूला काही सैनिक मेले पण राणीचा या युद्धात विजय झाला. घाटात शिरलेल्या मुघल सैन्याचा तिने पाठलाग केला व ती बाहेर आली.

१५६४

आता राणीने आपल्या सल्लागारांसोबत युद्धनीतीची चर्च केली. राणीचं मत होतं की शत्रूवर रात्री हल्ला करावा म्हणजे तो कमजोर पडेल पण राणीच्या सल्लागारांनी याला नकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी असफ खानाने अवाढव्य तोफा युद्धासाठी आणल्या. राणी आपल्या सरमन नावाच्या हत्तीवर स्वार झाली आणि युद्धाला सामोरी गेली. तिचा मुलगा राजपुत्र वीर नारायण यानेदेखील या युद्धात भाग घेतला होता. त्याने तीन वेळा मुघल सैन्याची पिछेहाट केली होती पण एके क्षणी तो जखमी झाल्यामुळे एका सुरक्षित स्थळी तो मागे फिरला. या युद्धादरम्यान राणीला देखील एका बाणामुळे कानावर जखम झाली. दुसरा बाण थेट त्यांच्या गळ्यात घुसला व त्यांची शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की या युद्धात पराभव अटळ आहे. त्यांच्या माहूताने त्यांना युद्धभूमीवरून परत फिरण्याचा सल्ला दिला पण राणीने तो मानला नाही. त्यांनी आपला खंजिर काढला व स्वतःचे जीवन संपवले. तो दिवस होता २४ जून १५६४. त्यांचा मृत्यू दिन भारतामधे शहीदांचा दिवस म्हणून २४ जूनला साजरा केला जातो. १९८३ साली, मध्य प्रदेश सरकारने राणी दुर्गावती यांच्या स्मरणार्थ जबलपूर युनिव्हर्सिटीचे नामकरण दुर्गावती विश्वविद्यालय असे केले. २४ जून १९८८ला त्यांच्या पुण्य़तिथीनिमित्त भारत सरकार कडून एक पोस्टाचा स्टॅम्प काढून श्रद्धांजली वाहिली गेली. राणीच्या नावावरून नामकरण झालेली जबलपूर जंक्शन व जम्मूतवी दरम्यान धावणारी ट्रेन दुर्गावती एक्सप्रेस (११४४९/११४५०) या नावाने प्रसिद्ध आहे.